गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये
गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे.
१. दुध उत्पादनासाठी – उदा. सहिवाल, रेड सिंधी, गिर, हरियाणा इ.
२. शेती कामासाठी – उदा. खिल्लारी, गवळाऊ, कांगायम, डांगी इ.
३. दुहेरी उपयोगासाठी- थारपारकर, देवणी, ओंगोल, हरियाणा यापैकी काही महत्वाच्या जातींची वैशिष्ट्ये खालील प्रकारे आहेत.
देशी गायी
सहिवाल
या गायीचा मूळ पंजाबमध्ये व द्क्षिण पंजाबमधील रवी नदीचे खोरे व पाकिस्तानमधील मोंटेगोमेरी जिल्हा आहे. सहिवाल गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी २१०० लिटर असते. त्यांचे सरासरी आयुष्य १५ वर्षांचे असते.
गीर
गुजरात राज्यातील काठेवाडच्या दक्षिणेकडील गीर टेकड्या व जंगल हा या जनावरांचा मूळ प्रदेश होय. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी उत्पन्न २१०० लिटर व सरासरी आयुष्य १५ वर्ष असते.
सिंधी
पाकिस्तान मधील कराची व हैद्राबाद हे या जनावरांचे मूळ स्थान असून ती आकाराने लहान व बदलत्या हवामानशी समरस होऊ शकतात. या गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी उत्पन्न २३०० लिटर व आयुष्यमान १५ वर्षे असते.
गौळाऊ
महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील काही भागातील हि जात मध्यम उंचीची , हलक्या बांध्याची, रुंद व लांबट शरीराची असते.डोके अरुंद व खाली निमुळते असते. कपाळ सपाट, डोळे बदामी आकाराचे व उंच असतात. शिंगे आखूड असून काहीशी मागे वाळलेली असतात. मन आखूड व खांदा एका बाजूला थोडा झुकलेला असतो.पाय सरळ व मजबूत, पोळ खूपच लोंबती आणि शिस्न मध्यम आकाराचे असते. अंगावरील कातडी सैल असते. शेपटी आखूड व रंग पंधरा असतो. बैल चपळ असून शेती व वाहतुकीकरिता उत्तम असतात.
देवणी
आंध्रप्रदेश, महाराष्ट्रचा उत्तर आणि पश्चिम भाग, बीड व नांदेड जिल्हे हा या जनावरांचा मुल प्रदेश आहे. यांचा बंध मध्यम असून गिर जातीच्या गुरांशी याचे बरेच साम्य असते. अंगावर काळे-पांढरे ठिपके असतात. कपाळ फुगीर व कान लांब असून शिंगे वळणदार असतात. बैल शेतीसाठी व ओझे वाहण्यासाठी उपयुक्त असतात. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस, सरासरी उत्पन्न १,१०० लिटर व सरासरी आयुष्य १५ वर्षे असते.
विदेशी गायी
जर्सी
इंग्लिश खाडीतील जर्सी बेटातील या गायी विदेशी गुरांमधील लहान जातीची जनावरे होत. या गुरांचा रंग लालसर पिवळा असून या रंगाच्या निरनिराळ्या छटा दिसतात. वळूमध्ये रंग काळसर पण असतो. काही गुरांच्या अंगावर पांढरे चट्टे आढळतात. इतर विदेशी गुरांच्या मानाने हि गुरे उष्ण हवामान चांगल्या रीतीने सहन करू शकतात. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस, सरासरी उत्पन्न ४००० लिटर तर सरासरी आयुष्य १२ वर्षे असते.
होलस्टीन फ्रिजीयन
हॉलंड या युरोपीय देशातील हि गुरे आकारमानाने मोठी असतात. त्यांचा रंग संपूर्ण पांढरा किंवा काळेपांढरे पत्ते असतात . काही गुरे लाल पांढर्या रंगाचेही आढळतात. पायाचा खालील भाग व शेपटीचा गोंडा पांढरा झालेला असतो. हि गुरे दुध उत्पादनाकरीता जगभर प्रसिद्ध आहेत. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवसांचा असतो. सरासरी उत्पन्न सर्वात जास्त म्हणजे ६००० लिटर असून सरासरी आयुष्य मात्र १२ वर्षांचे असते?
ब्राऊन स्विस
स्वित्झर्लंड या युरोपीय देशातील हि गुरे आकारमानाने मोठी असतात. त्यांचा रंग तपकिरी असून या रंगाच्या विविध छटा असतात. काही गुरांचा रंग काळसर असतो. फिक्या रंगांच्या जनावरांमध्ये कातडीवर रुपेरी रंगांची छटा दिसते. काही गायींचा पोटाखालील भाग व कस पांढरी असते. गायींचा दुध देण्याचा कालवधी ३०० दिवस सरासरी उत्पन्न ५००० लिटर व सरासरी आयुष्य १२ वर्षे असते?
स्त्रोत - संपदा ट्रस्ट, अहमदनगर