অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीच्या प्रजाती होताहेत लुप्त

 

ऑस्ट्रियातील सर्वेक्षण आणि संशोधन



जगभरातील स्थानिक पातळीवर आढळणाऱ्या शेळीच्या अनेक प्रजातींची संख्या वेगाने कमी होत असल्याचे ऑस्ट्रिया (स्पेन) येथील संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षण आणि संशोधनात आढळून आले आहे. रवंथ करणाऱ्या लहान प्राण्यांतील जैवविविधता कमी होण्याचा धोका असून या संवेदनशील प्रजाती वाचविण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवणे गरजेचे ठरणार आहे.

शेळी हा अतिशय काटक आणि पर्यावरणाला सहनशील असा प्राणी आहे. ग्रामीण पातळीवर दूध आणि मांसासाठी त्यांचा प्रामुख्याने वापर होतो. हा प्राणी अतिशय तीव्र हवामान असलेल्या प्रदेशातील लोकांची दुग्धजन्य व प्राणिज प्रथिनांची गरज भागवतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक जातीच्या पशूंचे पालन व्यावसायिक स्वरूपामध्ये केले जात असल्याने स्थानिक प्रजाती वेगाने कमी होत चालल्या आहेत. नुकत्याच ऑस्ट्रिया (स्पेन) येथील संशोधकांनी केलेल्या जागतिक अभ्यासात जगातील शेळीच्या अनेक प्रजाती लुप्त होत असल्याचे दिसून आले आहे.

शेळी फायद्याची


  • पालनासाठी अन्य जनावरांच्या तुलनेत कमी खर्च.
  • मांसामध्ये उच्च दर्जाची प्रथिने
  • काही शेळ्या या खास लोकरीसाठी पाळल्या जातात. (भारत, चीन मंगोलिया येथील कॅशमिरी शेळी ही लोकरीसाठी प्राधान्याने सांभाळली जाते.)
  • शेळीचे दूध हे अधिक आरोग्यदायी मानले जाते.

काय आहे हा अभ्यास?


  • ऑस्ट्रियातील कृषी, अन्न संशोधन आणि विकास प्रादेशिक सेवा (SERIDA) या संस्थेतील संशोधकांनी शेळीचे चरणे, त्यांचे अन्य गवत खाणाऱ्या प्राण्यांशी असलेले संबंध आणि जैवविविधता संवर्धन या विषयावर अभ्यास केला आहे.
  • या अभ्यासात शेळ्यांची जागतिक संख्या, त्यांच्या विविध प्रजाती, संवर्धनासाठीचे प्रयत्न, अन्य जंगली आणि पाळीव प्राण्यांशी असलेले संबंध, तसेच शेळ्यांच्या चरण्यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे विश्‍लेषण केले आहे.
  • सध्या मर्यादित शेळी प्रजातींचा वापर पशुधन सांभाळताना केला जात असल्याने नैसर्गिक जनुकांची विविधतेत प्रचंड घट झाली आहे. विशेषतः युरोपमध्ये अनेक स्थानिक शेळी प्रजातींची संख्या कमी झाली असून जगातील अनेक ठिकाणची परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याचे संशोधिका रोको रोसा ग्रासिया यांनी सांगितले.
  • हिमालयीन प्रदेशापासून पठारी प्रदेशापर्यंत जगातील विविध भागातील शेळ्यांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागामध्ये शेळ्यांचे अन्य जनावरांच्या तुलनेत स्पर्धात्मक विश्‍लेषण करण्यात आले. त्यातून अधिक संवेदनशील अवस्थेत असलेल्या शेळी प्रजाती वाचविण्यासाठी प्रयत्न करणे शक्‍य होणार आहे.

शेळीची वैशिष्ट्ये


  • पशुधनातील अन्य प्रजाती तग धरून राहू शकणार नाही, अशा ठिकाणीही काटक शेळ्या तग धरून राहू शकतात.
  • शेळ्यांच्या चरण्याच्या सवयीमुळे पर्यावरणातील काही घटकांचे नुकसान होत असले तरी अनेक गवताच्या प्रजातींची वाढ आटोक्‍यात ठेवण्यासाठी शेळ्याच महत्त्वाची भूमिका निभावतात.
  • कठीण आणि तीव्र वातावरण असलेल्या डोंगरी, वाळवंटी आणि निमवाळवंटी प्रदेशामध्ये शेळ्या पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच गरीब मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे.
  • स्थानिक प्रजाती या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्यांच्या चरण्यामुळे रानात लागणाऱ्या वणव्याचा धोका काही अंशी कमी होतो. तसेच वेगाने वाढणारी अनेक धोकादायक गवते त्यांच्यामुळे नियंत्रणात राहण्यास मदत होते.

का कमी होताहेत शेळी प्रजाती?


  • शिकार- मारखोरसारख्या शेळीची शिकार ही माणसांच्या काटकतेचा, दमसासाची परीक्षा पाहणारी असते. त्यामुळे प्रतिष्ठेच्या कारणांसाठी इंग्रजांच्या कालखंडापूर्वीपासून या शेळीची शिकार केली जाते.
  • चारा क्षेत्र अन्य व्यावसायिक प्राण्यांसाठी राखून ठेवली जात असल्याने स्थानिक प्रजातींकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भारतीय उपखंडामध्ये स्थानिक प्रजातींऐवजी कॅशमिरी जातीच्या शेळ्यांची लोकरीसाठी अधिक प्रमाणात जपणूक केली जाते. त्याचे परिणाम पर्यावरणावर होत असून, अनेक स्थानिक जाती भारत, चीन, मंगोलियातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
  • जंगले आणि चराईच्या क्षेत्राचे योग्य व्यवस्थापन नसल्याने शेळ्यांचे रहिवास कमी होत आहेत.

जगभरातील लुप्त होणाऱ्या महत्त्वाच्या शेळी प्रजाती


1) उत्तर अमेरिकेतील ओरामनोज अमेरिकॅनस या प्रजातीची शेळी ही माऊंटन गोट या नावाने ओळखली जाते.
  • तीव्र उतार आणि अवघड प्रदेशामध्ये सहजतेने चढू उतरू शकणारी ही शेळी 4.5 फूट लांबीची असून, वजन साधारणपणे 100 ते 200 पौंड इतके असते. उंची 36 ते 48 इंच इतकी असते. नरापेक्षा मादी 30 टक्‍क्‍यांनी लहान असते.
  • गोलाकार शरीरामुळे थंडीपासून बचाव होतो.


2) पाकिस्तानमधील मारखोर शेळी (Capra falconeri)
पाकिस्तानचा राष्ट्रीय सस्तन प्राणी मानला जात असला तरी ही जंगली शेळीची प्रजात धोक्‍यामध्ये आहे. 1991 मध्ये केवळ 40 ते 50 शेळ्यांपासून या शेळ्यांची संख्या प्रयत्नांती पंधराशेपर्यंत पोचली आहे. अर्थात ही शेळी अद्यापही धोक्‍यामध्ये आहे.
ओळख - गोलाकार शिंगे (नरामध्ये शिंगे 1.5 मीटरपेक्षा अधिक लांबीपर्यंत वाढू शकतात. लांबी 130 ते 180 सें.मी., शेपटी 8 ते 14 सें.मी., वजन : नर 110 किलो, मादी वजन-32 ते 50 किलो.

भारतातील धोक्‍यात असलेल्या शेळी प्रजाती


  • जमनापारी : उत्तर प्रदेशातील आग्रा, मथुरा, इटावा मध्य प्रदेशातील भिंड आणि मोरेना जिल्ह्यांत आढळत असली तर शुद्ध प्रजाती इटावा जिल्ह्यातील सुमारे 80 खेड्यामध्ये आहे.
  • सुरती : सुरत आणि बडोदा आढळणारी ही शेळीची प्रजातींची संख्या वेगाने कमी होत आहे. ही जात अधिक दूध देणारी आहे.
  • संगमनेरी : पुणे आणि नगर जिल्ह्यांमध्ये आढळणारी ही प्रजाती दूध आणि मांसासाठी पाळली जाते.
  • निलगिरी ताहेर (Nilgiritragus hylocrius) : ही पश्‍चिम घाटाच्या दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये आढळणारी जंगली प्रजाती आहे. ही तमिळनाडूचा राज्य प्राणी असून धोक्‍यात असलेली प्रजाती आहे.

भारतामध्ये शेळीच्या जमनापारी, सुरती आणि संगमनेरी या पाळीव प्रजातींची संख्या वेगाने कमी होत असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनुकीय विविधतेच्या दृष्टीने शेळीच्या प्रजाती महत्त्वाच्या आहेत. कर्नाल येथे "नॅशनल ब्युरो ऑफ जेनेटिक रिसोर्सेस' ही संस्था सर्व प्रकारच्या पशू-पक्षी, पाळीव प्राणी यांची जैवविविधता जतन व संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. तसेच केंद्र शासनाच्या साह्याने विद्यापीठामध्ये संगमनेरी शेळी जतन प्रकल्प सुरू आहे.

- डॉ. संजय मंडकमाले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, संगमनेरी शेळी संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

गेल्या दहा वर्षांपासून बंदिस्त शेळीपालनाचा उद्योग करत आहे. आज माझ्याकडे आफ्रिकन बोअर जातीच्या लहान मोठ्या 200 शेळ्या आहेत. या शेळ्यांची मी मांसासाठी विक्री करत असून, एका शेळी (व तिची दोन वेतांतील पिल्ले) यापासून सर्व खर्च वजा जाता साधारणपणे दहा हजार रुपये मिळतात. माझे अठरा जणांचे एकत्रित कुटुंब प्रामुख्याने शेळीपालनावर चालते.

- संदीप तुकाराम शिसाळ, 9226395206 पलुस, जि. सांगली

भारतातील प्रमुख शेळी प्रजाती

  • सिरोही : राजस्थान आणि गुजरातमधील पालनपूर भागामध्ये आढळणारी जात.
  • मारवारी : राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये विशेषतः मेहसाणा जिल्ह्यात ही जात आढळते.
  • बीटल : पंजाब आणि हरियानामध्ये आढळते. दुधासाठी पाळली जाणारी जात आहे.
  • झाकराणा : राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील झाकराणा आणि काही खेड्यांत आढळते. अत्यंत मर्यादित प्रदेशामध्ये आढळणाऱ्या या जातीच्या जनावरांची संख्या वेगाने कमी होत आहे.
  • बारबारी : उत्तर प्रदेशातील उटाह, आग्रा आणि अलिगड तसेच राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात आढळते. दूध आणि मांसासाठी पाळली जाणारी ही जात आहे.
  • मेहसाणा : गुजरातमधील बनसकांथा, मेहसाणा, गांधीनगर आणि अहमदाबाद जिल्ह्यांमध्ये आढळते. दूध आणि केसांसाठी प्रसिद्ध.
  • गोहीलवाडी : गुजरातमधील भावनगर, अमरेली, जुनागढ जिल्ह्यांत. दूध आणि केसांसाठी प्रसिद्ध.
  • झालावाडी : गुजरातमधील सुरेंद्रनगर आणि राजकोट जिल्ह्यांमध्ये आढळणारी ही प्रजाती दूध आणि केसांसाठी प्रसिद्ध आहे.
  • कच्छी : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये ही प्रजाती आढळते.
  • मलबारी : केरळमधील कालिकत, कन्नमनोरे आणि मल्लपुरम जिल्ह्यांमध्ये आढळणारी जात मांस आणि काही प्रमाणात दुधासाठी पाळली जाते.
  • उस्मानाबादी : महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, तुळजापूर आणि उदगीर तालुक्‍यांमध्ये प्रामुख्याने आढळते. दूध आणि मांसासाठी वापर.
  • कन्नायडू : तमिळनाडूतील रामनाथपुरम, थिरूनेवेली जिल्ह्यामध्ये आढळणारी ही प्रजाती प्रामुख्याने मांसासाठी पाळली जाते.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate