অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकात्मिक शेती व्यवस्थापन आणि पूरक व्यवसायाचा आदर्श

अभ्यासपूर्ण शेतीपद्धतीचा आदर्श जपणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील देऊतवाडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील राहूल चौधरी यांनी इस्त्रायल दौरा केला. या दौऱ्यातून मिळालेल्या माहितीचा अवलंब त्यांनी प्रत्यक्ष शेतीपद्धतीत सुधारणाकामी केला आहे. संत्रा बागेचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन त्यात सीताफळ, शेवगा लागवडीचा पॅटर्न आणि शेळीपालनासारखा पूरक व्यवसाय अशी त्रिसूत्री त्यांनी अवलंबिली आहे.

लागवडीचा पॅटर्न


राहूल यांची 21 एकर शेती. त्यापैकी तीन एकरावर 450 संत्रा झाडे आहेत. संत्र्यांची 12 बाय 24 फुट प्रमाणे संत्रा लागवड आहे. या जानेवारीत संत्र्याला पाच वर्ष पुर्ण होतात. संत्र्यांच्या मध्यभागी सीताफळ लागवड नव्याने केली आहे. याप्रमाणे 380 झाडे तीन एकरावर सीताफळ तर 846 शेवगा झाडे आहेत. संत्र्याच्या चौफेर तसेच सीताफळाच्या चौफेर शेवगा अशी लागवड पध्दती आहे. नैसर्गिक शेतीपध्दतीने या संत्रा बागेचे व्यवस्थापन ते करतात. संत्र्यासोबतच कपाशी, तूर या सारख्या पारंपरीक पिकांचे व्यवस्थापनही त्यांच्याव्दारे या पध्दतीनुसारच होते.

जीवामृत, घनामृत, फवारणीसाठी दशर्पणी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र यासारख्या घटकांचा वापर होतो. नैसर्गीक शेतीपध्दतीमुळे पिकाचा उत्पादकता खर्च कमी होतो. मातीत गांडूळाची संख्या वाढल्याने ती भुसभूसीत राहते. सुक्ष्म जीवाणूंचा देखील माती अधिक संख्येने वावर राहतो, असे अनेक फायदे या शेतीपध्दतीचे असल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिणामी फायटोप्थोरा, डिंक्‍या सारख्या रोगांना बाग बळी पडत नाही. मशागतीवरील देखील अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी त्यांनी या पध्दतीत पुढाकार घेतला आहे.

एकात्मीक पध्दतीने होते व्यवस्थापन


आंबीया बहाराचे उत्पादन राहूल यांच्याकडून होते. सप्टेंबर महिन्यापासून फळे झाडावर राहण्यास सुरवात होते. या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती राहते. फळमाशीच्या नियंत्रणाकरीता 100 झाडांकरीता 1 ट्रॅप लावल्या जातो. फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास ट्रॅपची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येतो. गुळवेलवर फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक राहतो. त्यामुळे शेताच्या बांधावर किंवा परिसरात गुळवेल वाढणार नाही याची दक्षता देखील ते घेतात. गुळवेल असलेल्या भागापासून 2 ते 3 किलोमीटर पर्यंत या माशा नुकसानकारक ठरतात.

फळमाशी ही गोड रसाळ फळावरच अटॅक करते. फळातला रसशोषण करते आणि फळ गळून खाली पडते. त्यामुळे नुकसानची मात्रा अधिक राहते. त्या पार्श्‍वभूमीवर कामगंध सापळ्याचा उपाय परिणामकारक ठरतो. कामगंध सापळ्यांचा वापर चौधरी कुटूंबियांकडून जुन्या बागेत आठ ते नऊ वर्षांपासून केला जात आहे. एका ट्रॅपवर सरासरी 175 रुपयांचा खर्च होतो. रासायनीक किडनाशक फवारणीच्या तुलनेत हा उपचार कमी खर्चीक असल्याचे ते सांगतात. पांढरी माशी, तुळतुडे यांच्या नियंत्रयणाकरीता पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर होतो.

कीडनियंत्रणाचा प्रभावी उपाय


संत्रा बागेतील कीड नियंत्रणासाठी त्यांनी एकात्मिक पध्दतीचा अवलंब केला आहे. त्याकरीता संत्रा बागेत ट्रॅप सोबतच इतर पर्यायांचाही सुयोग्य पध्दतीने वापर केला गेला आहे. बागेत झेंडू, तुळस तसेच मका व तर लागवड आहे. झेंडूकडे सुत्रकृमी आकर्षित होतो. तुळशीमुळे ऑक्सिजन झाडांना मिळतो. तुरीमुळे शेंगा मिळतात तसेच जमिनीमध्ये नायट्रोजनच्या गाठी तयार होतात, झाडांना नायट्रोजन मिळते. मावा व इतर किडी मका कणसाकडे आकर्षित होत त्यावर हल्ला करतात. अशाप्रकारच्या पर्यायाचा वापर करुन त्यांनी प्रभावी कीडनियंत्रण साधले आहे. प्रती झाड किडीची संख्या (ईटीएल लेव्हल) पाहून किडनियंत्रणासाठी इतर पर्यायांचा विचार होतो. परंतू गेल्या काही वर्षात अशा पर्यायांचा विचार करण्याची गरजच पडली नसल्याचे ते सांगतात. यापूर्वी रासायनिक किडनाशकाचा वापर केला जात होता. त्या पद्धतीत तीन एकरावरील बागेच्या व्यवस्थापनावर 54 हजार रुपयांचा खर्च होता. त्यावर आजच्या घडीला बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविल्याचे समाधान असल्याचे राहूल चौधरी सांगतात.

पारंपरीक आणि व्यावसायिक पिकांची सांगड

कपाशी, तूर, सोयाबीन या पारंपरीक पिकाच्या जोडीला हळद, आले आणि मिरची सारख्या व्यावसायिक पिकांची पण लागवड त्यांनी यापूर्वी केली. यातील पारंपरीक पिके आजही घेतली जात असली तरी व्यावसायिक पिकांखालील क्षेत्र त्यांनी कमी केल्याचे ते सांगतात. व्यावसायिक पिकातून गाठीशी जुळलेल्या पैशातूनच शेळीपालनासारखा व्यवसाय उभा करता आला. कोणत्याही बॅंकेतून कर्ज काढण्याची गरज भासली नाही, असेही त्यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले.

शेतीला दिली पूरक व्यवसायाची जोड


गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी शेळीपालनात पुढाकार घेतला आहे. गावरानी जातीच्या शेळ्यांचे संगोपन ते करतात. त्यांच्याकडील बोकड मात्र उस्मानाबादी जातीचा आहे. त्यांच्यापासून मिळणारी पिल्ले काटक राहतात. त्यामुळे उस्मानाबादी बोकडाच्या संगोपनावर भर दिल्याचे ते सांगतात. दोन वर्षांपूर्वी त्यांन 54 शेळ्या घेतल्या होत्या. आज त्यांच्याकडील शेळ्यांची संख्या 45 आहे तर 35 पिल्ले आहेत. 250 रुपये किलोप्रमाणे उस्मानाबादी बोकडाची खरेदी त्यांनी केली होती. 5 ते 11 हजार रुपयांप्रमाणे त्यांनी शेळीची खरेदी केली होती. यातील एका शेळ्यांनी पाच पिल्ले दिली होती. पाच पिल्ले दिलेली शेळी चरण्यासाठी गेली असता रासायनीक खत खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला होता.

चारा उपलब्धता


यशवंत चाऱ्यांची लागवड त्यांनी केली आहे. अर्धा एकरावर ही लागवड असून आजवर 41 वेळा त्यांनी कापणी केली. त्यामुळे चाऱ्याचा हा पर्याय फायदेशीर ठरतो, असा त्यांचा अनुभव आहे. तुरीचे कुटार, सुबाभुळ, आंबा, कडूलिंबाचा पाला यांचाही चारा म्हणून वापर होतो.

शेळ्यांकरीता शेडची उभारणी

दोन एकर क्षेत्र त्यांनी शेळीपालनाकरीता राखीव ठेवले असून 25 बाय 60 फुट आकाराचे शेड आहे. याच ठिकाणी ऑफीस सुध्दा आहे. या संपूर्ण बांधकामावर सुमारे साडेसहा लाख रुपयांचा खर्च झाल्याचे ते सांगतात. बांधकामासाठी लागणाऱ्या काही साहित्याची उपलब्धता घरुनच केल्याने खर्च कमी लागला. शेळ्यांसाठीची औषधी या ठिकाणी ठेवली आहे. जंतनाशक औषधांचा डोज नियमीतपणे शिफारसीत मात्रेत दिला जातो.

शेळ्यांचे मार्केटींग

चौधरी यांच्या फार्मपासून आठ किलोमीटरवर राजूरा बाजार हे गाव आहे. गुरुवारी येथे गुरांचा बाजार भरतो. किलोने विकण्याचे नियोजन असताना या भागात मात्र बोकडाला हात लावून अंदाजे वजन ठरविले जातात. सरासरी वजन ठरविण्याचा प्रकार चुकीचा असला तरी या भागात मात्र हीच पध्दती प्रचलीत आहे. उंची आणि वजनावर शेळीचा दर ठरतो. 15 ते 20 किलो वजन असलेल्या मांसल बोकडाची विक्री 5 हजार रुपयांना होते. जनावरांचा दर्जा हा देखील दरावर परिणाम करणारा घटक ठरतो, असे राहूल सांगतात. शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी एटीएम आहे. गरजेच्यावेळी हमखास पैसा यातून मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा शेतीपूरक व्यवसायांच्या पर्यायांचा विचार केला पाहिजे, असा सल्ला राहूल देतात. गावात इतर शेतकरी देखील शेळीपालन करतात. व्यापाऱ्यांना या गावातील व्यवसायाविषयी माहिती असल्याने ते शेळी खरेदीसाठी गावात पोचतात.

शेळ्यांकरीता प्लॅटफार्म


जमिनीपासून तीन फुट उंच प्लॅटफार्म तयार केला आहे. बांबुचा वापर याकामी करण्यात आला आहे. फंगस (बुरशी) चा प्रादुर्भाव यामुळे होत नाही. त्यासोबतच शेळीला कोरडा परिसर हवा असतो. अन्यथा शेळ्यांमध्ये आजारपण व त्यानंतर मर्तुकीचे प्रमाण वाढीस लागते. दर आठ दिवसांनी बांबुखाली भागाची स्वच्छता राखली जाते. खालच्या भागास मुरुम टाकण्यात आला आहे. मुरुम ओलावा शोषतो परिणामी कॉक्रीटीकरण करण्यात आले नाही. आणि चुना आणि कपडे धुण्याची पावडर याचा वापर करुन हा भाग निर्जंतुकीकरण केला जातो. कडूलिंबाचा पाला वापरुन धुर ते करतात. डास व इतर किडींचा वावर शेळीपालन असलेल्या भागातून कमी होतो. अभ्यासपूर्ण शेतपध्दतीचा आदर्श सांगणाऱ्या राहूलच्या कार्यपध्दतीचे अनुकरण नक्‍कीच फायद्याचा सौदा ठरणार हे निश्‍चीत !


संपर्क : राहूल चौधरी
9765402121
शब्दांकन : चैताली बाळू नानोटे
निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

स्त्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate