অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जनावरांना पुरेसे खाद्य

शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा. पिण्याचे पाणी स्वच्छ असावे.

साधारणपणे हिवाळ्यात एखाद्या वेळेस शीत लहरी आल्यास तापमानात खूप घट होते. जनावरे गोठ्याबाहेर बांधलेली असल्यास थरथर कापायला लागतात. शारीरिक तापमान संतलित राखण्यासाठी ऊर्जा खर्च झाल्याने, त्यांच्या दूधउत्पादनात जवळपास वीस टक्के एवढी घट होते. 
1) थंडी जास्त असल्याने जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. जर थंडी वाढू लागली तर जनावरे प्रथमतः गोठ्यात बांधावीत. गोठ्याच्या खिडकीस रिकाम्या पोत्यांचे किंवा गोणपाटांचे पडदे लावावेत. गोठ्याची दारे बंद ठेवावीत. यामुळे बाहेरील थंड हवा आत येणार नाही. 
2) थंडीच्या काळात लहान वासरांकरिता गोणपाटाची झूल तयार करून त्यांच्या अंगावर घालावी. लहान वासरांना झूल बांधल्याने त्यांना उबदार वाटते. लहान वासरांना फुफ्फुसदाहापासून संरक्षण मिळते. 
3) शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. 
4) हिवाळ्यात म्हशीच्या त्वचेला भेगा पडतात. त्यामुळे त्वचा खरबडीत होते व खाज सुटते. म्हणून म्हशीच्या त्वचेला एरंडीचे तेल लावावे, जेणेकरून त्वचा नरम राहील व भेगा पडणार नाहीत.

गोठ्याचे व्यवस्थापन

1) गोठ्यावरील छत सहसा टीन पत्र्याचे नसावे, कारण उन्हाने ते तापून आणखी उकाडा निर्माण होतो. जर छत टीन पत्र्याचे असेल, तर वरील भागास पांढरा रंग किंवा चुना लावावा. त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होऊन जनावरांना उष्णतेचा त्रास कमी होईल. टीन पत्र्याच्या आतील भागाला हिरवा रंग द्यावा. त्यामुळे गोठ्यातील उष्णता शोषली जाते. गोठा थंडगार राहण्यास मदत होईल. गोठ्याच्या बाहेरील भागाला पोती किंवा गोणपाट बांधावे. 
2) पावसामुळे वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने, गोठ्यातील परिसर नेहमी ओलसर असते. त्यासाठी गोठ्यात खड्डे असतील तर मुरूम टाकून मलमूत्राचा निचरा होईल या दृष्टीने उतार ठेवावा. 3) गोठ्यातील जमीन कोरडी राहण्यासाठी चुना व गव्हाच्या किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर अंथरावा, जेणेकरून आर्द्रता कमी होईल.

खाद्य, पाण्याचे नियोजन

1) ज्या खाद्य प्रकारामुळे शारीरातील ऊर्जा वाढेल, अशा प्रथिनांचा पुरवठा वाढवावा. जनावरांचे योग्य आरोग्य राखता येईल अशा खाद्य घटकांचा आहारात सामावेश करावा. कोरड्या चाऱ्याचे प्रमाण कमी करून हिरवा चारा जनावरांना द्यावा. त्याचबरोबर सोयाबीन अवशेष, गहू व तांदूळ यांचा भरडा खाद्यात द्यावा. त्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा. पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. 
2) चारा खाऊ घालण्यापूर्वी व वैरणाची प्रत वाढविण्यासाठी चाऱ्यावर दोन टक्के मिठाचे पाणी फवारून नंतर खाण्यात द्यावे. यामुळे चाऱ्याची चव वाढते. जनावरांच्या पोटात थंडावा निर्माण होतो. याचा आणखी एक फायदा असा आहे, की जनावरे पाणी जास्त पितात, मिठाच्या पाण्याच्या फवारणीमुळे खाल्लेल्या अन्नाची पाचकता वाढते. जास्त पाणी प्यायल्याने जनावरांच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. 
3) जनावरांना गुळाचे पाणी पाजल्यासही पोटात गारवा तयार होतो. शरीरातील साखरेची गरज भागविली जाते. 
4) म्हशी, गाईंप्रमाणे शारीरिक तापमान संतुलित राखू शकत नाहीत म्हणूनच म्हशीला उन्हाचा त्रास जास्त होतो. त्यामुळे गाईंपेक्षा म्हशींची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. 
5) आर्द्रता वाढल्याने गोठ्यात ओलसरपणा राहतो. त्यामुळे जंतू व माश्‍या यांची संख्या वाढून सांसर्गिक रोगांचे प्रमाण वाढते. त्यावर नियंत्रण ठेवावे. 
6) पावसानंतर माळरानावर हिरवे नवीन गवत उगवते. जनावरे हिरवा चारा जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे पोटाचे विकार उद्‌भवतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याची कुट्टी द्यावी. 
7) साधारणपणे या काळात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण जास्त असते किंवा नुकतीच व्यालेली असतात, अशा वेळेस चयापचय क्रियेवर ताण आल्याने जनावरांना काही नवीन व्याधी होतात. 
8) जनावरांचा चारा किंवा खाद्याची साठवणूक कोरड्या जागेवर करावी, जेणेकरून खाद्य ओले होणार नाही. चारा किंवा खाद्य ओले झाल्यास त्यावर बुरशी लागते. बुरशीग्रस्त चारा खाल्ल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

प्रजनन व्यवस्थापन

1) भाकड जनावरांच्या संगोपनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने आणि दुध उत्पादन सातत्याने राहण्याकरिता प्रजनन नियीमतपणे असणे महत्त्वाचे आहे. 
2) मुबलक प्रमाणात हिरवा चारा असल्याने त्यांना त्यातून प्रजननासाठी आवश्‍यक असलेले घटक मिळतात. 
3) व्यालेल्या जनावरांची वार वेळेत पडली नाही, तर पशुवैद्यकाच्या मदतीने ती काढून घ्यावी. तसेच जनावर व्यायल्यानंतर आठ ते दहा दिवस मायांगाची चांगली स्वच्छता ठेवावी. योनीतून स्त्राव येत असल्यास त्यावर उपचार करावेत. 
4) वयात आलेल्या, परंतु माजावर न येणाऱ्या जनावरांना तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासून उपचार करावेत. 
5) सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे वातावरणात रोगप्रसार करणारे जे कीटक व माश्‍या असतात, त्यांच्यात फरक पडत चालला आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशात डास, ढेकूण, कीटक व माश्‍या हे सांसर्गिक रोगप्रसाराचे काम करतात. 
6) अचानक खूप पाऊस पडल्याने, कधी कधी ऊन येणे यामुळे वातावरणात आर्द्रता तयार होते. वातावरण दमट होते. त्यामुळे कीटक व माश्‍यांची संख्या वाढत असते. परिणामतः जनावरांमध्ये रोगप्रसार मोठ्या झपाट्याने होतो. तसेच सांसर्गिक रोगजंतू यांच्यातसुद्धा काही आनुवंशिक बदल झाल्याने, रोगप्रसार रोखणे किंवा प्रतिबंधित करणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे एकात्मिक पद्धतीने जनावरांचे व्यवस्थापन ठेवावे.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate