कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी (ता.शिरोळ) येथील बापूसाहेब दळवी यांनी प्रतिकूल परिस्थितीत पंधरा वर्षांपूर्वी बेबीकॉर्नची शेती व विक्री व्यवसाय सुरू केला. शेतकऱ्यांनाही या शेतीबाबत प्रोत्साहन करून त्यांच्याकडून माल खरेदी करण्यास सुरवात केली. मुंबई, पुण्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील बाजारपेठत "दळवींचे बेबीकार्न' विकले जाऊ लागले. उसाचे प्राबल्य असलेल्या या पट्ट्यात उद्योजकतेचा आदर्शच दळवी व त्यांच्या पुढील पिढीने सुरू ठेवलेल्या या व्यवयासाने घालून दिला आहे.
दानोळी (ता.शिरोळ) हे सुमारे वीस हजार लोकसंख्येचे बागायती गाव. नदीचे मुबलक पाणी असल्याने, येथील शेतकऱ्यांचा अधिकाधिक ओढा ऊस व भाजीपाला पिकांकडेच आहे. येथील बापूसाहेब दळवी यांचा "हिराशंकर ऍग्रो फार्म' आहे. त्या माध्यमातून ते बेबीकॉर्नचे (शिशुमका) उत्पादन, संकलन व विक्री यांत कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या व्यवसायात कोठेही खंड पडलेला नाही. बापूसाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत सुरवात केलेला हा व्यवसाय त्यांचे मुलगे अमित व राहुल यांनी पुढे यशस्वीपणे फुलविला आहे.
पूर्वी दळवी यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. केवळ एक एकर शेती. यामुळे प्रगती करण्यामध्ये मर्यादा यायच्या. पण वेगळे काही तरी करायचे, ही त्यांची जिद्द होती. यातूनच त्यांना बेबीकॉर्नच्या उत्पादनाविषयी समजले. त्यांनी या पिकाच्या काही प्लॉटना भेटी दिल्या. आपल्या शेतात त्याचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला. त्यांना बेबीकॉर्न शेतीबाबत प्रोत्साहन दिले. दुचाकीवरून त्यांच्याकडील उत्पादनाचे संकलन सुरू केले. पुणे, मुंबई येथील व्यापाऱ्यांना भेटून बेबीकॉर्न घेण्याबाबत विनंत्या केल्या. सुरवातीला फसवणूक होण्याचाही अनुभव आला; परंतु उत्पादनाचा दर्जा चांगला
असल्याने व्यापाऱ्यांनी दररोज माल घेण्यास सकारात्मकता दाखविली. सुरवातीला खासगी गाड्यांच्या माध्यमातून माल पाठविण्यास सुरवात झाली. आता दळवी स्वत:च्या गाड्यांमधून माल बाहेर पाठवितात.
बेबीकॉर्नचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बियाण्याची रक्कम पीक आल्यानंतर वजा केली जाते. सुमारे पंचावन्न दिवसांत पीक तयार होते. उन्हाळ्यात प्रत्येक सात ते आठ दिवसांनी एकदा पाणी द्यावे लागते. एकरी आठशे ते अकराशे किलोपर्यंत व कोणता हंगाम निवडला आहे त्यानुसार बेबीकॉर्नचे उत्पादन मिळते. यात जनावरांना चारा हा अतिरिक्त नफा शेतकऱ्यांना होतो. पस्तीस रुपये प्रतिकिलो दराने सोललेला बेबीकॉर्न शेतकऱ्यांकडून दळवी खरेदी करतात. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांशी विश्वासाचे बंध तयार झाले आहेत. मात्र शेतकरी नवे असतील तर त्यांच्याशी लेखी करार केले जातात.
दळवी कुटुंबीयांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना बेबीकॉर्नच्या बियाण्याचे वाटप केले आहे. वर्षभरात शेतकरी "रोटेशन' पद्धतीने हे पीक घेतात. कर्नाटकातील नाईंग्लज, धुळवणवाडी, कुटाळी, मनुशीवाडी, नवनाळ, हंचनाळ, तर महाराष्ट्रातील आरग, बेडग, जानकरवाडी, बुबनाळ, सलगर, शिंदेवाडी या गावांतील शेतकऱ्यांपर्यंत दळवी यांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे.
दुग्ध संस्थांच्या धर्तीवर बेबीकॉर्नचे संकलन होते. ठराविक गावांमध्ये विक्री सेंटर उभारली आहेत. शेतकऱ्यांना दूध संस्थेप्रमाणे कार्डचे वाटप करण्यात आले आहे. त्यावर शेतकऱ्याचे नाव, त्याचे क्षेत्र, बियाणे पेरलेली तारीख, त्याला ऍडव्हान्स दिला असेल तर त्याबाबतची नोंद आदी गोष्टींची नोंद असते. शेतकऱ्याजंवळील संपूर्ण माल संपल्यानंतर त्याला पैसे अदा केले जातात.
दळवी कुटुंबीयांकडे मालवाहतूक करणाऱ्या तीन गाड्या आहेत. सकाळी सात वाजता संबधित गावांत गाड्या रवाना होतात. तेथील संकलन केंद्रावर शेतकरी बेबीकॉर्न आणतात. तिथेच बेबीकॉर्नची दर्जानुसार विभागणी केली जाते. दिवसभर शेतकऱ्यांकडून घेतलेले बेबीकॉर्न सायंकाळी दानोळीत आणले जाते. येथे एका शेडमध्ये प्रतवारीनुसार त्याची विभागणी केली जाते. त्यानंतर प्रत्येकी एक किलोचे पॅकिंग केले जाते. साधारणत: पंचवीस किलोचा एक बॉक्स याप्रमाणे पॅकिंग करून व्यापाऱ्यांना, कंपन्यांना ते पुढे पाठविले जाते. काही कंपन्या यावर प्रक्रिया करून बेबीकॉर्न निर्यातही करतात.
दळवी व त्यांचे कुटुंबीय गेल्या पंधरा वर्षांपासून या व्यवसायात आहेत. आता व्यापारी व कंपन्यांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. यामुळे दररोजची मागणी ठरलेली असते. क्वचित प्रसंगी मागणी व पुरवठा कमी-जास्त होऊ शकतो. बापूसाहेब यांचा मोठा मुलगा अमित व्यापाऱ्यांची देवघेव, वसुली आदी बाबी पाहतो, तर लहान मुलगा राहुल शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची व्यवस्था पाहतो. बापूसाहेब हे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याबरोबर या पिकाचे अर्थशास्त्र व व्यवसायाच्या बाजू त्यांना समजावून देतात.
दररोज सुमारे आठशे किलो ते एक टनांपर्यंत बेबीकॉर्न दळवी यांच्यामार्फत विक्रीसाठी पाठविले जाते. त्याला सरासरी पन्नास रुपये प्रति किलो याप्रमाणे किंमत मिळते. दररोज सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत विक्री होते. मात्र संकलन केंद्र, पॅकिंग ठिकाणचे दहा ते बारा मजूर, वाहतूक, पॅकिंग आदी खर्च वेगळा होतो. उन्हाळ्याचे दोन-तीन महिने वगळता, सुमारे नऊ महिने हा व्यवसाय जोमाने सुरू असतो. उन्हाळ्यातील विक्री पाचशे किलोपर्यंत असते.
कॅनिंगच्या स्वरूपात बेबीकॉर्न ठेवल्यास ते जास्त काळ राहू शकते, तसेच त्याला किंमतही जादा मिळू शकते. यामुळे दळवी कुटुंबीय भविष्यात कॅनिंग युनिट उभारण्यासाठी, तसेच छोटे शीतगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे. उसाचे प्राबल्य असणाऱ्या शिरोळ तालुक्यात त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय वेगळेपण जपणारा व शेतकऱ्यांना उद्योजकाची दृष्टी देणारा ठरला आहे.
संपर्क- बापूसाहेब दळवी- 9975761856
----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...