অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जनावरांतील पोटफुगीवर

जनावरांतील पोटफुगीवर उपचार

पोटफुगी आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे उदराच्या भागात फुगोटी होय. काही पशुपालक गाय- म्हैस व्याल्यानंतर जास्त दूध मिळावे म्हणून त्यांना जास्त पिष्टमय पदार्थयुक्त, प्रथिनयुक्त चारा, कोंडा, शेंगदाणा व सरकी पेंड खाऊ घालतात. सोयाबीनचे व तुरीचे भुसकट, मुगाचा व उडदाचा वाळलेला पाला जनावरांस प्रमाणाबाहेर दिल्यास मलावरोध होऊन पोट फुगते. केवळ लुसलुशीत हिरवी वैरण किंवा प्रथिनयुक्त हिरवा चारा प्रमाणाबाहेर खाऊ घातल्यासही पोटफुगी उद्‌भवते. उन्हाळ्यात उपासमार झालेली जनावरे पावसाळ्यात उगवलेले हिरवे, कोवळे, लुसलुशीत गवत अधाशीपणे खातात व पोटफुगीस बळी पडतात.

जित्राबाच्या चाऱ्यामध्ये विषारी घटक आल्यास किंवा आतड्यामध्ये कृमींचे प्रमाण वाढल्यास पोटफुगी उद्‌भवते. त्याचबरोबर काही कारणाने लाळनिर्मिती घटल्यास पोटफुगी बळावते. काही वेळा जनावरांच्या खाण्यात चपला, चिंध्या, आंब्याची कोय, कांदा, बटाटा, आल्यामुळे ते घशात किंवा अन्ननलिकेत अडकले जातात, त्यामुळे पोटातील वायू तोंडावाटे बाहेर पडणे बंद होऊन जनावर फुगते. जनावराच्या दुसऱ्या पोटात किंवा छातीच्या पडद्याला सुई, खिळा, तारेचा तुकडा किंवा इतर टोकदार वस्तूंमुळे इजा झाल्यास रवंथ थांबते, पोटाची हालचाल मंदावते आणि पोटफुगी वारंवार उद्‌भवते. धनुर्वात, दुग्धज्वर, पचनेंद्रिय अवयवाचा हर्नियामध्ये त्याचबरोबर आतड्याला पीळ पडल्यास जनावराचे पोट फुगू शकते.

लक्षणे

या आजाराची लक्षणे म्हणजे पोटफुगीत रोमंथिकेस अचानक फुगोटी पकडते. जनावराचे रवंथ करणे बंद होते, बाधित जनावर अस्वस्थ होत असून सतत ऊठ-बस करते. जनावरे पोटावर लाथा मारतात व जमिनीवर लोळणदेखील घेतात. विपुल प्रमाणात लाळस्रावदेखील होतो. डाव्या बाजूच्या खुब्याचे, माकड हाडाचे टोक व शेवटची बरगडी यामधील भाग फुगतो. ती जागा बोटाने वाजवली तर नगाऱ्यासारखा आवाज येतो किंवा "बदबद' आवाज येतो. पोटफुगी तीव्र स्वरूपाची असेल तर श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो.

उपाययोजना

ओल्या गवतावर चरून येताच जनावरास लगेचच पाणी पाजू नये. कापलेले हिरवे गवत काही तास सुकू द्यावे व नंतर जनावरास घालावे. पावसाळ्यामध्ये जनावरे चरावयास सोडण्यापूर्वी थोडी वाळलेली वैरण खायला घालावी. जनावरास शिळे अन्न देऊ नये. प्रमाणाबाहेर शेंगवर्गीय चारा उदा. लसूणघास, बरसीम गवत खायला देऊ नये. बाधित जनावरास प्रथमावस्थेत थोडे चालवावे. जनावराच्या तोंडात अंगठ्याच्या जाडीचा दोर किंवा लाकूड ठेवावे व गळ्याभोवती दोन्ही बाजूने बांधावे, त्यामुळे लाळनिर्मिती होऊन वायू मुक्त होण्यास मदत होते. ताबडतोब पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. 

संपर्क- डॉ. सचिन हगवणे- 9881441658

- सखाराम देसले, चांदूर बाजार, अमरावती

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate