অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जरबेराच्या शेतीतून नवे रंग

अहमदाबाद येथे शिक्षण, तर मुंबई येथे बॅंकेत नोकरी करणाऱ्या ज्योतीताई. आजोळच्या शेतीशी दुरान्वयानेच आलेला संबंध! मात्र, एका नाट्यमय घटनेतून पॉलिहाऊसमधील जरबेरा शेतीसाठी त्यांना प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (एनएचएम) अनुदान मिळाले. गुणवत्ता व विपणनाच्या जोरावर अल्पावधीतच एकाचे दोन पॉलिहाऊस उभारले, तिसऱ्याची आखणी सुरू आहे. आता पूर्ण वेळ फुलशेतीतच झोकून दिलेल्या ज्योतीताईंची ही प्रेरणादायी शेती...

जळगाव येथे सासर असलेल्या सौ. ज्योती अरुण नंदर्षी यांनी माहेरी म्हणजे अहमदाबाद येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. बॅंकेत नोकरी करणाऱ्या ज्योती यांच्या शेतीतील प्रवेशाला कारण ठरले ते पॉलिहाऊसमधील जरबेरासाठीचे कर्जप्रकरण! त्याचे झाले असे, त्यांचे पती मुंबईत बॅंकेत नोकरीला असल्याने लग्नानंतर 1981 मध्ये त्यांनीही मुंबईत सहकारी बॅंकेत नोकरी सुरू केली. 1990 मध्ये श्री. अरुण यांची जळगावला बदली झाली. ज्योतीताईंनीही जळगावात बदली करून घेतली. तेथे सहकारी बॅंकेत त्यांच्याकडे कर्जप्रकरण विभाग होता. एके दिवशी शेतकरी त्यांच्याकडे पॉलिहाऊस उभारणीसाठी कर्ज मागण्यासाठी "प्रोजेक्‍ट रिपोर्ट' (प्रकल्प अहवाल) घेऊन आला. त्यात जरबेरा शेतीबाबत माहिती होती.

प्रकल्प अभ्यासताना ज्योतीताई प्रभावित झाल्या. त्यांना आपले बालपण खुणावू लागले. याबाबत त्या म्हणाल्या, की वरणगाव (ता. भुसावळ, जि. जळगाव) हे माझे आजोळ. बालपणी आम्ही सुट्ट्यांमध्ये येथे यायचो, बैलगाडीवर बसून शेतात रपेट मारायचो. शेतातीलच कैऱ्या, चिंचा, जांभळं, ऊस, केळी खायचो. तो आनंदच अगदी वेगळा होता. त्यावेळेपासूनच शेती मनाच्या कप्प्यात कुठेतरी घर करून बसली होती. शिक्षण, संसार, नोकरी यात ते सर्व मागे पडले. शेतकऱ्याच्या त्या प्रोजेक्‍ट रिपोर्टमुळे अंतर्मन ढवळून निघाले. आपणही अशीच शेती करावी असा विचार सुरू असताना माझे पती व दीर श्री. अनिल यांनी प्रोत्साहन दिले. मात्र, पॉलिहाऊससाठी किमान 12 लाख रुपये खर्च येणार होता. इच्छा असली तरी हिंमत होत नव्हती.

नंदर्षी कुटुंबीयांनी 1992 मध्ये तरसोद (ता. जि. जळगाव) येथे दोन एकर शेती विकत घेतली होती. त्यात केळी, भाजीपाल्यासह खरिपात ज्वारी, मका; तर रब्बीत गहू, हरभरा अशी पिके घेतली जात. त्यातून फार अर्थार्जन झाले नाही. असे असूनही ज्योतीताईंनी पॉलिहाऊसबद्दल सांगितले तेव्हा घरच्यांकडून त्यांना सकारात्मकच प्रतिसाद मिळाला.

आत्मविश्‍वास वाढवला

लागवडीच्या पहिल्याच वर्षी पॉलिहाऊस व जरेबरासाठी केलेला 80 टक्‍क्‍यांहून अधिक खर्च निघाला, यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला. घरी सर्वांशी चर्चा करून नोकरीला रामराम ठोकला व पूर्णवेळ फुलशेतीत रमण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये 20 गुंठ्यांचे आणखी एक पॉलिहाऊस उभारून जरबेरा शेती सुरू केली, त्यासाठी 22 लाखांचा खर्च आला. शासनातर्फे अनुदान मिळाले. सुरवातीचे दहा गुंठे व नंतरचे 20 गुंठे अशा 30 गुंठ्यांतून वर्षाकाठी सुमारे 28 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले. 2011 मध्ये पुन्हा 20 गुंठे क्षेत्रावर तिसरे पॉलिहाऊस उभारण्याच्या तयारीत असल्याचे सांगताना ज्योतीताईंच्या चेहऱ्यावर आत्मविश्‍वास झळकत होता.

इतरांनीही प्रेरणा घ्यावी

बॅंकेत नोकरी करणाऱ्या ज्योतीताईंनी निव्वळ एका "प्रोजेक्‍ट रिपोर्ट'मुळे भारावून जात फुलशेतीत उतरण्याचा निर्णय घेतला. धाडस, कर्तृत्व, कष्ट, चिकित्सक वृत्ती अशा गुणांतून त्यांनी नवख्या असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांची ही शेती इतरांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शेतीसाठी शासनाच्या अनेक योजना असून प्रतवारी, पॅकिंगद्वारे विपणन साखळी बळकट करण्यासाठी "एनएचएम'मध्ये मोठी तरतूद आहे, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तंत्र अधिकारी अनिल भोकरे यांनी केले आहे.

अखेर स्वप्न साकार झाले


पॉलिहाऊसमधील शेतीतील अधिक माहिती घेत असताना जळगाव कृषी विभागातील तंत्र अधिकारी अनिल भोकरे यांनी उपयुक्‍त मार्गदर्शन केले. "एनएचएम'मधून यासाठी अनुदानही मिळते असे सांगून विश्‍वास वाढवला. तळेगाव (पुणे) येथील फुलशेतीतील "हायटेक' तंत्रज्ञान प्रशिक्षणाचीही सोय करून दिली. घरच्यांनीही बॅंकेतून कर्ज घेण्यास संमती दिली. फेब्रुवारी 2008मध्ये पॉलिहाऊस उभारणीला सुरवात होऊन जुलैमध्ये काम पूर्ण झाले. दहा गुंठ्यांतील पॉलिहाऊस व त्यातील जरबेरा लागवडीसाठी सुमारे 12 लाख रुपये खर्च आला. त्यात साडेचार लाखांचे कर्ज घेतले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे व श्री. भोकरे यांनी एक लाख 25 हजारांचे अनुदान तत्काळ मिळवून दिले. जरबेराची शेतीही बाळसे धरू लागल्याने सुप्तावस्थेत गेलेले स्वप्न पूर्ण होताना मी पाहत होते, हे सांगताना ज्योतीताई काहीशा भावनाविवश झाल्या.

व्यवस्थापन महत्त्वाचे


ज्योतीताईंनी पुण्यातील कंपनीला पॉलिहाऊस उभारणीचे काम दिले होते. अन्य कंपनीकडून जरबेरासाठी लागणारे बेड तयार करून घेऊन त्यांच्याकडून दर्जेदार रोपेही आणली. प्रति रोपासाठी 30 रुपये मोजले. बॅंकेत कार्यरत ज्योतीताईंसाठी खरेतर पॉलिहाऊस व जरबेराची शेती करणे अनुभवाअभावी धाडसाचेच होते; मात्र जोखीम कमी करण्यासाठी त्यांनी संबंधित दोन्ही कंपन्यांशी किमान वर्षभर मोफत व गरजेनुसार सेवा पुरविण्याचा (आफ्टर सेल्स सर्व्हिस) करार करून घेतला. अशा प्रकारे शेतीतील उत्पादन हे तंत्रज्ञानाचा अचूक वापर व काटेकोर व्यवस्थापनाच्या आधारेच यशस्वी होते, हे सूत्र त्यांना उमगले होते. दहा गुंठ्यांत त्यांनी सुमारे सहा हजार 500 रोपे लावली. रोपांचे डोळ्यांत तेल घालून संगोपन केले. ठिबकद्वारे पाणी देताना योग्य वाफसा राहील अशी काळजी घेतली, त्यामुळे पाणी साठून बुरशीजन्य रोगांचा होणारा प्रादुर्भाव त्यांच्या बागेत दिसला नाही. फुलशेती तणविरहित ठेवण्यावर कटाक्ष राहिला. नागअळी तसेच अन्य किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणींवर त्यांचा भर असतो. खत व्यवस्थापनासाठी फर्टिगेशन तंत्राचा वापर होतो. दक्ष व्यवस्थापनातून बागेतील फुलांचा आकार हाताच्या पसरट पंजाएवढा मोठा व तजेलदार आहे.

प्रतवारी, पॅकिंग आणि उत्पादन - खर्च


दर्जेदार फुलांची रंग व आकारानुसार प्रतवारी केली जाते. त्यांच्याकडे सुमारे 14 ते 15 रंगांचे जरबेरा आढळतात. पॉलिहाऊसशेजारीच पॅकिंगहाऊस आहे. फुलांची तोडणी, प्रतवारी, पॅकिंगसाठी तरसोद येथील सहा महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पॅकिंगच्या खोक्‍यांची वाहतूक, तसेच फवारणीसाठी मजूर आहे. जरबेराच्या एका रोपापासून वर्षभर सुमारे 50 फुले येतात. मागणीनुसार दोन ते पाच रुपये प्रति नग या दराने फुले विकली जातात. सरासरी तीन रुपये दर पकडला तर एक रोप 150 रुपयांचे उत्पन्न देते. दहा गुंठ्यांतील सहा हजार 500 रोपांपासून वर्षभरात नऊ लाख 75 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी महिन्याकाठी 20 ते 25 हजारांचा खर्च येतो, असे ज्योतीताईंनी सांगितले.
जळगावातीलच मागणी एवढी मोठी आहे की पुरवणे शक्‍य नाही. यासाठी फुलांचे उत्पादन सुरू झाल्यावर किरकोळ फुलविक्रेत्यांना भेटून घाऊक दरात जागेवर माल पुरविण्याबाबत विचारणा केली, त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. नागपूरहूनही मागणी जास्त असल्याने क्‍वचितप्रसंगी "ट्रॅव्हल्स'ने खोक्‍यातून फुले पाठवतो. एका खोक्‍यात 80 ते 100 जुड्या बसतात. एका जुडीत दहा फुले व्यवस्थित पॅक केलेली असतात.

सौ. ज्योती अरुण नंदर्षी, 9881083322

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate