অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळ्यांचा गोठा स्वच्छ ठेवा, पुरेसा आहार द्या

अचानक हवामानात होणारे बदल शेळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. सध्याच्या काळात शेळ्यांची काळजी घेताना गोठे, शेळ्यांचे आहार आणि आरोग्य व्यवस्थापनेकडे लक्ष दिले पाहिजे. 

गोठ्यातील व्यवस्थापन

1) अजूनही बहुसंख्य शेळी पालकांकडे शेळ्यांसाठी स्वतंत्र गोठा दिसून येत नाही. इतर जनावरांच्या गोठ्यातच शेळ्या बांधणे, झाडाखाली शेळ्या बांधल्या जातात. वादळ पाऊस किंवा अति थंडीच्या काळात शेळ्यांना घरातच दाटीवाटीने ठेवले जाते. 
2) सध्याच्या हवामानात शेळ्यांचे थंडीपासून तसेच आर्द्रतायुक्त हवेपासून बचाव करण्यासाठी शेळ्यांच्या गोठ्यात ऊबदार वातावरण राहावे म्हणून साधारण 2 ते 3 फूट उंचीपर्यंत 1000 ते 1500 वॅटचे बल्ब लावावेत. 
3) थंड गोठ्यात शेकोटी लावून तापमान वाढविता येते. बोचऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यासोबती रिकाम्या बारदानाचे कुंपण करावे. 
4) शेळ्या बसण्याची जागा मलमूत्रामुळे ओली होते. ही ओल फुफ्फुसदाह, कमरेचा अर्धांगवायू तर छोट्या करडांमध्ये गारठल्याने मृत्यूसुद्धा येऊ शकतो. त्यासाठी शेळ्यांना बसण्यासाठी गोठ्यात मचाण तयार करावे. 
5) रात्रीच्यावेळी गोठ्यात वाळलेले गवत, उसाचे पाचट, भाताचा पेंडा किंवा रिकामे बारदान अंथरावे जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा याचा शेळ्यांना त्रास होणार नाही. 
6) ओलसर ठिकाणी आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी भुरभुरावी. त्यामुळे गोठ्यात असलेले जीवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. गोठ्याची जागा कोरडी ठेवण्यास मदत होते. 
7) ऊन पडल्यानंतर शेळ्या गोठ्याच्या बाहेर काढाव्यात म्हणजे गोठे सुकण्यास मदत होते. 
8) शेळ्यांचा कळप मोठा असेल आणि शेळ्यांमध्ये हगवणीची समस्या असेल तर गोठे साफ करताना जंतुनाशकाचा वापर करावा. 
9) शेळ्यांचा गोठा कोरडा व उबदार राहील यासाठी योग्य काळजी घ्यावी म्हणजे शेळ्यांना फुफ्फुसदाह, सर्दी, शारीरिक तापमान कमी होणे यासारख्या आजारांपासून वाचविता येईल.

शेळ्यांचे आहार व्यवस्थापन

1) आपल्याकडे बहुसंख्य शेळ्या या चराऊ पद्धतीने पाळल्या जातात, त्यामुळे शेळ्यांना चरावयासाठी नेताना काळजी घ्यावी. 
2) प्रामुख्याने सकाळच्या वेळी हवेत धुक्‍याचे प्रमाण जास्त असते, गवतावरही दव पडलेले असते. याचा विपरीत परिणाम शेळ्यांवर होतो. शेळ्यांना श्‍वसनाचे आजार उदा. सर्दी, खोकला, घशाचा दाह, फुफ्फुसदाह होतो. गवतावरील दवामुळे ओठावर व नाकावर मावा येणे व त्याचे रूपांतर जखमांमध्ये होणे या समस्या दिसतात. हे लक्षात घेऊन चांगले ऊन पडल्यावरच शेळ्यांना चरावयास न्यावे. 
3) जर हवामान आर्द्रतायुक्त व थंड असेल तर शेळ्यांना गोठ्यामध्ये चारापाणी करावे.
4) चारा उपलब्ध नसल्यास कडुलिंब, बाभूळ, शेवरी, शेवगा, पिंपळ, उंबर यासारख्या झाडांच्या पाल्याचा वापर करावा. 
5) निसर्गतः शेळ्यांमध्ये झाडपाल्यातील टॅनीन नावाचा विषारी घटक पचविण्याची क्षमता आहे. मात्र या झाडपाल्यांचा योग्य प्रमाणात शेळ्यांच्या आहारात वापर करावा. जास्त पाण्याचे प्रमाण असलेला झाडपाला वापरताना तो थोडा सुकवून शेळ्यांना द्यावा. 
6) शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा हिरवा चारा देताना पाल्याचे प्रमाण 60 ते 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असू नये, याची दक्षता घ्यावी म्हणजे पोटफुगी, अतिसार असे आजार होणार नाही. 
7) येत्या काळात चाराटंचाई लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारासाठी भाताचा पेंडा, गव्हाचे काड, सोयाबीन, तूर, हरभरा यांचा भुसा, भुईमुगाचा वाळलेला पाला, कडबा यांची साठवणूक करून ठेवावी. शक्‍य असेल तेथे लिंब, बाभूळ, सुबाभूळ, दशरथ, लसूण घास, सौंदळ, यांचा पाला, तसेच शेंगा वाळवून साठवून ठेवाव्यात.

स्वच्छ पाणी द्या, लसीकरण करा

1) पाऊस व थंड हवामान या प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना प्रामुख्याने श्‍वसन संस्थेचे आजार जास्त प्रमाणात होतात. त्यात सर्दी, खोकला कायम दिसून येतो. अशा वेळी शेळ्यांचा नाकावरून टर्पेंटाईनचा बोळा फिरवणे उपयुक्त ठरते. मात्र तरीदेखील सर्दी आटोक्‍यात न आल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करण्यात यावा. 
2) थंड हवामानात शेळ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व कोमट पाण्याचा पुरवठा करावा. त्यात पोटॅशियम परमॅंग्नेटचा योग्य प्रमाणात वापर करावा. जेणेकरून पाण्याद्वारा होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल. 
3) घटसर्पासारख्या रोगाचा प्रादुर्भाव शेळ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही मात्र असा प्रादुर्भाव दिसून आल्यास आजारी शेळ्यांना ताबडतोब वेगळे करावेत. इतर शेळ्यांना लसीकरण करून घ्यावेत. 
4) सध्या पीपीआर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्यासाठी लसीकरण करावे. या आजाराची लक्षणे बऱ्याचदा बुळकांडी आजारासारखे वाटते त्यामुळे शेळ्यांना एकाच वेळी बुळकांडी व सर्दी अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत. 

डॉ. संजय मंडकलमाले, डॉ. प्रमोदकुमार साखरे
संपर्क - 02426-243455 
(लेखक अखिल भारतीय संगमनेरी शेळी प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate