অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गाय- म्हैस उलटण्याची तपासा कारणे

गाय- म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्‍चित काळासाठी गर्भधारणा होत नाही. यासाठी पशुप्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. गाय- म्हैस उलटण्याची, तसेच गाभण न राहण्याची कारणे शोधून वेळीच औषधोपचार आणि सुयोग्य व्यवस्थापन केल्यास दोन वेतांतील अंतर, तसेच भाकडकाळ कमी होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान टाळता येते.
गाय- म्हैस उलटण्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख दोन कारणे म्हणजे त्यांचा माज ओळखता न येणे आणि पशुपालकाद्वारे माजाची दखल न घेणे. यामुळे माजाच्या योग्य वेळेत नैसर्गिक, कृत्रिम रेतन करता येत नाही. त्यामुळे पुढे आर्थिक नुकसान होऊ शकते.
अ) जनावरांतील माज ओळखू न येणे
बऱ्याच जनावरांमध्ये माजाची लक्षणे अस्पष्ट दिसून येतात, तसेच माजाचा कालावधी कमी असतो. गाई- म्हशींमध्ये रात्रीच्या वेळी माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पशुपालकाकडून जनावरांचा माज ओळखण्यात येत नाही. जनावरांच्या माजाकडे पशुपालकाचे दुर्लक्ष होऊन माजावर आलेली जनावरे वेळेवर भरली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ती नियमित अंतराने वारंवार माजावर येतात. 
ब) जनावरांच्या माजाच्या लक्षणांविषयी पशुपालकाचे अज्ञान
माजावर आलेल्या गाई- म्हशी बिनचूक न ओळखणे, त्यांच्यामधील माजाच्या लक्षणांविषयी माहिती नसणे, माजावरील जनावरांकडे दुर्लक्ष करणे इत्यादी कारणांमुळे जनावरे वेळेवर न भरली गेल्यामुळे वारंवार उलटतात. माजावरील गाय- म्हैस ओळखण्यासाठी माजाच्या लक्षणांची माहिती करून घ्यावी; तसेच कळपातील जनावरांच्या हालचालींकडे पशुपालकाने वारंवार लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे.

माजाची लक्षणे

  1. माजाची लक्षणे ही जनावरे स्पष्ट माजावर येण्यापूर्वीची लक्षणे, जनावरातील स्पष्ट पक्का माजाची लक्षणे आणि जनावरातील स्पष्ट पक्का माज संपल्यानंतरची लक्षणे या तीन प्रकारांत मोडतात. जनावरे स्पष्ट माजावर येण्यापूर्वी कळपातील दुसऱ्या जनावरांबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करतात. कळपातील इतर जनावरांवर उड्या मारतात. गाय- म्हैस अधूनमधून हंबरते, कान टवकारते, अस्वस्थ आणि बेचैन होते, त्यांची भूक मंदावते, दूध कमी होते, गोठ्यामध्ये फिरण्याचे प्रमाण वाढते, योनीचा भाग किंचित लालसर ओलसर आणि सुजल्यासारखा दिसतो. स्पष्ट माज येण्यापूर्वी गाई- म्हशीमधील लक्षण म्हणजे तिच्या पाठीवर जनावरे उड्या मारत असतील तर ती शांत उभी न राहता पुढे पळत जाते. म्हशीमधील वरील सर्व माजाची लक्षणे दिसतीलच असे नाही. म्हशींमध्ये मुका माज दाखविण्याचे प्रमाण अधिक असते.
  2. स्पष्ट माजावर आलेली गाय- म्हैस कळपातील वळूकडे आकर्षित होऊन जवळ जाऊन उभी राहते. तिच्यावर वळू किंवा दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असल्यास माजावर आलेली गाय- म्हैस स्थिर उभी राहते यालाच आपण "पक्का माज, खडा माज' असे म्हणतो. माजावर आलेली गाय- म्हैस शेपटी उंचावून वारंवार लघवी करते. योनीमार्गातून पारदर्शक काचेसारखा स्वच्छ चिकट स्राव/ सोट तारेसारखा बाहेर लोंबकळू लागतो आणि तो जनावराच्या शेपटीवर तसेच मागील भागावर चिकटलेला आढळून येतो. माजावर आलेल्या जनावराचे तापमान 0.5 अंश ते एक अंशाने वाढते. गाई- म्हशीमध्ये माजाची वरील लक्षणे आढळून आल्यावर कृत्रिम, नैसर्गिक रेतन करण्याचा योग्य कालावधी आहे.
  3. स्पष्ट, पक्का माज संपल्यानंतर दोन- तीन दिवसांनी बहुतांश गाईंच्या योनीमार्गातून थोड्या प्रमाणात रक्तस्राव बाहेर पडताना दिसतो. माज संपल्यानंतर गाईच्या शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण वाढत जाते. गर्भाशयाच्या आतील आवरणात असलेल्या ग्रंथीवर या संप्रेरकाचा प्रभाव होऊन त्या ग्रंथीमधून रक्तस्राव होतो. ही एक नैसर्गिक बाब आहे.

गाई- म्हशींचे व्यवस्थापन

  1. गाई- म्हशींसाठी ओळख क्रमांक - गाय- म्हैस ओळखण्यासाठी तिच्या कानामध्ये अथवा गळ्यामध्ये ओळख क्रमांक असणे आवश्‍यक आहे. यामुळे माजावर आलेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांची नोंद घेणे सोयीचे ठरते.
  2. गोठ्याची रचना व प्रकाशव्यवस्था - गोठा पुरेसा मोठा आणि स्वच्छ असावा. गोठ्यामध्ये स्वच्छ खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश तसेच रात्रीच्या वेळी दिव्यांचा प्रकाश असावा. यामुळे माजावर आलेली जनावरे ओळखण्यास मदत होते.
  3. गाई- म्हशींच्या प्रजननाविषयी नोंदवही - नोंदवहीमध्ये पशुपालकाने कालवडीची जन्म तारीख, प्रथम माजावर आल्याची नोंद, सोटाचे वर्गीकरण, कृत्रिम/ नैसर्गिक रेतन केल्याची तारीख, वापर केलेल्या वळूची नोंद, गर्भ तपासणीची तारीख, गाभणकाळ, विण्याची अंदाजे तारीख, व्याल्याची तारीख, प्रसूतिकाळात आणि पश्‍चात आजाराची नोंद, वासराचे वजन आणि लिंग, दैनंदिन दुधाची नोंद, विल्यानंतर माजावर आल्याची तारीख, भाकडकाळ इत्यादी बाबींचा उल्लेख असावा.
  4. कळपातील प्रत्येक जनावरावर लक्ष ठेवणे - पशुपालकाने जनावरांच्या हालचालींवर दिवसातून कमीत कमी चार वेळा म्हणजे पहाटे, सकाळी, संध्याकाळी आणि रात्री अर्धा- अर्धा तास लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. बहुतेक जनावरांमध्ये माजाची लक्षणे रात्री अथवा पहाटे स्पष्ट दिसून येतात.
  5. गाई- म्हशींना मुक्त निवारा पद्धतीचा वापर करणे - ठाणबद्ध गाई- म्हशींपेक्षा मुक्त निवारा पद्धतीमध्ये जनावरे माजाची लक्षणे स्पष्ट दाखवितात. पशुपालकाला कळपातील माजावर आलेली मादी ओळखून वेगळी करता येते. जनावरांना दूध काढून झाल्यानंतर आणि आंबवण दिल्यानंतर मुक्त निवारा पद्धतीच्या गोठ्यामध्ये सोडावे. गोठ्यात मुबलक स्वच्छ पाणी, चारा- गवत असावे. गोठ्यातील जमीन निसरडी नसावी.

गाई- म्हशींतील माज ओळखण्याच्या आधुनिक शास्त्रोक्त पद्धती

  1. गाई- म्हशींच्या प्रजनन काळाविषयी माहिती देणारा गोलाकार तक्ता - जनावरांच्या प्रजननाविषयी सर्व नोंदी असल्यास पुढील माजाच्या तारखा, विण्याच्या तारखा या तक्‍त्याच्या आधारे बिनचूक बघता येतात.
  2. कळपात नसबंदी केलेला वळू सोडणे ः गाई- म्हशींच्या कळपांमध्ये नियमित माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू सोडण्यात येतो.
  3. जनावरांच्या पायाची गती मोजण्यासाठी पायाला बसविण्याचे उपकरण - माजावर आलेली जनावरे माजाच्या कालावधीत माजावर नसतानाच्या कालावधीपेक्षा दुप्पट चालतात. या यंत्रावर दर्शविलेल्या आकड्यांवरून कळपातील माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.
  4. जनावरांचा माज ओळखण्यासाठी श्‍वानांचा वापर - काही देशांमध्ये कळपातील जनवारांचा माज ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिलेले श्‍वान, कुत्रे दररोज विशिष्ट वेळी कळपात सोडण्यात येते. हे श्‍वान जनावरांचा पार्श्‍वभाग हुंगते आणि माजावर आलेली जनावरे शोधून काढते.
  5. जनावरातील "माजाचे संनियंत्रण' - कळपातील अनेक जनावरांना एकाच वेळी एकाच दिवशी माजावर आणण्यासाठी सर्व गाई- म्हशींना "प्रोस्टॉग्लॅडिन' घटक असलेले इंजेक्‍शन देण्यात येते. माजावर आल्यानंतर एकाच वेळी सर्व जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करून घेता येते.
  6. रक्तातील- दुधातील "प्रोजेस्टेरॉन'चे प्रमाण - जनावरांच्या रक्तातील- दुधातील "प्रोजेस्टेरॉन' या संप्रेरकाच्या प्रमाणावरून जनावर माजावर आहे किंवा नाही याचे निदान करता येते. माजावर असलेल्या जनावरांच्या दुधातील- रक्तातील प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण अत्यल्प असते.
  7. सिद्ध वळूच्या साह्याने नैसर्गिक पैदास - ज्या वेळी पशुपालकांना गाई- म्हशींमधील माज ओळखणे शक्‍य होत नाही, अशा वेळी कळपामध्ये उत्कृष्ट प्रजनन क्षमता असलेला सिद्ध वळू सोडल्यास माजावर आलेली जनावरे ओळखून नैसर्गिक पैदासीद्वारे गर्भधारणा घडवून आणता येते.

संपर्क - 
(लेखक पशुतज्ज्ञ आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate