वाढत्या बेरोजगारीमुळे सर्वांनाच रोजगार उपलब्ध करुन देणे शक्य नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमुळे अनेक बेरोजगार व गरजूंना स्वावलंबनाचा मार्ग सापडला आहे. गोंदिया शहरातील गौतमनगर येथे शितलामाता मंदिराजवळ राहणारे 50 वर्षीय सुरेश उरकुडे यांनी मुद्रा योजनेतील शिशू गटातून 50 हजार रुपये कर्ज घेवून चहा कॅन्टीनचा व्यवसाय थाटून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे.
एका खाजगी आरा मशीनमध्ये दिवाणजी म्हणून सुरेश उरकुडे यांनी जवळपास 30 वर्षे काम केले. महिन्याकाठी त्यांना मालक 6 हजार रुपये पगार देत होते. तीन भावंडांच्या संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या सुरेश यांना 6 हजार रुपये महिन्याला मिळत असायचे. मात्र कमी पगारावर कुटुंबातील सदस्यांच्या गरजा आणि मुलांच्या शिक्षणासाठी अपुऱ्या पैशातून कुटुंबाचं रहाट गाडगं नीट चालविणे सुरेशला शक्य नसल्याचे लक्षात आले. एका मेळाव्यातील स्टॉलवरील पॉम्पलेट्समधून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेबाबतची माहिती सुरेशला मिळाली आणि गोंदियातील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची शाखा सुरेशने गाठली. शिक्षण दहावीपर्यंत झाल्यामुळे व्यवहाराचे बऱ्यापैकी ज्ञान सुरेशला होते. या योजनेतून चहा कॅन्टीन सुरु करुन आपण चांगल्याप्रकारे स्वावलंबी होवू शकतो हा दांडगा विश्वास सुरेशना होता. मुद्रा योजनेतील शिशू गटातून चहा कॅन्टीन व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 हजार रुपये कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जातून चहा कॅन्टिनसाठी शेड, कपबशी, चहा पावडर आणि गॅस सिलेंडर खरेदी केले.
मोठे भाऊ ओमचंद चहा कॅन्टीनचा व्यवसाय पूर्वी छोट्या प्रमाणात करायचे. घर चौकातच असल्यामुळे चहासोबत गरम नास्ता सुद्धा ठेवू लागलो. त्यामुळे परिसरातील लोक सकाळी चहा नास्त्यासाठी हमखास आजही येतात. परिसरात कुणाकडे विवाह प्रसंग व अन्य प्रकारचे कार्यक्रम असले तर त्या दिवसाच्या व्यवसायात चांगलीच वाढ होण्यास मदत होते. रविवारला देखील चांगली गर्दी दुकानात होत असल्याचे सुरेशने सांगितले. चहा कॅन्टीन व नास्त्याच्या व्यवसायामुळे दर महिन्याला 10 ते 12 हजार रुपये आज मिळत आहे. व्यवसाय उभा करण्यासाठी मुद्रा योजनेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड दुसऱ्याच महिन्यापासून करायला सुरुवात केली. जवळपास पावने दोन वर्षाच्या कालावधीत 25 हजार रुपयांची परतफेड बँकेला केली. आता लवकरच उर्वरित कर्जाची परतफेड बँकेला करणार असल्याचा आत्मविश्वास सुरेश यांनी बोलून दाखविला.
आजपर्यंत कुठल्याही बँकेचे कर्ज काढले नसल्यामुळे सुरेश यांना कर्ज काढताना भीती वाटायची. मात्र प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेमुळे व्यवसायातून स्वावलंबनाचा मार्ग सुरेश यांना सापडला. व्यवसायामुळे जीवनात स्थिरता आली. तीन भावंडाच्या संयुक्त कुटुंबातील नऊ सदस्य आनंदाने एकत्र राहत आहेत. चहा कॅन्टीनचा व्यवसाय मोठ्या स्वरुपात करायची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. या कर्जाची परतफेड लवकर करुन आता किशोर गटातून दोन लाख रुपये घेवून हा व्यवसाय वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
''आमच्या संयुक्त कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आता पूर्णपणे अवलंबून असून घरच्या सर्व मुलांना चांगले शिक्षण देवून त्यांना नोकरीच्या दृष्टीने आतापासूनच तयारी करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सांगितल्याचे सुरेश यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरेशच्या संयुक्त कुटुंबाला स्वावलंबनासाठी मदतीची ठरत आहे.
माहिती स्रोत - जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/4/2020