गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि वेळ हे प्रत्येक जातीनुसार आणि जनावरानुसार वेगवेगळे असतात. कृत्रिम रेतन हे जनावर माजावर आल्यावर १२ तासांनंतर करावे. पशुपालकांनी कृत्रिम रेतन फक्त नोंदणीकृत पशुवैद्यकाकडूनच करावे. कृत्रिम रेतन केल्याची नोंदवही ठेवावी.
कृत्रिम रेतन हे कमी वेळेत किफायतशीर दुग्धव्यवसाय वाढविण्याकरिता वरदान आहे. यामुळे दुधाळ गाई-म्हशींच्या संगोपनास मदत होते. कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गाई-म्हशींची पैदास करण्यात येते. गाईंच्या जर्सी, होल्स्टिन फ्रिजीयन आणि म्हशींच्या मुऱ्हा, सुरती, जाफराबादी, पंढरपुरी या जाती अधिक दूध देणाऱ्या आहेत. कृत्रिम रेतनामुळे ब्रुसेलोसीस, टी. बी. ट्रायकोमिनियासीस यासारख्या भविष्यात होणाऱ्या रोगांपासून जनावरांचा बचाव करू शकतो.
कृत्रिम रेतन हे अयशस्वी होण्यामागे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे जनावरांचा माज ओळखण्यात होणारी चूक, अयोग्य पद्धतीने रेतमात्रेची हाताळणी आणि कृत्रिम रेतन करताना रेतमात्रा अयोग्य ठिकाणी सोडणे. रेतनासाठी वापरलेल्या रेतमात्रेचे आयुर्मान समाप्त झाले असतानासुद्धा ते रेतनासाठी वापरल्यास कृत्रिम रेतन अयशस्वी होते.
१) गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि वेळ हे प्रत्येक जातीनुसार आणि जनावरांनुसार वेगवेगळी असतात. जनावर माजावर आल्याचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे योनीमधून पांढरा चिकट काचेसारखा स्राव लोंबतो, जनावर अस्वस्थ असते.
२) गर्भधारण क्षमता वाढविण्याकरिता कृत्रिम रेतन हे जनावर माजावर आल्यावर १२ तासांनंतर करावे. (ए. एम.- पी. एम. नियमानुसार) जर जनावर रात्री माजावर आले असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करावे, आणि सकाळी माजावर आले तर सायंकाळी रेतन करावे.
३) सर्वसाधारणपणे आपल्याकडे जनावरांच्या माजावर येण्याकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे ज्या वेळी जनावर माजावर आलेले दिसेल, त्या वेळी लगेच रेतन करावे. त्यानंतरही जनावर माज दाखवत असेल तर १२ तासांनी पुन्हा एकदा रेतन करावे.
३) शेतकरी माजावर आलेले जनावर पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जातात. त्यामुळे जनावरावर ताण येतो, लगेच कृत्रिम रेतन करण्यात येते, त्यामुळे गर्भधारणेवर परिणाम होतो. त्यासाठी जनावर दवाखान्यात आणल्यानंतर १० ते २० मिनिटे विश्रांती द्यावी. जनावरांस पाणी पाजावे. जनावर शांत झाल्यावर कृत्रिम रेतन करावे.
१) गोठवलेल्या रेतमात्रेची हाताळणी साठवलेल्या कंटेनरपासून ते कृत्रिम रेतन करण्यापर्यंत फक्त तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून करावी.
२) गोठवलेली रेतमात्रा ही द्रव नायट्रोजनच्या कंटेनरमध्ये (-१९६ अंश सें. ग्रे.) पेल्यामध्ये ठेवतात. ज्या वेळी आपण रेतमात्रेच्या कांड्या बाहेर काढतो, त्या वेळी पेला कंटेनरच्या गळ्यापर्यंत काढावा आणि चिमट्याने आवश्यक असलेली रेतमात्रेची कांडी बाहेर काढावी. तसे केल्यास रेतमात्रेतील शुक्रजंतूंना जास्त तापमानामुळे होणारी इजा होत नाही.
रेतमात्रेची कांडी एका बाजूने कात्रीने कापून ती कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या गनमध्ये व्यवस्थित बसवावी, जेणेकरून रेतमात्रा वाया जाता कामा नये.
१) ज्या गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करावयाचे आहे, त्यांना व्यवस्थित हाताळावे. नाहीतर कृत्रिम रेतन करताना अडचण येते. रेतमात्रा योग्य ठिकाणी (गर्भाशयाच्या पिशवीत) सोडली जात नाही, त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचण येते.
२) कृत्रिम रेतन केल्यानंतर २१ दिवसांपर्यंत जनावरांवर बारकाईने लक्ष ठेवावे. जनावरांना योग्य समतोल आहार द्यावा.
१) गाई-म्हशींना कृत्रिम रेतनानंतर जनावराला दिवसभर वर मान करून बांधून ठेवणे चुकीचे आहे.
२) गाई-म्हशींना चारा आणि पाणी न देणे - यामुळे उलट गर्भधारणेची शक्यता कमीच होते.
१) पशुपालकांनी कृत्रिम रेतन फक्त नोंदणीकृत पशुवैद्यकाकडूनच करावे.
२) रेतमात्रेची सर्व टप्प्यांत शीतसाखळीतूनच वाहतूक झालेली असावी.
३) पशुपालकाने कृत्रिम रेतन केल्याची नोंदवही ठेवावी. जनावरांच्या आरोग्य चाचणीचा तपशील ठेवावा.
४) कृत्रिम रेतनानंतर ४० ते ४५ व्या दिवशी गाय, म्हैस गाभण असल्याची पशुवैद्यकाकडून तपासणी करावी.
५) जनावरांच्या आहारावर लक्ष ठेवावे. पुरेशा प्रमाणात हिरवा आणि सुका चारा द्यावा. गाभण जनावरांना योग्य प्रमाणात खाद्य मिश्रण द्यावे.
डॉ. दुर्गे - ८४३९८९४००५
डॉ. माडकर - ९९१७६८४३८३
(लेखक भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, इज्जतनगर, बरेली (उत्तर प्रदेश) येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...