घातक बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाकडे आणखी एक पाऊल

कोंबडी किंवा पक्षिपालनामध्ये बर्ड फ्लू किंवा एव्हियन इन्फ्लुएंजाची H5N1 प्रजातीच्या लसीकरण केलेल्या व न केलेल्या पक्ष्यांची ओळख नेमकी पटविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील ऍडलेड विद्यापीठातील संशोधकांनी नवी चाचणी विकसित केली आहे. हे संशोधन "प्लॉसवन' या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जगभरामध्ये विशेषतः इन्डोनेशिया आणि व्हिएतनाम या आग्नेय आशियातील कुक्कुटपालन व्यवसाय हा H5N1 - बर्ड फ्लू या रोगामध्ये अडचणीत आला आहे. त्यातच या रोगाच्या प्रसार माणसांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे या रोगांच्या नियंत्रणासाठी अत्यंत काळजीपूर्वक लसीकरण करण्याची आवश्यकता असते. अनेकवेळा नैसर्गिकरीत्या या रोगाचा प्रसार होत असतो. मात्र लसीकरण केलेले पक्षी आणि न केलेले पक्षी एकमेकात मिसळले गेल्यास ओळखणे शक्य होत नाही. पर्यायाने लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये अनेक अडचणी येतात.

या रोगाविषयी माहिती देताना विषाणूशास्त्राचे डॉ. फर्शिद हेम्मतजादेह यांनी सांगितले, की एव्हियन फ्लू हा जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या दृष्टीने हानिकारक रोगांच्या यादीतील एक अत्यंत महत्त्वाचा रोग आहे. हा रोग मानवी आरोग्यासाठी धोक्याचा असून, आर्थिकदृष्ट्याही अत्यंत नुकसानकारक आहे. या रोगाचा उद्रेक रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र लसीकरण झालेले व न झालेल्या पक्ष्यांमध्ये फरक करणे शक्य होत नाही. त्यातून लसीकरण झालेल्या पक्ष्यांमध्ये विषाणू येऊन अन्य विषाणूंच्या संपर्कातून नवी प्रजात निर्माण होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी नवी अधिक संवेदनशील अशी चाचणी विकसित करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये लसीकरण झालेल्या पक्ष्यांमध्ये जिवंत असलेल्या व त्यामुळे नव्याने तयार होऊ घातलेल्या प्रजाती ओळखणे शक्य होते. या चाचणीला दिवा चाचणी ( DIVA -differentiation of infected from vaccinated animals) असे नाव देण्यात आले आहे.

या संशोधनासाठी मेलबर्न विद्यापीठ, CSIRO आणि इंडोनेशिया येथील संशोधन संस्थांतील संशोधकांनीही भाग घेतला असून, या कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल ऍग्रिकल्चरल रिसर्च (ACIAR) यांनी अर्थसाह्य केले आहे.

धोका कमी करण्यासाठी चाचणी

मृत एव्हियन एन्फ्लुएंजा विषाणूंच्या साह्याने पक्ष्यांसाठी लस निर्माण केली जाते. ही लस टोचल्यावर पक्ष्यांमध्ये ऍण्टीबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होऊन जिवंत विषाणूपासून पक्ष्यांचा बचाव होतो. मात्र काही घटनांमध्ये लसीकरण झालेल्या पक्ष्यांमध्येही विषाणू स्वतःमध्ये काही बदल करून घेत स्वतःची वाढ करतात व संख्या वाढवतात.
नव्या दिवा चाचणीमध्ये विषाणूतील मॅट्रिक्स प्रोटिन 2 या प्रथिनांचा वापर केला जातो. या प्रथिनांचे लसीकरण झालेल्या व न झालेल्या पक्ष्यांच्या रक्ताशी वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया करते.

स्त्रोत: अग्रोवन