অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाल कंधारी

लाल कंधारी

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्‍यातील ही प्रजाती सध्या नांदेडसह परभणी, लातूर, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात आढळून येते. चौथ्या शतकापासून या जातीचे अस्तित्व दिसून येते. राजा सोमदेवराय यांनी या पशुधनाचे संगोपन आणि संवर्धन केलेले आढळून येते. कमी दूध, मात्र शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही जात असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व तालुक्यात शेतकऱ्यांना पसंत पडणारी आहे.शेतीकामातील या जातीची उपयुक्तता लक्षात घेता. शेतकऱ्यांनी लाल कंधारी जातीच्या संगोपन व संवर्धनास सध्या प्राधान्य दिले आहे. सन १९७५-८० या काळात याबाबत मोठ्या प्रमाणात परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले व तसा अहवाल केंद्रशासनाच्या नॅशनल ब्यूरो ऑफ जेनेटिक रिसोर्स या संस्थेकडे पाठवून सन १९८९ मध्ये या प्रजातीला मान्यता मिळवली. शेतीकामासाठी बैल अत्यंत उपयुक्‍त असल्यामुळे यांची संख्या देखील मराठवाड्यात वाढू लागली आहे. या जातीची जनावरे ही मध्यम आकाराची, धडधाकट व दिसण्यास देखणी अशी असतात. प्रमाणबद्ध शरीर आणि त्याच प्रमाणात पायांची रचना असते. अत्यंत चपळ असणाऱ्या या प्रजातीचा रंग लाल ते तपकिरी असून, विशेषतः गायी या फिकट तांबड्या/तपकिरी रंगाच्या व वळू /बैल हे तांबडे/तपकिरी रंगाचे आढळून येतात. मजबूत, डौलदार व काळसर खांदा हे वळूंचे वैशिष्ट्य आहे. शेपटीचा गोंडा काळा असतो. तसेच खूर व नाकपुडीदेखील काळी असते. सड/निरण देखील काळे असून, कान दोन्ही बाजूला समान अंतरावर लोंबकळणारे असतात. मोठे कपाळ व थोडे पुढे आलेले, डोळे काळे पाणीदार व भोवती काळे वर्तुळ असणारे, शिंगे तळात जाड व टोकाला निमुळती असतात. मान आखूड व सरळ असते. मानेखालील पोळी मध्यम आकाराची व घड्या असणारी असते.

पाठ मध्यम लांबीची व रुंद असते. कास लहान व शरीराबाहेर असते.

दूध उत्पादन कमी असल्यामुळे दुधाच्या शिरा क्वचितच आढळतात. प्रतिदिन दूध :उत्पादन हे १.५ ते ४.० लिटर पर्यंत आहे. या जातीची प्रतिकारशक्‍ती अत्यंत चांगली असून त्यावरील व्यवस्थापन खर्चदेखील कमी आहे. दोन वेतातील अंतर १४ ते १६ महिने असून, कालवडी वयाच्या ३० व्या महिन्यात गाभण राहतात. मराठवाड्यातील एकंदर परिस्थिती पाहता व सिंचन सुविधांचा विचार करता पशुपालकांसाठी अत्यंत कमी व्यवस्थापनात चांगले शेती काम करणारी ही जात आहे. परंतु, येणाऱ्या काळात लाल कंधारीचे एकूणच संवर्धन व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी पशुपालकांची पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अनुवांशिक सुधारणा कार्यक्रमात सक्रिय सहभागदेखील नोंदविणे तितकेच महत्त्वाचे आहे.

 

 

लेखक- डॉ. व्यंकटराव घोरपडे

स्रोत- शेतकरी मासिक

 

 

 

 

 

अंतिम सुधारित : 4/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate