बांबूपासून सुमारे साडेतीनशे प्रकारच्या विविध कलाकृती तयार करून, त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न कोल्हापूर येथील अशफाक मकानदार यांनी केला आहे. बदलत्या जमान्यानुसार ग्राहकांची मागणी लक्षात घेत त्यांनी आपल्या राज्यासोबतच परराज्यांतही विविध वस्तूंना बाजारपेठ तयार करीत या व्यवसायाची क्षमता सिद्ध केली आहे.
बांबूवर आधारित वस्तूंचा वापर ही सध्याची "फॅशन' आहे. घराच्या सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. कोल्हापूर शहरातील जैबुन्निसा मकानदार यांना अशा वस्तूनिर्मितीचा छंद होता. पोलिओने अपंगत्व आलेल्या जैबुन्निसा यांनी याच छंदाचे रूपांतर पुढे व्यवसायात केले. सन 1985 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अशफाक सांभाळत आहे.
इंजिनिअर होऊनही नोकरी न करता आईच्या या व्यवसायात त्यांनी वृद्धी केली आहे.
सन 2003 पासून पूर्णवेळ ते या व्यवसायात आहेत. बदलत्या जमान्यात बांबूच्या उत्पादनांची मागणी, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यात नवे बदल वा मूल्यवर्धन करून बाजारपेठेत त्यांची मागणी वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जुन्या वस्तूंना "मॉडर्न टच' दिला. व्यवसायासाठी त्यांनी पंतप्रधान रोजगार हमी योजनेमार्फत 15 लाख रुपयांचे 13 टक्के व्याजदराने कर्ज घेतले. या रकमेत 15 टक्के अनुदान मिळाले.
फ्लॉवर पॉट, पेन स्टॅंड, ज्वेलरी बॉक्स, बर्ड हाऊस, विंड चाईम, डायनिंग सेट, बांबूच्या खुर्च्या, आरामखुर्च्या, सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, चटई, पडदे, फ्लोरिंग पार्टिशन्स, फ्रूट बास्केट, टोप्या, आकाशदिवे, झुले, टॉवेल होल्डर, फाउंटन्स, फ्लोअर लॅम्प, झुंबर, वॉल लॅम्प, बॅंगल्स, हेअर क्लिप, ट्रे, कॅंडल डीनर स्टॅंड, बांबूची विविध स्ट्रक्चर्स.
याच्या निर्मितीसाठी कळक जातीचा बांबू लागतो. 14 फूट लांबीचा बांबू लागतो. एका बांबूची किंमत अंदाजे 40 ते 100 रुपये असते. आकार व लांबीनुसार विविध दर असतात. बांबूवरील गाठी काढून घेऊन तो घोळून घेतला जातो, त्याला पॉलिश करून आवश्यकतेनुसार विविध आकार तयार केले जातात. त्याला कीड- रोग लागू नये यासाठी प्रक्रिया केली जाते. पॉलिश किंवा गरजेनुसार रंग दिला जातो. वर्षभरात अंदाजे एक हजार लॅम्प तयार करतात. ते तयार करण्यासाठी वीज, मजुरी, पॉलिश, रसायन आदी साहित्य, वाहतूक असा अंदाजे सात लाख रुपयांचा खर्च येतो. प्रति नग 650 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळतो. खर्च वजा जाता अंदाजे तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.
यासाठी मेसकाटी (कागदी चिवा) प्रकारचा बांबू वापरण्यात येतो. दोन इंच जाडीचा व 24 फूट लांबीचा चिवा अंदाजे 60 रुपये दराने विकत घेतात. चिवा फोडून पट्ट्या तयार केल्या जातात. गरजेनुसार आकार करून त्यावर प्रक्रिया केली जाते. चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे सुमारे 35 प्रकारचे आकाश कंदील वर्षभरात अंदाजे सहा हजार संख्येने तयार करतात. चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता दीड लाख रुपये मिळतात.
आकाश कंदील तयार करताना शेंड्याकडील शिल्लक राहिलेल्या चिव्याचा उपयोग विंड चाईम तयार करण्यासाठी केला जातो. सुमारे 20 प्रकारचे विंड चाईम तयार करतात. वाऱ्याची झुळूक येताच घरात अडकवलेल्या या विंड चाईममधून मधुर ध्वनी निर्माण होतो.
कळक बांबूपासून विविध क्षेत्रफळांचे बेड तयार करतात. एका बेडसाठी अंदाजे 20 बांबू लागतात.
लग्नसराईत रुखवतात सजावटीसाठी बांबूच्या विविध वस्तूंचा वापर होतो. दीपावलीच्या काळात आकाश कंदिलांना मागणी असते. सध्या मुंबई, बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, गोवा या शहरांतील मॉल्स, मोठे स्टोअर्स येथे बांबूची उत्पादने अशफाक यांनी विकली आहेत. अनेक ठिकाणी विक्रीवृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
उत्पादनांची आगाऊ मागणी नोंदवूनच उत्पादन घेतले जाते. रेस्ट हाऊस, रिसॉर्ट, पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, टेंट हाऊस, फार्म हाऊस, पर्णकुटी (बांबू हाऊस) आदींकडूनही सजावटीसाठी या उत्पादनांना मागणी असते. उत्पादनांच्या विक्रीसाठी "डेव्हलपमेंट कमिशन ऑफ हॅन्डिक्राफ्ट'कडून विविध प्रदर्शनांमध्ये मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातात.
वर्षभरात अंदाजे साडेतीनशे प्रकारच्या वस्तू अशफाक तयार करतात. यातून सुमारे 50 लाख रुपये किमतीची उलाढाल होते. उत्पादन खर्च, मार्केटिंग (त्यासाठी वेगळी टीम आहे), वाहतूक आदीचा खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. त्यात मागणीनुसार चढ- उतार राहतात.
अशफाक मकानदार - 9028525410
साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर
अशफाक म्हणाले, की बांबूच्या वस्तू पंधरा वर्षे टिकतात. जंगलतोडीच्या आजच्या युगात इकोफ्रेंडली बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. आम्ही बांबूचे महत्त्व व्यवसायाच्या माध्यमातून वाढवत आहोत
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...