असे म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यात संधी एकदाच दार ठोठावते. परंतु ध्येयवेडी व्यक्ती ही संधीची वाट न पाहता संधी निर्माण करतो. असाच काहीसा प्रत्यय आला आहे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरवडी या गावातील तरुणांच्या बाबतीत.थेरवडी गावातील बेरोजगार तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वत: संधी निर्माण केली आणि त्यातून स्वतःबरोबरच गावाचाही विकास साधण्यास मदत केली.
गावातील दहा बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय पुरुष स्वयंसहायता बचत गटाची स्थापना सन 2012 मध्ये केली. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडले आणि गटातील प्रत्येक सदस्याने दर महिन्याला 200 रुपये बचत खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या खात्यात चांगली शिल्लक राहू लागली. त्याच वेळी त्यांनी एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू केला. त्यातून त्यांना मत्स्य शेतीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी यासंबंधी चौकशी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, आत्मा यांच्या मदतीने त्यांना रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात मत्स्य संवर्धनाबाबत प्रशिक्षण घेतले. या सात दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी तलावात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान वापरुन मत्स्य बोटुकली ‘बँक’ तयार करणे आणि शेतकऱ्यांना मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान प्रात्याक्षिक दाखविणे यांचे तंत्र शिकून घेतले.
प्रशिक्षणानंतर गटातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. त्यांनाही आता आपण मत्स्यसंवर्धन शेती करू शकतो, याचा हुरुप आला. प्रशिक्षणानंतर त्यांनी गावातील तलावात मत्स्य संवर्धन प्रकल्प सुरू केले. बचत गटाचे अध्यक्ष दादासाहेब कांबळे, सचिव बबन थोरात, प्रकल्प प्रमुख, तालुका कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक, विषय विशेषज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येतो.या मत्स्यसंवर्धनासाठी कोकण कृषी विद्यापीठातून पिंजरे देण्यात आले आहेत. या व्यवसायास आतापर्यंत बारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली असून कृषी विभागातर्फे शेततळेधारकांसाठी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या गटाने अकलूजमधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व कर्जतमधील कृषी प्रदर्शनात आपला स्टॉल लावून शेकडो शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच या बचत गटाला जिल्हा स्तरावरील प्रदर्शनात 21 हजाराचे तर तालुका स्तरावर 20 हजाराचे पारितोषिक मिळाले आहे. या मत्स्यव्यवसायात सतत भांडवल गुंतवण्याची गरज नसते तसेच पाण्याचा अपव्यय होत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करता येतो. त्याचबरोबर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय वरदान ठरेल यात शंका नाही.तलावात सुरु झाले मत्स्यपालन
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...