लक्षणे :
1) कासदाहमध्ये जनावरांना ताप येतो, खाणे, पिणे कमी होते. दुधात बदल होऊन दूध विरजल्याप्रमाणे किंवा गाठीच्या स्वरूपात येते.
2) बऱ्याचदा पू, रक्त किंवा पू आणि रक्तमिश्रित अथवा पाण्यासारखे पातळ दूध येते. या रोगाचा तत्काळ, तसेच दीर्घकालीन परिणाम दूध उत्पादनावर आणि दुधातील फॅटवर होतो.
3) बाधित जनावरांच्या उपचारासाठी आणि त्यांचा सांभाळण्याचा खर्च अधिक असतो. आजारी जनावर बाजारात विक्रीसाठी नेले असता कमी किंमत येते.
जनावरांचे व्यवस्थापन :
1) जनावरे बांधण्याची जागा स्वच्छ, कोरडी व हवेशीर असावी.
2) गोठा नियमित स्वच्छ व निर्जंतुक ठेवावा. यासाठी गोठ्यात शिफारशीत जंतुनाशक द्रावण शिंपडावे. जंतुनाशक द्रावण उपलब्ध नसल्यास उकळत्या पाण्याने गोठा स्वच्छ करावा.
3) दूध काढण्यापूर्वी जनावरांचे मागील पाय, शेपटी आणि कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी. कास कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यावी.
4) दूध काढण्यापूर्वी हात निर्जंतुक करावेत. धार काढताना पहिल्या दोन ते तीन धारा दुधाच्या भांड्यात न घेता, दुसऱ्या भांड्यात घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कारण पहिल्या धारांमध्ये जंतूंचे प्रमाण जास्त असते. या धारा जमिनीवर पडू देऊ नयेत.
5) सर्व निरोगी जनावरांचे दूध अगोदर काढावे. आजारी जनावरांचे दूध वेगळे काढावे.
6) गाई, म्हशीने पान्हा सोडल्यावर लवकरात लवकर म्हणजे साधारणत: सात मिनिटांच्या आत धार काढावी.
7) दूध काढण्याच्या वेळेमध्ये बदल करू नये.
8) धार अंगठा मुडपून न काढता पूर्ण हातानेच काढावी, कारण अंगठ्याचा दाब पडल्यामुळे जखम होऊन जंतूसंसर्ग लवकर होऊ शकतो.
9) दूध पूर्णपणे काढावे. अपुरे दूध काढल्यास कासेमध्ये जंतूंची वाढ होते, कारण दूध हे जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते.
10) संपूर्ण दूध काढल्यानंतर गाईच्या सडाला सुरकुत्या पडतात, त्यावरून दूध पूर्ण निघाले आहे असे समजावे.
11) दूध काढणीनंतर कासेला निर्जंतुक द्रावणाने (एक टक्के पोटॅशिअम परमॅंग्नेट) पुसावे, कारण दूध काढल्यानंतर जवळपास अर्धा तास सडांची छिद्रे मोकळी असतात. त्यामुळे जंतू सडात शिरकाव होण्याची शक्यता असते.
12) दूध काढल्यानंतर जनावरास बसू देऊ नये. हिरवा चारा खायला द्यावा. जनावर बसल्यामुळे जमिनीवरील जंतू सडात प्रवेश करतात.
13) जनावरांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित जंतुनाशके पाजावीत, शिफारशीत वेळेत लसीकरण करावे, त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
14) जनावरांच्या खुराकामध्ये दररोज क्षारमिश्रणे द्यावीत.
15) जनावर आटत असल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने कासेमध्ये प्रतिजैवके सोडावीत.
16) दूध उत्पादन किंवा दुधामध्ये कोणताही बदल आढळून आल्यास त्वरित पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार करावा.