অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा..

गाई, म्हशींचे विणे ही जरी नैसर्गिक बाब असली तरीदेखील, आपल्याला योग्य काळजी घेणे गरजेचे असते. गाई, म्हशींना गाभण काळात अतिरिक्त पौष्टिक खाद्य द्यावे. कारण, त्याचा थेट संबंध हा गाई, म्हशी तसेच वासराच्या आरोग्याशी असतो. 
गाई, म्हशींचे रेतन केल्यानंतर जर त्या माजावर आल्या नाहीत तर आपण समजतो, की त्या गाभण आहेत. हे जरी खरे असले तरीही बऱ्याच रोगांमुळे गाई, म्हशी माजावर येण्यास विलंब होतो किंवा माजावर येत नाहीत. क्वचित काही वेळा गाभण गाई, म्हशीदेखील माज दाखवतात. त्यामुळे पशुतज्ज्ञांकडून गर्भधारणेची खात्री करून घ्यावी.

विण्याअगोदर घ्यावयाची काळजी

  • सर्वप्रथम गाभण गाई, म्हशींना इतर जनावरांपासून वेगळे करावे.
  • शक्‍यतोवर गाभण गाई, म्हशींना घराजवळच वेगळा गोठा करावा.
  • गोठा अतिशय स्वच्छ, कोरडा व भरपूर सूर्यप्रकाश असलेला असावा.
  • गोठ्यामध्ये जंतूनाशके फवारून घ्यावीत.
  • जमिनीवर स्वच्छ, मऊ गवत अंथरावे.
  • पुरेसा व्यायाम गाई, म्हशीला असावा; परंतु दूरवर चालणे टाळावे.
  • गाभण गाई, म्हशींना डोंगराळ भागात चरायला नेणे टाळावे.
  • खराब प्रतीचे खाद्य गाई, म्हशी तसेच होणाऱ्या वासराला हानिकारक ठरू शकते.
  • आहारात खनिज मिश्रणाचा उपयोग करावा.
  • गाई, म्हशींना मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा.

पुरेसा पशुआहार द्या

1) गाई, म्हशींना गाभण काळात आपण अतिरिक्त पौष्टिक खाद्य खाऊ घालतो. त्याचा थेट संबंध हा गाई, म्हशींच्या पुनःपैदास करताना तसेच वासराच्या आरोग्याशी असतो. 
2) गाभण काळातील शेवटच्या तीन महिन्यांत पशू आहाराची गरज झपाट्याने वाढलेली असते. कारण, याच काळात वासराची 70 टक्के वाढ होत असते. या वेळी प्रथिनांची कमतरता पुनरुत्पादनात अडथळे निर्माण करू शकते. 
3) प्रतिवर्षी एक वासरू हवे असल्यास गाई, म्हशी व्याल्यानंतर 83 ते 85 दिवसांत माजावर येऊन नैसर्गिक वा कृत्रिम पद्धतीने रेतन करावे. 
4) विण्याच्या 90 दिवस अगोदर वासराच्या योग्य वाढीसाठी, वासरू सशक्त जन्माला येण्यासाठी व मुबलक दूध उत्पादनासाठी गाई, म्हशीला या काळात अतिरिक्त पौष्टिक आहार द्यावा.

गाभण काळातील शेवटचे तीन महिने

  • या वेळी मायांग बाहेर येण्याची शक्‍यता असते. त्यासाठी आपण गाई, म्हशींवर लक्ष ठेवावे.
  • उंचावर किंवा डोंगराळ भागात चरायला नेऊ नये. गाई, म्हशी चालताना पडल्यास गर्भाशयाला पीळ पडून उपचाराअभावी वासरू दगावू शकते.
  • गर्भपाताची शक्‍यता किंवा थोडंही काही लक्षण वाटल्यास ताबडतोब पशुतज्ज्ञांना बोलावून उपचार करावेत.
  • बऱ्याच वेळा गाभणकाळ पूर्ण होण्याअगोदर वासराचा जन्म होऊ शकतो. त्यासाठी आपण तयार राहायला हवे.
  • गाई, म्हशीला मारणे, पळवणे व इतर जनावरांत सोडणे कटाक्षाने टाळावे. याने गाभण गाई, म्हशीला दुखापत होऊन गर्भपाताची शक्‍यता वाढते.
  • शेवटच्या दोन महिन्यांत गाभण जनावरांचे दूध काढणे बंद करावे. एक ते दीड किलो अतिरिक्त आहार द्यावा.
  • विण्याच्या अगोदर दूध काढू नये. त्याने जनावर विण्यास थोडा विलंब होतो.
  • विण्याच्या अगोदर एक आठवडा किंवा व्याल्यानंतर लगेचच "मिल्कफीवर' होऊ नये यासाठी पशुतज्ज्ञांकडून कॅल्शियमचे इंजेक्‍शन टोचून घ्यावे.

विताना घ्यावयाची काळजी

  • विण्याचा काळ हा 2 ते 3 तासांचा असतो. जर पहिले वेत असेल तर हा काळ 4 ते 5 किंवा अधिक तास राहू शकतो.
  • गाई, म्हशी विण्याचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात गर्भाशयाचे मुख उघडते आणि विस्तारते. दुसऱ्या टप्प्यात वासरू बाहेर येते आणि तिसऱ्या टप्प्यात वासराचे आवरण व पटले बाहेर येतात.
  • विण्याच्या या सर्व लक्षणांवर आपण बारीक लक्ष ठेवावे. प्रसूती वेदनांमुळे पहिल्या टप्प्यात गाई, म्हशींची ऊठ-बस वाढते, खूप बेचैन होते.
  • गाई, म्हशींची कास मोठी होते.
  • गाई, म्हशींची प्रकृती सुरक्षित अंतरावरून बघावी. त्यांच्या जवळ जाऊन त्रास देऊ नये.
  • प्रसूतीच्या टप्प्यात गाई, म्हशींवर सातत्याने लक्ष ठेवावे.

व्याल्यानंतर घ्यावयाची काळजी

  • व्याल्यानंतर गाई, म्हशीचे अंग कोरडे करावे. जंतूनाशक वापरून अंग स्वच्छ करावे.
  • गाई, म्हशींना प्यायला थोडं कोमट पाणी द्यावे.
  • वार दूरवर नेऊन खड्यात पुरावी.
  • जर वार अडकली तर पशुवैद्यकाला बोलावून योग्य उपचार करून घ्यावेत.
  • व्याल्यानंतर ताबडतोब गाय, म्हैस आपल्या वासराला चाटते; त्याला चाटू द्यावे.
  • वासराला गाई, म्हशीने चाटले नाही तर कोरडा कपडा किंवा पोत्याने वासराला चोळून कोरडे करावे.
  • जन्मल्याबरोबर वासराच्या नाका-तोंडातून कफ काढून टाकावा.
  • वासराची नाळ 2 ते 5 सें.मी. दूरवर बांधून त्यापुढे कापावी. त्यावर टींचर आयोडिन लावावे.
  • गोठा स्वच्छ करावा. चांगले वाळलेले गवत पसरावे.
  • वासरू कमजोर असल्यास त्याला उभे राहण्यास आणि दूध पिण्यास मदत करावे.
  • व्याल्यानंतर दूध उत्पादनासाठी गाई, म्हशीला मुबलक आहार द्यावा. आहारात गव्हाचा कोंडा, ओट तसेच अळशीच्या बियांचा समावेश असावा. व्याल्यानंतर ताजा हिरवा चारा द्यावा. स्वच्छ मुबलक पाणी पाजावे.

वासराला चीक पाजा...

  • गाय, म्हैस विल्यानंतरच्या पहिल्या दुधाला आपण चीक म्हणतो. हा चीक वासराच्या आरोग्यासाठी अत्यावश्‍यक असतो. त्यापासून वासराला रोगप्रतिकारशक्ती मिळते.
  • चिकामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक मुबलक प्रमाणात असतात.

वासरांना होणारे आजार

हगवण लागणे - 
1) हा आजार विशेष करून नवजात वासरांमध्ये आढळून येतो. साधारणतः जन्मल्यानंतर काही दिवसांत ते दोन महिने या कालावधीत हा आजार दिसतो. 
2) या आजारामुळे शौचावाटे पाणी निघून जाते आणि शरीरातील जलांश कमी होतो. आजारी वासरे ताप, पातळ संडास आणि अशक्तपणा अशी लक्षणे दाखवतात. वासरे अगदी मलूल होतात, नुसती पडून राहतात. 
3) या आजाराच्या प्रतिबंधासाठी सर्वांत महत्त्वाची उपाययोजना म्हणजे वासरांना वेळीच चीक पाजावा. चिकामध्ये असणाऱ्या घटकांमुळे वासरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वासरू जन्मल्यानंतर तीन ते चार दिवस त्यांना योग्य प्रमाणामध्ये चीक पाजावा.
न्यूमोनिया - 
1) या आजाराची लक्षणे म्हणजे ताप येणे, नाकामधून द्रवपदार्थ येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, वासरांना ढास लागणे आणि अशक्तपणा. 
2) योग्य वेळी उपचार केला नाही, तर वासरास मृत्यू येतो. या रोगाच्या उपचारासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा उपयोग आणि श्‍वासनलिकेतील अडथळा मोकळा करण्याची औषधे द्यावीत. 3) या रोगाच्या प्रतिबंधासाठी वासरांचा थंडी व खूप वाऱ्यापासून बचाव करावा, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. गोठ्यामध्ये ओलावा किंवा दमटपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी.

गोल कृमींचे संक्रमण

1) गोल कृमींच्या संक्रमणामुळे वासरांची वाढ खुंटते, क्वचितप्रसंगी वासराचा मृत्यूही संभवतो. या जंतांचा प्रसार हा मातेकडून वासरांना गर्भावस्थेमध्ये असतानाच होतो. हे जंत वासरांच्या आतड्यांमध्ये असतात व आतड्यांमधून पाचक रसाचे शोषण करतात. 2) बऱ्याच वेळा हे जंत वासरांच्या यकृतामध्ये जाऊन त्या ठिकाणचे कार्य बिघडवतात. जंतांच्या प्रादुर्भावामुळे वासरे अशक्त होतात, त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता जाणवते. 
3) वासरांच्या शेणाची तपासणी करून जंतांचे निदान करता येते. यावर उपाय म्हणजे जंतनाशक औषधींचा वापर करावा. जंतांच्या प्रतिबंधासाठी जनावरांची, तसेच गोठ्याची स्वच्छता ठेवावी. 

संपर्क - डॉ. एम. एस. बावस्कर 
(लेखक नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पशुप्रजननशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate