अंबाडी हे तसे दुर्लक्षित पीक. वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची फुले, पाने, बिया यांपासून लोणचे, जॅम, जेली, सरबत आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ त्यांनी तयार केले आहेत. प्रदर्शने व दुकानांमधून त्यांची विक्री करून त्याची बाजारपेठ वाढवण्याचेही प्रयत्न त्यांनी केले आहेत.
अंबाडीची भाजी आणि भाकरी आजही चवीने खाल्ली जाते. पावसाळ्यात येणारी अंबाडी कालांतराने "जंक फूड'च्या जमान्यात हरवत गेली. शहरातील बाजारांतून कधीकाळी दिसणारी लाल फुले कशाची आहेत, असे विचारणाऱ्यांची संख्याच अधिक. याच अंबाडीवर वर्धा येथील विनोद मारोतराव राजगुरे यांनी व्यावसायिक दृष्टीने पाहता वर्धा शहरालगत कार्ला येथे अन्नप्रक्रिया उद्योगही सुरू केला.
बी.ई. (प्रॉडक्शन)ची पदवी घेतल्यानंतर अभियंता म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. यानंतर वाहनांना लागणारे क्लच तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचे सुरवातीला ठरवले होते. त्याच वेळी त्यांचा संपर्क वर्धा येथील सीएसव्ही (सेंटर ऑफ सायन्स ऑफ व्हिलेजेस) या संस्थेशी आला. तेथे 15 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात त्यांनी ग्रामीण भागात उपलब्ध वस्तूंपासून खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. यातच अंबाडी या पिकाची ओळख व बहुपयोग पाहता आपण विविध पदार्थ तयार करू शकतो व त्यातून रोजगारनिर्मिती करू शकतो असे त्यांना वाटू लागले. घरची आर्थिक परिस्थिती स्थिर होती, तसेच पत्नीचीही नोकरी असल्याने ते प्रक्रिया उद्योगातील जोखीम उचलण्यास तयार झाले.
राजगुरे यांनी अंबाडीची सखोल माहिती व त्यातील औषधी गुणांचा अभ्यास केला. इतकी महत्त्वाची वनस्पती दुर्लक्षित असून तिला ऊर्जितावस्थेत आणण्याचा ठाम निश्चय केला. सीएसव्ही संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल तयार केला. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या साह्याने तब्बल 10 लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम उभारण्यात आली.
सुरवातीला फुलांच्या पाकळ्यांपासून फक्त सरबत आणि जॅम हे दोनच पदार्थ तयार करायचे होते. यासाठी कुठलीही यंत्रसामग्री तयार नसल्याचे त्यांना कळले. याच वेळी त्यांचे तांत्रिक ज्ञान कामी आले. पल्वलायझर यंत्र त्यांनी इंदूर येथून घेतले. मिक्सर वर्धा येथेच डिझाईन करून बनवून घेतला. अन्य छोटी यंत्रेही बनवून घेतली.
अंबाडी लागवडीसाठी खर्च फारसा असा येत नाही.
ही वनस्पती नैसर्गिक पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढते व उत्पादन देते. राजगुरे यांच्याकडे शेती नाही. त्यांनी काही शेतकऱ्यांना हाती धरून अंबाडीची लागवड करण्याची विनंती केली. माल खरेदी करण्याचा करार केला. राजगुरेंचा व्यवसाय नवीन असल्याने अंबाडी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मर्यादित आहे. अंबाडी झाडाचे महत्त्वाचे भाग (उदा. बिया, फुले, पाने) विकली जाऊ शकतात व आपण ते घेऊ, हे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. फुलांपासून जॅम व जेली, पानांपासून लोणचे, बियांपासून बेसन आणि फुलांपासून चटणी तयार करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. सुरवातीचे बियाणे राजगुरे यांनी उपलब्ध करून दिले. एकरी अडीच ते तीन क्विंटल फुलांच्या पाकळ्यांचे उत्पादन झाले. शेतकऱ्यांना त्यांनी 18000 रुपये प्रति क्विंटल असा वाळल्या फुलांना दर दिला.
बियांचे उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटल झाले. या बियांना त्यांनी 2000 रुपये प्रति क्विंटल दर दिला. पानांपासून लोणचे प्रयोगाचे राजगुरेंचे पहिलेच वर्ष. 500 किलो पाने त्यांनी विकत घेतली, त्याला 20 रुपये प्रति किलो म्हणजेच 2000 रुपये प्रति क्विंटल दर दिला. अंबाडीच्या खोडापासून धागे निघतात. हा प्रयोग एका उद्योजकाने केला असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. तो यशस्वी झाल्यास त्यापासूनही उत्पन्न स्रोत मिळू शकेल यात शंका नाही. सध्या उद्योग सुरू करून सुमारे अडीच वर्षे झाली आहेत. अंबाडीवर आधारित पदार्थांचा प्रसार अजून होण्याची व त्यांना मार्केट मिळण्याची गरज राजगुरे यांनी व्यक्त केली.
राजगुरे यांनी सध्या अंबाडीवर आधारित सरबत, जॅम, जेली, बियांपासून मुखवास, बेसन असे पदार्थ तयार केले. त्यांनी या वर्षी 500 किलो लोणचे तयार केले. हे चवदार पदार्थ ग्राहकाला नवीन असल्याने सुरवातीला कुठलाही दुकानदार ते विक्रीसाठी ठेवण्यास तयार नव्हता. यावर राजगुरे यांनी उपाय शोधून देशभरात जेथे कृषी, क्राफ्ट यांचे प्रदर्शन भरते, तेथे जाऊन स्टॉल लावून विक्री सुरू केली. प्रदर्शन कुठल्याही विभागाचे असो, राजगुरे तेथे उपस्थित राहतातच. यामुळे अनेक ग्राहकांपर्यंत त्यांना आपला माल पोचवता आला.
विविध शहरांतील दुकानदारांकडे माल ठेवला आहे. वर्ध्यात पाच, अमरावतीत चार ते पाच, यवतमाळ दोन, नागपूर सात अशी ढोबळ संख्या आहे (ग्राहकांकडून पदार्थांना चांगला प्रतिसाद आहे; मात्र तो वाढणे गरजेचे आहे).
उद्योगाची वार्षिक उलाढाल - सुमारे 10 ते 12 लाख (ही प्रति महिना व्हावी अशी राजगुरे यांची अपेक्षा आहे).
सध्या महिन्याला प्रति दुकान 2000 ते 5000 च्या रेंजमध्ये पदार्थांना मागणी असते.
वर्षभर उद्योग सुरू असतो. महिन्याचे वीस दिवस तरी काम राहतेच.
वर्षाला सुमारे 800 किलो अंबाडीची फुले कच्चा माल म्हणून लागतात, तर अर्धा टनपर्यंत बिया लागतात.
आतापर्यंत वर्धा, यवतमाळ, नागपूर, रायपूर, नाशिक, मुंबई तसेच अन्य मिळून 100 ठिकाणच्या प्रदर्शनांतून भाग घेतला आहे.
खाद्यपदार्थ टिकण्याची मुदत सुमारे सहा महिन्यांचीच गृहीत धरल्याने एकाच वेळी सर्व माल तयार करून ठेवता येत नाही. यंत्रसामग्री अत्याधुनिक नसल्याने अधिक मालाच्या निर्मितीसाठी अंबाडी लागवडीचे प्रमाण वाढवणे अद्याप जमलेले नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रीसाठी सध्या विविध ठिकाणी फिरावे लागते. दुकानांतून या पदार्थांची विक्री वाढण्याची गरज आहे.
अंबाडीवर भर देण्याचे कारण सांगताना राजगुरे म्हणाले, की या पिकाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व इंटरनेट व पुस्तकांच्या माध्यमातून समजून घेतले, त्यातून या वनस्पतीत विविध औषधी गुणधर्म असल्याचे माहीत झाले आहे. अंबाडीचा उपयोग हृदयरोग, उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत, रक्तवाहिन्यांचे काम सुधारणे तसेच शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी होतो, यावर अजून अभ्यास सुरू आहे.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...