पाटखळमाथा येथील मिथुन गायकवाड यांच्या कादंबरी ॲग्रो फूडस्ची आवळ्यापासून बनविणाऱ्या विविध सेंद्रीय उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. याची प्रचती नुकत्याच झालेल्या मानिनी जत्रेत आली.
पदवीधर असणाऱ्या मिथुन गायकवाड यांनी पुणे येथील नोकरी सोडून गेल्या तीन वर्षांपासून पाटखळसारख्या ग्रामीण भागात आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या आत्मा तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर आवळ्यापासून साखर आवळा कँडी, सेंद्रीय गुळ आवळा कँडी, मद आवळा कँडी, आवळा ज्युस, आवळा पावडर, आवळा लोणंचे, आवळा गुलकंद, आंबा पावडर, गवती चहा पावडर अशी उत्पादने घ्यायला सुरुवात केली. या प्रक्रिया उद्योगात पत्नी, वडील, भाऊ यांचे मदत असल्याचे सांगून मिथुन यांनी माहिती दिली, माझ्या आवळ्याच्या प्रक्रिया उत्पादनात पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी कोणताही दुसरा पदार्थ घालत नाही. तरी देखील आवळा कँडी टिकून राहते. त्याच्या स्वादामध्ये फरक दिसून येत नाही.
आपल्या उत्पादनाला ग्राहकांकडून खूप मागणी होत आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत खूप चांगल्या पद्धतीने मदत झाली. नुकत्याच झालेल्या मानिनी जत्रेमध्ये आपल्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. हे केवळ ग्राहकांच्या पसंतीमुळेच. सध्या अजूनही या प्रक्रिया उद्योगाच्या अनुषंगाने विविध पदार्थ निर्मितीमध्ये संशोधन आणि प्रयोग सुरु आहेत. लवकरच त्यासाठी याचा विस्तार करणार असल्याचेही मिथुन यांनी सांगितले. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणानंतर गरजु महिला तसेच युवकांनी छोटे मोठे प्रक्रिया उद्योग उभा करावेत. शेतकऱ्यांनीही प्रक्रिया उद्योगाकडे वळल्यास त्यांच्या शेतमालाला खूप चांगला फायदा होऊ शकतो, हे मी गेल्या तीन वर्षांपासून या प्रक्रिया उद्योगातून स्वत: अनुभवतोय.
मिथुन गायकवाड यांच्याकडे स्वत:ची केवळ 27 गुंठे जमीन आहे. आवळा प्रक्रिया उद्योगासाठी ते विविध शेतकऱ्यांकडून आवळा विकत घेतात. याच्या जोरावर आवळ्यापासून विविध उत्पादनातून खूप चांगला आर्थिक फायदा मिळवून ते सक्षम ठरत आहेत. मिथुन हे कडकनाथ कोंबडी पालनही करतात. त्यापासूनही त्यांना खूप चांगला फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. कादंबरी ॲग्रो फूडस्च्या माध्यमातून मिथुन सारखा तरुण प्रक्रिया उद्योगात प्रेरणा देणारा आणि सेंद्रीय पदार्थांचा प्रसार करणाराही ठरत आहे.
लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी,
सातारा
स्त्रोत - महान्युज
कोंबड्यांच्या वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर वातावरणा...
आवळा कॅन्डी
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, श...