অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम शेतीने दाखवला मार्ग

विहिरीला अपुरे पाणी, अनियमित वीजपुरवठा, काळ्या जमिनीत फळबागेत आलेले अपयश यामुळे झालेली मोठी आर्थिक हानी अशा अनेक संकटांवर मात करीत घनसावंगी, जि. जालना येथील मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि रेशीम शेतीच्या माध्यमातून आलेल्या अडचणीतून मार्ग काढला आहे.

घनसावंगी (जि. जालना) येथील देवनाथ जाधव यांच्याकडे 15 एकर शेती आहे. त्यांनी अन्य लोकांच्या उदाहरण पाहून सन 2004 मध्ये 1000 डाळिंब झाडांची लागवड केली होती. ही जमीन भारी असल्याने ताणावर येण्यात अडचणी येऊ लागल्या. तसेच देवनाथ आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांनी गावाच्या व तालुक्‍यातील राजकारणात सरपंचापासून सभापतिपदापर्यंत विविध पदे भूषविली आहेत. या राजकारणाच्या व्यापातून शेतीकडे काहीसे दुर्लक्ष झाले. परिणामी, 2010 मध्ये बाग काढून टाकावी लागली. त्यानंतर तीन एकर क्षेत्रांवर उसाची लागवड केली.

मात्र 2011 मधील दुष्काळी परिस्थितीमध्ये विहिरीचे पाणी कमी पडल्याने एकरी चाळीस टनांचे उत्पादन मिळाले. मग कमी पाण्यात व कमी खर्चात काय करता येईल, याचा शोध घेण्यास सुरवात केली. तालुक्‍यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शेतकरी संतोष वराडे व श्रीपत धामणगाव येथील सुनील शिंदे, अरुण पवार हे शेतकरी अनेक वर्षांपासून रेशीम शेती करून चांगले उत्पादन मिळवत असल्याचे कळले. त्यांच्या व अन्य शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन तुती लागवडीविषयी जाणून घेतली. "ऍग्रोवन'मधील रेशीम शेतीवरील लेखमाला व यशोगाथांतून अधिक प्रेरणा मिळाली. रेशीम शेती करण्याचे निश्‍चित केले.

तुतीची लागवड

जून 2013 मध्ये तीन एकर क्षेत्रांवर रेशीम शेतीची लागवड केली. तुतीचे बेणे तालुक्‍यातील श्रीपतधामणगाव व देवीदहेगाव येथून आणले. तीन ते चार डोळ्यांची काड्या एकरी सहा हजार प्रमाणे बुरशीनाशकाची प्रक्रिया करून दोन ओळींतील अंतर पाच फूट व दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवून लागवड केली.

लागवडीपूर्वी नांगरट व मशागत करून एकरी चार ट्रॉल्या घरचे शेणखत टाकून घेतले. लागवडीनंतर या वर्षी सातत्याने पाऊस असल्याने तणांचे प्रमाण वाढल्याने दोन वेळा खुरपणी करावी लागली. 60 दिवसांत तुती लागवडीस कोंब फुटून किमान दीड ते दोन फुटांचे फुटवे तयार झाले. या शिवाय फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली. त्यामुळे तुतीचा पाला हिरवागार, लुसलुशीत व दर्जेदार मिळाला. एस. 1 या तुती वाणामध्ये रोगाला व दुष्काळी परिस्थितीला समाधान देण्याची क्षमता चांगली आहे. वाढीचा वेगही जास्त आहे. त्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो. पाणीदेखील वाचते.

शेड व रॅक उभारणी

गांडूळ खतासाठीची दोन जुनी 30 फूट x 40 फूट आकाराची शेड तयार होती. पूर्वी या शेडसाठी दोन लाख खर्च झाला होता. त्यामध्ये अळी संगोपनासाठी पाच फूट रुंद व 30 फूट लांबीचे लोखंडी रॅक बनवून घेतले. त्यासाठी 40 हजार रुपये खर्च आला. बाजूने शेडिंग नेट व अन्य किरकोळ खर्च पाच हजारांपर्यंत झाला. तुती झाडांचा पाला योग्य प्रमाणात आल्यानंतर प्रथम 100 अंडीपुंज घेण्याचा निर्णय घेतला. 19 ऑक्‍टोबर रोजी 100 अंडीपुंजापासून तयार झालेल्या साधारण दहा दिवसांच्या 40 ते 50 हजार अळ्या शासनाच्या चॉकी सेंटरमधून आणल्या.

प्रत्यक्ष अळी संगोपनास सुरवात

अळी संगोपनामध्ये खाद्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते.

अंडीपासून तयार झालेली अळी कोषांवर जाईपर्यंत चार वेळा कात टाकते. चॉकी सेंटरमध्ये त्यातील दोन वेळा कात टाकलेली असल्याने शेडमध्ये दोन वेळा कात टाकली. त्यानंतर अळी 24 ते 25 व्या दिवशी कोषावस्थेत पोचली. या अवस्थेसाठी तुती शेंड्यापासून हळूहळू खाद्य वाढविण्यात आले. प्रत्यक्षात शेडमध्ये तिसरी आणि चौथी कात पास झाल्यावर रोज सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता असा दोन वेळा तुती पाला पूर्ण फांदीच्या रूपात दिला. रेशीम अळी 25 व्या दिवशी रॅकवर चंद्रिका जाळी अंथरण्यात आली. दोन ते तीन दिवसांत संपूर्ण अळ्यांनी कोष निर्मिती केली. जाळीवर कोष तयार झाल्यानंतर दोन दिवसांत जाळ्यांवरील कोष चार महिला मजुराच्या साह्याने स्वच्छ करण्यात आले. शेडमधील निर्जंतुकीकरणासाठी पावडरचा वापर केला.

स्वतः गाठली परराज्यातील बाजारपेठ

  • 100 अंडीपुंजापासून 85 किलो कोष निर्मिती झाली. त्याची विक्री करण्यासाठी बंगलोर जवळील रामनगरम या शहरात रेशीम कोषाची बाजारपेठेमध्ये स्वतः कोष घेऊन विक्री केली. कोषाची प्रत चांगली असल्याने 35 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यानुसार 85 किलोस 30 हजार रुपये मिळाले. वाहतुकीसाठी दोन हजार रुपये खर्च झाला.
  • अंडीपुंज खरेदीसाठी एक हजार रुपये झाला. अळी संगोपनासाठी मजुरीवर सहा हजार रुपये खर्च आला. निर्जंतुकीकरणासाठी व अन्य असा खर्च एक हजार रुपये झाला.
  • तुती लागवडीसाठी नांगरट व मशागत दोन हजार रुपये, बेणे एकरी तीन हजार रुपये, लावणीसाठी मजुरी 2500 रुपये असा खर्च झाला. बागेमध्ये रोग व किडीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने फवारणीची गरज पडली नाही. एकदा लावलेली तुती बाग सुमारे 15 वर्षं टिकते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च येणार नाही.
  • पुढे तुतीपासून अधिक पाला मिळत जाणार असून, पुढील बॅचमध्ये 250 ते 300 अंडीपुजांचे संगोपन शक्‍य होईल. त्यातून प्रति बॅच 300 ते 400 किलो कोषांपर्यंत उत्पादन मिळू शकेल. योग्य नियोजनाअंती वर्षातून साधारणपणे पाच ते सहा बॅच घेता येऊ शकतात. कमी कालावधीत जाधव दांपत्यांच्या हाती समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.
रेशीम शेतीसाठी तालुक्‍यातील शेतकरी संतोष वराडे व सुनील शिंदे, अरुण पवार यांच्यासह त्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी आहेरसाहेब, गायकवाडसाहेब यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. 

संपर्क - देवनाथ जाधव, 9421655290

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate