অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उन्हाळ्यात जनावरांची काळजी

लाळ्या खुरकूत

हा आजार अत्यंत सूक्ष्म विषाणूंमुळे सर्व वयाच्या जनावरांमध्ये होतो. रोगाची लागण झालेल्या जनावराच्या श्वासावाटे, लाळेतून व नाकातील स्रावातून विषाणू हवेच्या सान्निध्यात येतात, धूलिकणांवर बसतात. ऊस गळीत हंगामाच्या सुरवातीस व हंगाम संपण्याच्या वेळी लागण झालेल्या बैलामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना रोगाचा प्रसार होतो. निरोगी आणि लागण झालेली जनावरे एकमेकांच्या संपर्कात जनावरांच्या बाजारात येतात, त्यामुळे साथीचा झपाट्याने प्रसार होतो.

रोगाची लक्षणे

संकरित जनावरांमध्ये रोगाची तीव्र लक्षणे दिसून येतात, तर देशी जनावरांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात. जनावरास 105 ते 106 अंश फॅ.पर्यंत ताप असतो. तोंड, जीभ, हिरड्या यांच्यावर व्रण पडतात, चिरा पडतात, कधी कधी जिभेचे तुकडेदेखील पडतात, त्यामुळे जनावरास खाता येत नाही. पायावरील जखमांमुळे जनावर लंगडते, दूध कमी देते किंवा देतच नाही व शेतकऱ्यांचे फारच आर्थिक नुकसान होते. वासरांमध्ये या रोगाच्या विषाणूंची हृदयाच्या झडपा आणि हृदयाची आवरणे यामध्ये झपाट्याने वाढ होते व लक्षणे दिसावयाच्या आतच वासरे मृत्युमुखी पडतात. गाय गाभण राहण्यास त्रास पडतो. सडांवर व्रण पडतात. काससुजी हा आजार उद्‌भवतो. बैल आजारानंतर बराच काळ गाडीस चालू शकत नाहीत, धापा टाकतात, उन्हात मेहनतीचे काम करू शकत नाहीत व शेतकऱ्यांचे सर्वतोपरी आर्थिक नुकसान होते.

प्रतिबंधक उपाय

आजारामुळे जनावर निकामी होण्याऐवजी रोगप्रतिबंधक लस जनावरास टोचणे फायदेशीर ठरते. सर्व संकरित व देशी जनावरांना वर्षातून दोन वेळा ऑक्‍टोबर - नोव्हेंबर आणि मार्च - एप्रिल महिन्यांत लस देऊन घ्यावी. तज्ज्ञांकडून जनावरांचे योग्य वेळी लसीकरण करावे.
जनावराच्या तोंडातील व पायांवरील जखमा पोटॅशियम परमॅंगनेट किंवा तुरटी किंवा खाण्याचा सोडा यांच्या सौम्य द्रावणाने धुऊन तोंडातील जखमांवर हळद लावावी. पायांवरील जखमा स्वच्छ करून त्यावर माश्‍या बसू नयेत, जखम चिघळू नये म्हणून जंतुनाशक मलम लावावे; तसेच पशुवैद्यकाची मदत घेऊन वेळ वाया न घालवता औषधोपचार करावेत.

उष्माघात

उन्हाळ्यात होणारा दुसरा व अत्यंत महत्त्वाचा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यात ज्या भागांत तापमान 45 अंश ते 46 अंश से.वर जाते, उष्णतेची लाट येते, त्या भागांत साधारणतः महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा व खानदेश या भागात हा आजार उद्‌भवतो. जनावरांच्या गोठ्यात प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता आणि वायुविजनाची योग्य सोय नसणे; तसेच जनावरांची गर्दी, बैलांना भर उन्हात खूप अंतर ओढायला लावल्यास, घोड्यास भरधाव वेगाने उन्हात पळविल्यास, जनावरांची वाहतूक करताना वाहनात गर्दीने जनावरे भरून त्यांना वेळोवेळी पाणी न पाजल्यास किंवा जनावरे उन्हात बांधल्यास उष्माघात होण्याची दाट शक्‍यता असते.

लक्षणे

या रोगामुळे भयंकर अशक्तपणा येतो, डोळे खोल जातात, तोंडास कोरड पडते, जनावर तोंडाचा "आ' वासते, तोंड उघडे ठेवते, जोरजोराने श्वासोच्छ्वास करते, धाप लागते, नाडी जलद चालते, शरीराचे तापमान 110 अंश फॅ.पर्यंत वाढते. कुत्र्यांमध्ये आणि घोड्यांमध्ये उलट्या होतात. जनावर एक टक लावून पाहते. घोड्याच्या सर्व अंगास दरदरून घाम फुटतो, अंग ओलेचिंब होते. जनावर त्वरित उपचार न केल्यास दगावते.

प्रथमोपचार

जनावर उन्हात असल्यास ताबडतोब झाडाच्या सावलीत थंड ठिकाणी न्यावे. जनावराच्या अंगावर बर्फाचे थंड पाणी शिंपडावे. शरीराचे तापमान हळूहळू उतरेल याची काळजी घ्यावी.

जनावरांची काळजी

जनावरे उन्हात बांधू नयेत. बांधण्याच्या जागी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असू नये. जागा हवेशीर असावी. हवा खेळती ठेवावी. घराचे छप्पर पांढऱ्या रंगाचे असावे, त्यामुळे प्रखर उष्णतेच्या किरणांचे परावर्तीकरण होऊन गोठा थंड राहण्यात मदत होईल. गोठ्यात जनावरांची गर्दी असू नये. संपूर्ण दिवस व रात्र थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनावरांना गुळाचे पाणी पाजावे.

वासरांचे संगोपन

वासरांमध्येदेखील उन्हाळ्यात काही आजार प्रामुख्याने उद्‌भवतात व मृत्यूचे प्रमाण वाढते. वातावरणाच्या तापमानाचा वासरांमध्ये लगेच परिणाम दिसून येतो. त्यांच्या शरीराचे तापमान वाढते, त्यांना ताप येतो. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, त्यामुळे चरावयास नेलेल्या जनावरांना गुराखी एखादा तुंबलेला तलाव किंवा डबक्‍यात पाणी पाजतात. अशा पाण्यात रोगजंतू व कृमींची भरमसाट वाढ झालेली असते, त्यामुळे प्रामुख्याने वासरांमध्ये व क्वचितच मोठ्या जनावरांमध्येदेखील रक्तीहगवण व शरीरातील पाणी कमी होणे, लिव्हर फ्ल्यूक कृमींचा प्रादुर्भाव, कावीळ इ. रोग उद्‌भवतात. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत औषधोपचार करावा. आजार होऊ नये म्हणून जनावरांना स्वच्छ व निर्जंतुक पाण्याचा भरपूर प्रमाणात पुरवठा होईल अशी सोय करावी म्हणजे जनावरांचे आरोग्य चांगले राहील.

संपर्क (लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate