मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावर व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यावर निसर्गाची अवकृपा ठरलेलीच...दुष्काळ, खुरटे डोंगर, कुसळी माळरान, लहरी निसर्ग असे निसर्गचक्र तुळजापूर तालुक्यात आढळते. म्हणजे इथल्या पिचलेल्या कष्टकरी, शेतकरी व वन्यजीवासही मोठे आव्हानच होते. मात्र या आव्हानास दोन हात करत एका महिला शेतकऱ्याने मागील पाच दशकापासून अतोनात कष्ट उपसत थक्क करणारा प्रवास केला आहे. तोही तीनवेळा मृत्यूवर व अडचणीवर विजय मिळवत. सध्या राज्यभर शेतकरी आत्महत्या घडत असताना एका महिला शेतकऱ्याने मात्र तीनवेळा मृत्यूलाच परत पाठवले हेच तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रेरणादायक आहे.
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव शिवारात राहणाऱ्या गुणवंत सोमवंशी यांचा विवाह येणेगुरवाडी (ता. उमरगा) येथील त्यांची भाची मिनाक्षी यांच्याशी झाला. उत्पन्नाचे साधन नसल्याने सुरुवातीच्या काळात मिनाक्षी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सिंचन, अप्रगत शेती, दळणवळणाची अपुरी साधने यामुळे या भागात शेती म्हणावी तशी विकसित झाली नव्हती. अशातच सोमवंशी यांच्या हिश्यास आलेली वडिलोपार्जित शेतजमीन दहा एकर कोरडवाहू होती. त्याकाळी सिंचनाची म्हणावी तशी प्रगती नव्हती यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतीबरोबरच इतरांच्या शेतीवर शेतमजूर म्हणून काम करून उदरनिर्वाह करण्यास सुरूवात केली.
याच दरम्यान मिनाक्षी यांना तीन अपत्य झाली. हलाखीच्या परिस्थितीत आपली अपत्ये सांभाळत त्यांनी शेतीमध्ये कष्ट करणे सुरूच ठेवले. पुढील काळात स्वकष्टाने सोमवंशी दाम्पत्यांनी शेतीमध्ये सुधारणा करत श्रमदान करून विहीर खोदली. त्यामुळे शेतीचा काही भाग ओलिताखाली आला. त्यानंतर त्यांनी खरीप व रब्बी पिकांपासून भाजीपाला लागवडीस सुरुवात केली आणि हाच त्यांच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. दरम्यान जोडव्यवसाय म्हणून त्यांनी पशुपालन सुरु केले. कालचक्र पुढे सरकत होते मिनाक्षी यांनी वयाची पन्नाशी गाठली होती. शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला शेजारील गावात स्वतः दारावर जावून विक्रीस सुरुवात केली.
मागील दहा वर्षापूर्वीपासून कडाक्याची थंडी, भर पावसात चिखलाची वाट तुडवत, अंगाची लाही करणाऱ्या भर उन्हात दररोज तब्बल पाच किलोमीटर पायपीट करून दोन गावांत स्वत:च्या शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला शेजारील गावात स्वतः दारावर जावून विक्री करत आहेत. त्यांच्या या सचोटीमुळे शेजारील वागदरी या गावात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढला व पर्यायाने मोठ्या असलेल्या नळदुर्ग शहरात त्यांनी भाजीपाला विक्रीस सुरुवात केली. यातून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले व एका मुलीचे व दोन्ही मुलांचे लग्न थाटात पार पाडले. शेतात पिकविलेला भाजीपाला विक्री करून कुटुंबियाचे पालन पोषण व आर्थिक उन्नती साधत शेतकरी व कष्टकरी महिलासमोर आदर्श निर्माण करणारी यशस्वी महिला शेतकरी म्हणून त्यांच्याकडे कुतुहलाने पाहिले जात आहे.
मागील 15 वर्षांपासून अतिशय कष्टपूर्वक सुरु होणारी त्यांची दिनचर्या थक्क करणारी आहे. हेच त्यांच्या यशस्वितेचे गमक आहे. मिनाक्षी या दररोज पहाटे तीन वाजता उठतात. सकाळची कामे लवकर उरकून रात्रीच काढून ठेवलेला शेतातील भाजीपाला व सरासरी वीस लिटर दह्याचे डबे डोक्यावर घेवून शेतातील घरातून चालत एक किलोमीटरवर लोहगाव येथे सकाळी सहा वाजण्याच्या आत येवून सहाच्या एसटीने नळदुर्ग गाठतात. अवाढव्य वाढलेल्या नळदुर्ग शहरातील विविध भागात पायी हिंडून घरोघरी भाजीपाला व दही विक्री करतात. या ठिकाणाहून विक्री करुन वागदरी या गावाला जातात. तेथून पायवाटेने तीन किमी अंतरावर असलेले शेतातील घर पायी प्रवास करत गाठतात. भाजीपालामध्ये प्रामुख्याने ऋतुमानानुसार पिकणाऱ्या करडई, मेथी, हरभरा, अंबाडी, कोथिंबीर, मटकी, डहाळे, काकडी, पालक या भाजीपाल्यासह दही विक्री व्यवसाय अविरतपणे चालू आहे.
दरम्यानच्या काळात तीन वेळा मिनाक्षी यांना सर्पदंश झाला आहे. उपचारासाठी थेट त्यांना सोलापूर येथील नामांकित खासगी रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागले. त्याठिकाणी त्यांना भरमसाठ पैसे मोजावे लागले. त्यातूनही त्या बऱ्या झाल्या. एकप्रकारे त्यांनी मृत्यूवर तीनवेळा विजय मिळवला. खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने आपली दिनचर्या अखंडपणे सुरु ठेवली.
भाजीपाला विक्री व्यवसायातून तीन वर्षापूर्वी त्यांनी घराचे चांगल्या पद्धतीने बांधकाम केले. त्यानंतर एक वर्षाने चांगली किंमत मोजून चांगल्या जातीची म्हैस खरेदी केली. ही म्हैस सकाळ-संध्याकाळ मिळून दहा लीटर दूध देते. हेच दूध विक्री न करता त्यापासून दही तयार करुन विक्री करतात. सध्या त्यांनी शेतीमध्ये उसाचेही पीक घेण्यास सुरुवात केली आहे. माळरानापासून सुरू झालेल्या व शेतमजूर म्हणून काम केलेल्या मिनाक्षी यांचा प्रवास आज बागायतदार प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशित सन्मानाने उल्लेख केला जातो. याकामी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांना मदत करतात. यामुळेच त्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये धोक्यात आलेल्या शेती व्यवसायात आश्चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास साधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या काळात विशेष म्हणजे सोमवंशी यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य शासकीय सेवेत नसताना व संकट काळात नातेवाईकांनी पाठ फिरवल्यानंतरही अथक परिश्रमाने त्यांनी स्वतःचे एक विश्व निर्माण केले. त्याचबरोबर आदर्श भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबातील मुले, सुना, नातवंडे असे बारा सदस्य एकत्रित राहतात.
लेखक -शिवाजी नाईक (लेखक, नळदुर्ग, जि. उस्मानाबाद येथे पत्रकार आहेत )
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/19/2020