অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंबा पल्प निर्मितीची यशकथा

प्रस्तावना

रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे यांनी आंबा पल्पनिर्मितीत खात्रीशीर ब्रॅंड व त्यासाठी बाजारपेठही तयार केली आहे. पल्पनिर्मिती करताना गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणतात. त्यांच्या या उद्योगाची हंगामात सुमारे 150 ते 200 टन आंब्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. वडिलांकडून त्यांना मिळालेला प्रक्रिया उद्योगाचा हा वारसा आता तिसऱ्या पिढीने सांभाळण्याची तयारी केली आहे.

कोकणचा हापूस सर्वत्र लोकप्रिय आहे. वर्षातून केवळ दोन ते तीनच महिने त्याची चव चाखायला मिळते. मात्र प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ बनविले तर या हापूसची चव बाराही महिने चाखायला मिळते. हाच प्रक्रियेचा म्हणजे पल्पनिर्मितीचा उद्योग (याला कॅनिंग असेही म्हणतात) कोकणातील शेकडो व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन देऊन गेला आहे. वर्षाला काही लाख टन आंब्यांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये दिसून येतात.

भिडे यांच्याकडे 1977 पासून परंपरा

रत्नागिरी जिल्ह्यात श्रीक्षेत्र गणपती पुळ्यापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटरवर मालगुंड गाव वसले आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कवी केशवसुतांचे हे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. प्रगतिशील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे हे इथले रहिवासी. ते आयुर्वेदिक डॉक्‍टर आहेत. हा व्यवसाय सांभाळून आपली आंबा बाग व शेती सांभाळतात.

डॉ. विवेक यांचे वडील डॉ. यशवंत भिडे यांनी 1977 मध्ये आंब्यावर प्रक्रिया करणारा म्हणजे पल्पनिर्मितीचा "कॉटेज' स्वरूपातील पहिला उद्योग सुरू केला. त्यासाठी शासनाच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून अनुदान घेतले होते. सुरवातीला दहा ते वीस टन आंब्याचा पल्प तयार करून त्याची विक्री केली जात होती. सन 1999 पासून कॉटेज स्वरूपातील या उद्योगाचे रूपांतर आणखी थोडे वाढले. डॉ. विवेक यांनी पुढे या व्यवसायाची सूत्रे सांभाळण्यास सुरवात केली. आंबा पल्प तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान बाजारात आले होते. शासनाच्या अनुदान तत्त्वावरील योजनाही होत्या. जास्तीत जास्त आंब्यांवर प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय डॉ. भिडे यांनी घेतला.

डॉ. भिडे यांचा आंबा पल्पनिर्मिती उद्योग

 • दोन महिने चालणाऱ्या या हंगामात सुमारे 150 ते 200 टन आंब्यांवर प्रक्रिया करण्याची या उद्योगाची क्षमता आहे.
 • व्यवसायात सुमारे 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली आहे.

पल्पनिर्मितीतील काही प्रमुख टप्पे

 • आंब्याची प्रतवारी वा "सॉर्टिंग' करणे, धुणे, सोलणे, त्यातून रस काढणे आणि पल्पिंग करणे
 • यातील आंबा सोलण्याचे काम महिला वर्गाकडून केले जाते. उर्वरित काम यंत्राद्वारे होते.
 • पल्पिंग करण्यासाठी विशिष्ट यंत्राचा वापर केला जातो.
 • पल्पिंगनंतर रस उकळण्याची प्रक्रिया होते. तिथे ऍसिडिटी (आम्लता) व शुगर टेस्ट केली जाते.
 • गरजेनुसार साखर वा सायट्रिक ऍसिड त्यात मिसळले जाते.
 • तयार पल्प हवाबंद डब्यात भरला जातो.
 • त्यानंतर तो उकळत्या पाण्यात 35 मिनिटे ठेवला जातो.
 • त्यानंतर तो थंड केला जातो.
 • त्यानंतर पुढे गोडाऊनमध्ये ठेवला जातो.
 • पल्पचे खरेदीदार कोण आहेत?
 • आइस्क्रीम, कोल्ड्रिंक हाऊसवाले, तसेच आम्रखंड बनविणारे व्यावसायिक, दूध संघ
 • भिडे यांनी पल्पच्या गुणवत्तेकडे लक्ष दिल्याने त्यांना बाजारपेठ मजबूत करणे शक्‍य झाले आहे.
 • "फ्रूट किंग मॅंगो पल्प' या नावाने त्यांनी आपल्या उत्पादनाचे नोंदणीकरण केले आहे. सलग पाच वर्षे सिंगापूरमध्येही त्यांनी आपला पल्प निर्यात केला होता. गेल्या दोन वर्षांपासून मात्र हे मार्केट बंद करून देशांतर्गत विक्रीवरच भर दिला आहे.
 • पल्पचे मार्केटिंग करण्यासाठी डेअरी, आइस्क्रीम पार्लरना भेटी देऊन आपल्या उत्पादनाची जाहिरात केली. सन 2007 मध्ये लखनौला झालेल्या राष्ट्रीय फळ व फळ प्रक्रिया प्रदर्शनात फ्रूट किंगला गुणवत्तेचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

पल्पसाठी लागणाऱ्या आंब्यात 20 टक्‍के आंबा आपल्या बागेतला वापरला जातो. मात्र उद्योगाचा विस्तार केल्याने 80 टक्‍के आंबा मालगुंड आणि अन्य परिसरातील बागायतदारांकडूनही विकत घेतला जातो. या उद्योगातून दोन महिने सुमारे शंभर लोकांना रोजगार मिळतो.

 • या व्यवसायातून होणारी वार्षिक उलाढाल - 50 ते 70 लाख

पॅकिंग मॅंगो पल्पचे दर (रू.) (एमआरपी) 
450 ग्रॅम 120 
850 ग्रॅम 225 
3.1 किलो 580

भिडे यांनी सांगितले गुणवत्तेचे निकष

 • पल्पसाठी आंब्याची प्रत चांगली असावी.
 • आंबा पिकवण्याची पद्धत सर्वांत महत्त्वाची. आम्ही आढी लावून आंबा पिकवतो.
 • आंब्याचे सॉर्टिंग महत्त्वाचे.
 • आंबा सोलून वापरला जातो. काही जण सालीसहित आंबा पल्पसाठी वापरतात, आम्ही मात्र तसे करीत नाही.
 • कोणतेही कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह वापरले जात नाही.
 • जेवढ्या आंब्यावर प्रक्रिया होते त्याच्या 55 टक्के पल्प निघाला पाहिजे असे उद्दिष्ट असते.
 • त्यामुळे आंबा सोलणे ही गोष्ट काळजीपूर्वक करायला हवी.

डॉ. भिडे यांचे चिरंजीव यज्ञेश म्हणजे प्रक्रिया उद्योगातील त्यांची तिसरी पिढी त्याची पुढील जबाबदारी सांभाळत आहे. व्यवसायातील स्पर्धा वाढल्यामुळे नवे प्रयोग आणि नवे मार्केट विकसित करण्यावर भिडे यांचा भर आहे.

आंबा पल्प उद्योग व मार्केटच्या अनुषंगाने भिडे म्हणाले, की आंब्याचा प्रक्रिया उद्योग तसा दोन महिनेच असतो. ते किफायतशीर ठरण्यासाठी किमान आठ महिने तो सुरू राहायला हवा. त्यासाठी आपल्या भागातील मोठ्या प्रमाणात पीक व बाजारपेठ हे दोन घटक अनुकूल हवेत.

त्या दृष्टीने अननस किंवा टॉमेटोचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांना गटशेती करावी लागेल. लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचा मदतीचा हात हवा. त्या माध्यमातून शासकीय कार्यालये, लष्करी कॅंटीन, विमानसेवा आदी ठिकाणी पल्प पुरवणे शासनाला शक्‍य आहे.

वेंगुर्ला येथील कोकण हापूस आंबा बागायतदार व विक्रेते सहकारी संस्थेचे भिडे अध्यक्ष आहेत. संस्थेमार्फत रत्नागिरी हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीई) देण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

संपर्क - डॉ. विवेक भिडे - 9422051503

लेखक : राजेश कळंबटे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate