स्वयंचलित खाद्य, पाणी व्यवस्थापन यंत्रणेचा वापर मुंगसरे (ता. जि. नाशिक) येथील दीपक मुरलीधर भोर यांनी केवळ शंभर ब्रॉयलर पक्ष्यांपासून सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय मागील अठरा वर्षांत पन्नास हजार पक्ष्यांपर्यंत वाढवला. काटेकोर नियोजन, बाजारपेठेवर त्यांचे कायम लक्ष असते. पक्ष्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी स्वयंचलित तंत्रज्ञान वापरणारे नाशिक जिल्ह्यातील ते पहिले व्यावसायिक शेतकरी आहेत.
नाशिक भागातील मुंगसरे परिसर हा तसा बागायती शेतीचा परिसर. मुंगसरे फाट्यानजीक मुंगसरे ते आनंदवल्ली रस्त्यालगत भोर कुटुंबीयांची शेती आहे. गोरख आणि दीपक भोर या बंधूंचा पोल्ट्री फार्म ही या परिसराची ओळख. वडिलोपार्जीत अवघे दीड एकर क्षेत्र या दोन्ही भावांच्या वाट्याला आलेले. शिक्षण जास्तीत जास्त बारावीपर्यंत, जवळ भांडवलही नाही. या स्थितीत गावातील तरुण रोजंदारी किंवा नोकरीचा पर्याय स्वीकारतात. दीपक भोर यांनीदेखील पोल्ट्री उद्योगातील एका नामांकित कंपनीत सहा वर्षे नोकरी केली. याच काळात पोल्ट्री व्यवसायाची जवळून ओळख झाली. घरी तसा गावरान कोंबडीपालनाचा व्यवसाय केलेला होता. मात्र व्यावसायिक कुक्कुटपालन उद्योगातील संधी लक्षात आल्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्याच कंपनीशी करार करून पूर्णवेळ करार पोल्ट्री उद्योगात उतरले.
पोल्ट्रीतील व्यवस्थापनाबाबत श्री. भोर म्हणाले, की एका शेडमध्ये वर्षातून पाच बॅचेस निघतात. पक्षी जन्मल्यानंतर काही तासांत शेडमध्ये येतो. कंपनीच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त वजनाचा व उच्च गुणवत्तेचा पक्षी निर्माण करणे, मरतूक कमी ठेवण्याचेही दडपण असते. काटेकोर व्यवस्थापन केल्यासच पक्ष्यांचे अपेक्षित वजन व गुणवत्ता मिळते. आम्ही घरचे सहा जण पोल्ट्रीच्या व्यवस्थापनामध्ये असतो. नियोजनामध्ये मी स्वतः, मोठा भाऊ गोरख आणि भाचा शशिकांत हांडगे यांचा सहभाग असतो. पोल्ट्रीमध्ये वेळेचे गणित अचूकपणे सांभाळावे लागते. मजुरांची टंचाई, वाढते भारनियमन, काही वेळा महत्त्वाच्या औषधांची खरेदी करावी लागते. त्याच बरोबरीने अचानक येणाऱ्या समस्या पोल्ट्री व्यवसायाला भेडसावतात. कामाची वेळ चुकल्यास नुकसान होते. असे असताना चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मागील दहा वर्षांत प्रत्येक वर्षी सलग पाच बॅचेसचे उत्पादन मिळाले आहे.
सन 1995 पासून सुरवातीला काही वर्षे व्यक्तिगत पातळीवर कुक्कुटपालन केल्यानंतर श्री. भोर मागील दहा वर्षांपासून खासगी कंपनीशी कराराद्वारा जोडले आहेत. करार शेतीमुळे माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकाला मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविणे शक्य झाले असल्याचे ते सांगतात. शेडची उभारणी, वीज, पाणी, पक्ष्यांचे संगोपन ही शेतकऱ्याची जबाबदारी असते, तर पक्ष्यांना खाद्य पुरविणे, औषधे व वैद्यकीय साह्य करणे या बाबी कंपनीकडे असतात. प्रचलित कुक्कुटपालनापेक्षा करारपद्धतीने केलेल्या कुक्कुटपालनात जोखीम तुलनेने कमी असल्याचे श्री. दीपक यांनी आवर्जून नमूद केले.
प्रति पक्ष्यामागे औषधे, मजुरी, लसीकरण, बॅंकेचे व्याज, इतर व्यवस्थापन असा एकत्रित खर्च सहा रुपये येतो. प्रति पक्षी 10 रुपये उत्पन्न मिळते म्हणजे प्रत्येक पक्ष्यामागे सरासरी चार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. सरासरी 50 हजार पक्ष्यांमागे खर्च वजा जाता सरासरी दोन लाखांचे उत्पन्न मिळते. बॅच प्रमाणे हे उत्पन्न कमी जास्त होते.
वर्ष ---- पक्ष्यांची संख्या
1994 ----- 100
1995 ----- 200
1996 ----- 500
2000 ----- 1000
2001 ----- 3000
2002 ---- 3000
2003 ---- 10,000
2006 ---- 16000 (इंदोरे (ता. दिंडोरी) येथे 3 एकर जमीन खरेदी केली)
2007 ---- 28,000
2008 ----- 28,000
2009 ------ 30,000
2010 ------ 30,000
2011 ----- 35,000 (ऍटोमेशन केले)
2012 ----- 50,000
2013 ------- 51,000
--------------------------------------------------------------------------------------------
संपर्क : दीपक भोर : 9922907759
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...