অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे

अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो. कोंबड्या अंड्यावर येतात तेव्हापासून त्यांना हवे तितके खाद्य द्यावे. वेळोवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापनामध्ये बदल करावेत. थंडीच्या काळात कोंबड्यांच्या अंडी उत्पादनामध्ये घट दिसते. वातावरणातील गारव्यामुळे कोंबड्यांच्या गर्भाशयामध्ये विविध बदल होतात. अंडे देणाऱ्या संप्रेरकांच्या निर्मितीसाठी कोंबड्यांना दिवसातील किमान 14 तास प्रकाशाची आवश्‍यकता असते. हिवाळ्यामध्ये दिवस हा लहान असतो, सूर्याची प्रखरताही कमी असते. त्यामुळे अंडी उत्पादनामध्ये साधारणतः 40 टक्के घट होते.
अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो.

पोल्ट्री शेड

  1. कोंबड्यांच्या शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये साळीच्या भुश्‍श्‍याची साधारणतः 6 इंच जाड गादी बनवावी. यामुळे कोंबड्यांचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्याचबरोबर साळीच्या भुश्‍श्‍यामुळे कोंबड्यांच्या विष्ठेमुळे जो ओलावा येतो तो नाहीसा होतो. बुरशीपासून होणारे व इतर संसर्गजन्य आजार थांबविण्यास मदत होते.
  2. कोंबड्यांची शेड दक्षिणोत्तर असल्यास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कोंबड्यांना मिळतो. यामुळे याचा फायदा शरीरातील तापमान संतुलनास व संप्रेरकांच्या निर्मितीसाठी होतो.

प्रकाशव्यवस्था

  1. कोंबड्यांना मिळणाऱ्या प्रकाशकाळाचा व प्रकाशाच्या तीव्रतेचा त्यांच्या अंडी उत्पादनावर परिणाम होतो. कोंबड्यांना अधिकाधिक अंडी उत्पादनाकरिता दिवसातून सतत किमान 14 तास तरी प्रकाश मिळाला पाहिजे. सूर्यप्रकाशाचा जसा परिणाम अंडी उत्पादनावर होतो, तसाच कृत्रिम प्रकाशाचाही होतो, म्हणून रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाश पुरविल्यास अंडी उत्पादन चांगले होते.
  2. कोंबड्या अंड्यावर येण्यापूर्वी त्यांना मर्यादित प्रकाशपुरवठा करतात; परंतु वयाच्या 20 आठवड्यांपासून प्रकाशाचे प्रमाण 13 तासांपासून वाढवून 16 ते 17 तास करावे. प्रकाशकाळ यापेक्षा वाढविला, तर अंड्यांचे उत्पादन अधिक होत नाही. परंतु तो कमी केल्यास अंडी उत्पादन कमी होते. 60 वॉटच्या बल्बचा जितका प्रकाश अंदाजे 24 चौ.मीटर जागेत पडेल तितकी प्रकाशाची तीव्रता अंडी उत्पादनास पुरेशी होते.
  3. प्रकाशाची तीव्रता अधिक असल्यास फायदा होत नाही. याउलट कोंबड्या एकमेकांस टोचण्याचे प्रमाण वाढते.
  4. शेडमध्ये जमिनीपासून 8 ते 12 फूट उंचीवर दिवे लावावेत. प्रकाशाची व्यवस्थित मिळण्यासाठी बल्बच्या वर तबकड्या लावाव्यात. दिवा एका जागी स्थिर असावा. कारण हलणाऱ्या दिव्यामुळे छाया पडून कोंबड्या घाबरतात. रात्रीचे दिवे शेडमध्ये लावून ठेवावेत. त्यांच्या वेळा अधोरेखित कराव्यात.

कोंबड्यांचे खाद्य

  1. वातावरणातील कमी झालेल्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरात रासायनिक बदल होतात व साहजिकच अंडी उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. हे थांबविण्यासाठी कोंबड्यांना खाद्यातून ऊर्जा देणे हितकारक ठरते.
  2. अन्नपचन प्रक्रियेतून निर्माण झालेली ऊर्जा ही कोंबड्यांच्या शरीरातील तापमान वातावरणातील तापमानाशी संतुलित होण्यास मदत करते.
  3. वाढत्या वयाच्या कोंबड्यांना मर्यादित खाद्य देतात. परंतु अशा कोंबड्या अंड्यावर येतात तेव्हापासून त्यांना हवे तितके खाद्य द्यावे. साधारणतः हिवाळ्यात कोंबड्यांची खाद्य खाण्याची क्षमता वाढते, तर पाणी पिण्याची क्षमता ही थोडी कमी होते.
  4. हिवाळ्यामध्ये पक्ष्यांना लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण हे जास्त म्हणजे 280 ते 320 किलो कॅलरी ऊर्जा प्रतिपक्षी प्रतिदिवस असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आहारात तेलयुक्त पदार्थांचा वापर करावा.
  5. मका तसेच कार्बोदकेयुक्त धान्याचा वापर करावा. मका हे अत्यंत उपयुक्त धान्य आहे. कारण पचन झाल्यानंतर मक्‍यापासून जास्तीत जास्त ऊर्जानिर्मिती केली जाते. जास्त झालेली ऊर्जा ही स्निग्ध पदार्थात रूपांतरित होऊन त्वचेखाली साठविली जाते. ती शरीराला थंड तापमानापासून सुरक्षित ठेवते.
  6. हिवाळ्यात अंडी उत्पादनासाठी पक्ष्यांच्या खाद्यात 3400 किलो कॅलरी ऊर्जा, तर 23 टक्के प्रथिनांची आवश्‍यकता असते. बारीक केलेले खाद्य (मॅश) दाणेदार व बारीक कांड्यांच्या (पेलेट्‌स) स्वरूपात देता येते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या खाद्यात पिवळा मका नसल्यास हिरवे गवत द्यावे, म्हणजे त्यातून अंड्याच्या बलकास पिवळा रंग येण्यास आवश्‍यक असलेले झॅंथोफिल हे द्रव्य मिळते.
  7. निरोगी व अधिक अंडी उत्पादनासाठी पशुआहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पाणी

1) अंडी देणाऱ्या कोंबड्यांना निर्जंतुकीकरण केलेले स्वच्छ पाणी कोमट करूनच प्यायला द्यावे. यामुळे शरीरातील तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत होते.

ताण

  1. अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये थंड वातावरणाचा ताण येऊन अंडी उत्पादनात घट येते. थंड वातावरणामुळे पक्ष्यांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून आवश्‍यक जीवनसत्त्वे द्यावीत. यामध्ये जीवनसत्त्व "ब', "क' किंवा क्षारयुक्त पावडर किंवा ताण कमी करण्याच्या औषधींचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.
  2. ताण आल्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. ते इतर रोगांना बळी पडून आपसूकच अंडी उत्पादन कमी होते, यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करावी.

स्वच्छ अंड्यांचे उत्पादन

  1. शेडमधील जमिनीवर अंडी दिल्यास अंडी घाण होतात. अशी अंडी जास्त काळ टिकत नाहीत. याशिवाय अंडी फोडून खाण्याची सवय कोंबड्यांना लागते. म्हणून अंडीघरे कोंबड्यांच्या संख्येच्या प्रमाणात असावीत. अंडीघरात पुरेसे तणस ठेवावे. जरुरीप्रमाणे ते बदलावे. अंडीघरे रात्री बंद ठेवावीत.
  2. अस्वच्छ अंडी सॅंडपेपरने स्वच्छ करावीत. अंडी टिकवून ठेवण्यासाठी ती धुऊ नयेत. गोळा केल्यानंतर अंडी त्वरित थंड व हवेशीर जागी ठेवावीत म्हणजे ती अधिक काळ टिकतात.

अंडी उत्पादन करताना

  1. कुक्कुटपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी कळपातून वेळोवेळी अंडी न देणाऱ्या किंवा कमी देणाऱ्या अशक्त, खुरटलेल्या, रोगट, कायम व्यंग असलेल्या कोंबड्या काढून टाकाव्यात.
  2. कोंबड्या अंड्यावर आल्या असताना त्यांना दुसऱ्या घरात हलवावे लागते. अशा वेळी पक्षी हलविताना कोंबड्यांना ताण येतो. परंतु तो शक्‍यतो कमी होईल याकडे लक्ष द्यावे.
  3. सर्वसाधारणपणे 16 ते 18 आठवडे वयाच्या कोंबड्या अंडी देण्याच्या घरात न्यावेत. कोंबड्यांना नाजूकपणे हाताळावे. त्यांना घरात सोडण्यापूर्वी घरामध्ये पाणी व खाद्याची व्यवस्था केलेली असावी.
  4. दिवसातून किमान चार वेळेस अंडी गोळा करावीत. ती 55 अंश फॅरानाईट ते 60 अंश फॅरानाईट तापमानात व 65 ते 75 टक्के आर्द्रतेमध्ये साठवावीत. गोळा केलेल्या अंड्यांची नोंद ठेवावी जेणेकरून उत्पादनाचा लेखाजोखा माहीत ठेवता येईल.
  5. अंड्याच्या कवचाचा टणकपणा व पोत हे आनुवंशिक असल्याने कोंबड्या खरेदी करताना त्यांच्या जातीची चौकशी करावी. टणक कवचाची, उत्तम पोत असलेली व मोठ्या आकाराची अंडी घालणाऱ्या लेगहॉर्न किंवा ऱ्होड आयलंड रेड या जातीच्या कोंबड्यांची निवड करावी.
  6. अंड्यांवरील कोंबड्यांच्या आरोग्याचे सर्वांगीण व्यवस्थापन करावे. अधिक उत्पादनासाठी आजारी कोंबड्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी. रोगाचे योग्य निदान करून त्वरित प्रतिबंधक उपाय व पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रभावी औषधोपचार करावेत.

 

संपर्क : 
1) डॉ. पी. व्ही. मेश्राम : 9594581239 
2) डॉ. रेश्‍मा पाटील : 9527415110 
(लेखक पशुविकृतीशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate