অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले समृध्दीचा महामार्ग

शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले समृध्दीचा महामार्ग

करडा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संरक्षीत सिंचनाकरीता शेततळ्याच्या बहूविध उपयोगाची माहिती मिळाल्यानंतर आसेगाव (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील सुनिल संजाबराव खानझोडे यांनी शेततळ्यात मत्स्यपालन सुरु केले. एवढ्यावरच न थांबता शेततळ्याच्या बांधावर तूर लागवड तसेच डाळींब शेती असा व्यावसायीक पॅटर्न या शेतकऱ्याने यशस्वी केला आहे.

आसेगाव (पेन) येथील कुटूंबीयांची संयुक्‍त 60 एकर शेती, सुरवातीला इतर शेतकऱ्यांप्रमाणेच सोयाबीनचे पीक घेण्यावरच त्यांचा भर होता. सुनिलसह या कुटूंबात तीन भावंडाचा समावेश आहे. वडील संजाबराव यांच्याकडूनच या तीनही भावंडांनी शेती व्यवस्थापनाचे धडे गिरविले.

रेशीम व पपई लागवडीचा प्रयोग

2004 मध्ये व्यावसायीक शेतीचा अंगीकार करीत या भावंडांनी रेशीम व पपई लागवड प्रयोग केला. या परिसरात रेशीम शेती करणारे हे पहिलेच शेतकरी होते. पपई लागवडीचा प्रयोग 2008 साली करण्यात आला. थोड्या-थोडक्‍या नव्हे तर तब्बल दहा एकरावर पपईची लागवड होती. तुती लागवड आणि कापणीसाठी लागणाऱ्या मजूरांची उपलब्धता हा अडसर त्यापुढील काळात भासू लागला. बंगलोरमध्ये रेशीम कोषाला चांगले दर, मात्र त्या तुलनेत महाराष्ट्रात याला बाजारपेठ नव्हती. परिणामी अवघ्या दोन वर्षातच त्यांनी या रेशीम शेतीपासून फारकत घेतली. दहा एकरावरील पपईची विक्री कारंजा (वाशीम), अकोला बाजारपेठ करण्यावर भर होता. त्यावेळी सहा ते आठ रुपये प्रती किलोचा दर मिळाल्याचे सुनिल खानझोडे सांगतात. पपई लागवडीचा प्रयोग त्यांनी केवळ एक वर्षच केला.

डाळींब लागवड

उती संवर्धीत डाळींब लागवडीचा प्रयोग त्यांनी 2014 या वर्षात केला. त्याकरीता रोपांची खरेदी वाहतूकीसह 32 रुपये प्रमाणे करण्यात आली. दहा एकरावर सुमारे 2775 झाडे बसली आहेत. 2015-16 या वर्षात हस्त बहारातील डाळींबाचे उत्पादन त्यांनी घेतले. परंतू अपेक्षीत माल न धरल्याने त्यांनी त्यावर्षी मार्केटींग केली नाही. झाडांना पाणी कमी पडल्यामुळे हे घडले होते. यावर्षी आंबीया बहारातील फळांचे मार्केटींग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

शेतीचे यांत्रीकीकरण

खानझोडे कुटूंबीयांनी एकत्रीत कुटूंबपद्धतीचा वारसा जपला आहे. त्यामुळेच शेती देखील एकत्रीत आहे. या शेतीच्या व्यवस्थापनाकरीता त्यांच्याकडे दोन ट्रॅक्‍टर आहेत. ट्रॅक्‍टरवरील फवारणी यंत्र, स्लरी वाहतूक तसेच आंतर मशागतीकरीता या ट्रॅक्‍टरचा वापर होतो. रोटाव्हेटर, पेरणी यंत्र देखील त्यांच्याकडे आहे.

अनुदानावर शेततळे

60 एकर शेती दोन तुकड्यात आहे. या शेतीकरीता पाण्याचे स्त्रोत विहीर, चार बोअरवेल असे पर्याय आहेत. परंतू या स्त्रोतांपासून इतक्‍या मोठ्या शेतीचे व्यवस्थापन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी शेततळ घेण्याचा निर्णय घेतला. 44 बाय 44 मिटर लांब, रुंद तसेच साडेसत्तावीस फुट खोल हे शेततळे आहे. शासनाचे याकरीता 4 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

मत्स्यपालनाची दिली जोड

कृषी विज्ञान केंद्र करडा येथे डाळींब माती परिक्षणाकरीता खानझाडे हे गेले होते. प्रयोगशाळा प्रमुख एस.के. देशमुख तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. रवी काळे यांच्याशी त्यांची भेट झाली. यावेळी चर्चेतून शेततळ्याची माहिती त्यांनी शेअर केली. त्याआधारे डॉ. काळे यांनी त्यांना शेततळ्यात मत्स्यपालन करण्याचे सुचविले. त्याकरीता प्रशिक्षण घेण्याची सुचनाही त्यांनी केली. त्यांचा प्रस्ताव आवडल्याने संतोष खानझाडे यांनी केव्हीके मधील मत्स्यव्यवसायाचे दोन दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यासोबतच तांत्रीक माहितीही पुरविण्यात आली. मत्स्यबिजाची माहिती, शेततळ्यातील मत्स्यपालन, ते हाताळण्याचे तांत्रीक ज्ञानही खानझाडे कुटूंबीयांनी घेतले. 20 जुलै 2016 ला रोहू, कटला, मृगला, फंगस, सायंप्रीनीयस अशा जातीचे मत्स्यबीज शेततळ्यात सोडण्यात आले. आंध्रप्रदेशमधून हे मत्स्यबीज आणले होते. 50 पैसे प्रती नगा दराने मत्स्यबीज मिळते.

मार्केटींगचा फंडा

शेततळ्यातून मासे काढण्यासोबतच मार्केटींग करण्याच्या खर्चाचा देखील समावेशासह देऊळगाव (बंडा) येथील कोळी समाजाच्या व्यक्‍तीला 75 रुपये किलोप्रमाणे त्याला दर ठरविण्यात आला. आसेगाव (पेन) येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. त्यामध्ये या माशाची विक्री होते. 10 क्‍विंटल 70 किलो माशांची विक्री आजवर झाली आहे. 22 हजार रुपयांचा खर्च शेततळ्यातील मत्स्यपालनावर झाला. मत्स्यबीज, खाद्य व खताच्या मात्रा या खर्चाचा समावेश आहे. माशांच्या नैसर्गीक खाद्य निर्मितीकरीता मोठ्या प्रमाणात ओले शेण, युरीया व सुपर फॉस्फेटचा मोठ्या प्रमाणात शिफारसीत वापर केला गेला. कृत्रीम खाद्य तलावात न फेकता ताराच्या सहाय्याने पिशव्यांना लटकवित पशुखाद्य माशांना दिले गेले.

जनावरांचे संगोपन

व्यवसायीक शेतीचा आदर्श सांगणाऱ्या खानझोडे भावंडांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. त्यांच्याकडे एक म्हैस, दोन बैल, 18 गाई आहेत. गावरान गाई असल्याने त्यांच्याकडून दूधाचे उत्पादन कमी असल्याने हे दूध घरच्यासाठीच वापरले जाते. परंतू गाईपासून मिळणारे शेणखत आणि गोमूत्राचा वापर शेतीत केला जातो. कधीकाळी त्यांनी शेळीपालनाचा प्रयोग केला. 75 शेळ्यांचे संगोपन ते करीत होते. परंतू मजूरांची उपलब्धता, कमी झालेले चराई क्षेत्र या कारणामुळे त्यांनी शेळीपालनापासून फारकत घेतली.

शेतकरी संपर्क - सुनिल खानझोडे (9637752771)

शब्दांकन: दत्ता इंगोले, रा. मोठी उमरी, ता. जि. अकोला. – 444005

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 5/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate