एकनाथ शंकर शेंडे, वय वर्ष 50 धारोळवाडी-काराव, ता.अंबरनाथ जि.ठाणे गावातील आदिवासी ठाकूर समाजातील रहिवासी सन 2005 मध्ये वन पट्टेधारक शेतकरी म्हणून त्यांना वन विभागाकडील 1.50 हे जमीन ताब्यात मिळाली. हक्काची जागा मिळाल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
जागा मिळाली परंतु सदर जागा डोंगर उतारावर होती जिथे पाणीही नीट थांबत नव्हते मग पीक काय घेणार यावर त्यांनी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत 0.40 हे क्षेत्रावर मजगीची योजना घेतली व शेत दुरुस्ती करुन घेतली. शासनाकडून यासाठी त्यांना अनुदान मजूरीच्या स्वरुपात देण्यात आले. त्याचा त्यांना एवढा लाभ झाला की फक्त एक वर्ष त्यांनी भात शेती करुन जमीन पिकाखाली आणली परंतु पुढील वर्षी त्या जमीनीत भाजीपाला, फळपिके लागवड करण्याची त्यांची इच्छा झाली. कृषी विभागामार्फत त्यांना 2013 मध्ये मग्रारोहयो अंतर्गत 0.50 हे आंबा लागवड देण्यात आली व त्यांनी ती स्वत: पत्नीसोबत खांद्यावर पाणी आणून ती 100% झाडे जगवली. एकीकडे फळबाग लागवड व दुस-या बाजूला भाजीपाला लागवड यामुळे त्यांचा विश्वास वाढला व त्यांनी सुरुवातीला 5 गुंठे, 10 गुंठे भाजीपाला लागवड करत करत आज सुमारे 0.60 हे पर्यंत भाजीपाला क्षेत्र वाढविले आहे. यात वांगी, कारली, मिरची, चवळी, मुळा ही प्रमुख भाजीपाला पीके ते घेतात.
सन 2013 साली त्यांनी 5 गुंठे क्षेत्रावर आळू लागवड केली. सहा महिन्यांत त्यातून सुमारे 10 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न आले. कृषी सहाय्यक सचिन तोरवे, तालुका कृषी अधिकारी, उल्हासनगर विजय पाटील व आत्माच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती प्राजक्ता करंदीकर यांच्या सोबत चर्चा करुन आळू पिकाचा प्रचार प्रसार करुन इतर शेतक-यांपर्यंत हे तंत्रज्ञान कसे पोहचवायचे याचा विचार करण्यात आला. त्यानुसार आराखडा तयार केला. यात किमान 20 शेतक-यांचा गट तयार करणे, या शेतक-यांना आळू लागवडबाबत प्रशिक्षण देणे, त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मदत करणे अशा पध्दतीने आराखडा तयार करुन प्रकल्प संचालक आत्मा, ठाणे यांना मंजूरीसाठी सादर करण्यात आला. त्यांनी तो मान्य करुन संमती दर्शविली.
धारोळवाडी-काराव येथे याबाबत शेतकरी सभा घेण्यात आली व आळू लागवड प्रशिक्षण देऊन शेतक-यांना आळू लागवड करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनन करण्यात आले. त्यात 20 शेतक-यांची निवड करुन या शेतक-यांचा गट तयार करण्यात आला. शेतकरी गट प्रमुख म्हणून श्री.एकनाथ शेंडे यांची निवड करण्यात आली. 2015 साली सदर योजना राबविण्यात आली व 20 शेतक-यांसाठी लागणारे आळू कंद बियाणे तयार केले.
एकनाथ शेंडे यांनी ही स्वत: 0.20 हे क्षेत्रावर आळू लागवड केली. त्यासाठी त्यांनी जमीन उभी आडवी चांगली नांगरणी करुन तयार केली व 4 गाडया चांगले कुजलेले शेणखत मिसळले. जून महिन्याच्या दुस-या पंधरवडयात त्यांनी लागवडीस सुरुवात केली. 2X2 फूट अंतरावर आळूची लागवड केली. 2X2 फूट अंतरानुसार सुमारे 4500 आळू कंद 0.20 हे क्षेत्रावर बसतात. त्यानुसार 4500 कंदाची लागवड केली व आत्मा अंतर्गत राबविण्यात येणा-या प्रकल्पांतर्गत 20 शेतक-यांना ही आळू कंद बियाणे उपलब्ध करुन दिले. लागवड केल्यानंतर सुमारे
महिन्यांत कंदापासून 2 पाने काढणीस तयार झाली त्यानंतर दीड महिन्यांनंतर 3 पाने, 2 महिन्यानंतर 4 पाने, तिस-या महिन्यात सुमारे 6 पाने तर 4 महिन्यात सुमारे 10 पाने प्रत्येक कंदापासून मिळाले.
अशा पध्दतीने त्यांना उत्पादन मिळाले. यात खर्च नफा ताळमेल पाहिला तर जमीन तयार करणे रु.2000/-, बियाणे लागवड खर्च रु.10,000/-, शेणखत रु. 2000/-, लागवड काढणी व इ.मजूरी खर्च रु.5000/-, पीक संरक्षण खर्च रु.1,000/-, एकूण खर्च रु.20,000/-, उत्पादन रु.1,36000/-, निव्वळ नफा रु.1,16000/- जे इतर पिकांच्या तुलनेत आळू पिकात कमी श्रमात जास्त उत्पादन अशा रितीने मिळाले.
शेंडे यांनी आळू लागवड केलीच व परिसरातील शेतक-यांना आळू लागवड मार्गदर्शन करत असतात. शासनामार्फत विविध ठिकाणच्या शेतकरी अभ्यास दौरा, कृषी प्रदर्शन, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेती शाळेत ते प्राधान्याने सहभागी होतात. आत्मा योजनेच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन कमिटीचे ते सदस्यही आहेत. कृषीरत्न शेतकरी गटाचे ते सध्या सचिव म्हणून काम पाहतात. शेतीमध्ये काम करतांना त्यांना त्यांची पत्नी मंजूळा हीचा व लहान बंधु अर्जून शेंडे यांचेही खूप सहकार्य लाभते. निरक्षर असूनही शेती विषयक असलेली धडपड व शेती करण्याची जिद्द यामुळे ते यशस्वी होत आले आहेत. अशा मितभाषी नम्र व्यक्ती महत्वाकडून खरेच खूप काही शिकण्यासारखे आहे.
लेखक -दत्तात्रय कोकरे,
सहाय्यक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण विभाग, नवी मुंबई
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/19/2020