অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंबात झेंडूचे आंतरपीक ठरले फायदेशीर

सूत्रकृमी प्रतिबंधाबरोबरच झाला आर्थिक फायदा

कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील श्रीकांत गौरीशंकर राजमाने या तरुण शेतकऱ्याने डाळिंबामध्ये झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले असून, आर्थिक फायद्यासोबतच डाळिंबातील सूत्रकृमींच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न केले आहेत. 
मोहोळ- विजापूर महामार्गावर कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे श्रीकांत गौरीशंकर राजमाने यांची 20 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यामध्ये 12 एकर ऊस, 4 एकर डाळिंब आणि 4 एकर चारा पिकाची लागवड आहे. गौरीशंकर राजमाने हे जिल्हा बॅंकेत सचिवपदी कार्यरत होते, त्यामुळे नोकरीतून शेतीकडे लक्ष देणे शक्‍य होत नसे. शेतीमध्ये केवळ ज्वारी, गहू यासारखी पिके ते घेत असत. तसेच, भाऊ श्रीनिवास शिक्षक आहेत. श्रीकांत याने पदवी घेतल्यानंतर 2008 च्या सुमारास शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. ऊस पीक घेण्यास सुरवात केली. उसाचे एकरी टनेज वाढवण्यासाठी प्रयत्न केला. शेतात जुन्या दोन विहिरी असल्या तरी पाणी कमी पडत होते, त्यामुळे गावाशेजारी असलेल्या उजनी कालव्यालगत एक एकर जमीन खरेदी केली. तिथे बोअर घेऊन, त्याचे पाणी पाइपलाइनद्वारे शेतात आणले. त्यानंतर पहिल्याच वर्षी उसाचे एकरी 80 टन उत्पादन मिळवले. पुढे दोन- तीन वर्षे त्यांनी उसाचे चांगले उत्पादन घेतले. हराळवाडी येथील शेतकरी गोपाळ शेळके यांच्या सल्ल्यानुसार डाळिंबाच्या लागवडीचा निर्णय घेतला. वडील गौरीशंकर आणि भाऊ श्रीनिवास यांनीही पाठिंबा दिला. नवीन पिकाकडे वळताना माहिती मिळविण्यासाठी अन्य शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांना भेटी दिल्या.

डाळिंबाची लागवड

2013 च्या ऑक्‍टोबरमध्ये भगवा वाणाच्या डाळिंबाची लागवड चार एकर क्षेत्रावर केली. त्यात दोन ओळींतील अंतर 11 फूट आणि दोन रोपांतील अंतर 7 फूट ठेवले.

  • लागवडीसाठी बैलाने सरी पाडून त्यावर ड्रीपलाइन टाकली. सरी पाण्याने भिजवून तिसऱ्या दिवशी डाळिंब रोपे लावली. कीड व रोग नियंत्रणासाठी गरजेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या. खतांचे योग्य नियोजन करीत त्यांनी आठ- दहा महिने डाळिंबाची देखभाल केली.
  • यावर्षी मे महिन्यामध्ये बाग ताणावर सोडली. 10 ऑगस्टला छाटणी केली. 15 ऑगस्टला पानगळ करून बहर धरला आहे.

आंतरपिकाची लागवड

डाळिंब झाडांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आंतरपीक घेण्याचा विचार केला. आता वडील निवृत्त झाले असून, तेही शेतात मदतीला येतात.

  • डाळिंबाचा बहर धरण्याअगोदर जुलैच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाच्या दोन रोपांतील सात फुटांच्या अंतरात दीड फुटावर एक याप्रमाणे तीन झेंडूची रोपे लावली. झेंडूच्या रोपांसाठी त्यांना प्रति रोप सव्वादोन रुपये खर्च आला. एकरी साधारणपणे अडीच हजार रोपे लागली. त्यानंतर पहिल्या पंधरवड्यात खुरपण केले आणि भोद बांधणी केली.
  • झेंडूच्या लागवडीनंतर पहिल्या आठवड्यात एकरी डीएपी एक पोते, अर्धे पोते युरिया, 12ः61ः0 खत 5 किलो, 19ः19ः19 पाच किलो अशी खतमात्रा दिली. - झेंडूतील नागअळी, थ्रिप्स या किडींच्या व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी दर आठ दिवसांनी गरजेनुसार फवारण्या घेतल्या.
  • त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी फुलकळी निघाल्यानंतर पुन्हा झिंक, फेरससह 0.52.34 या खताच्या फवारण्या घेतल्या. पुढे लागवडीच्या 45 दिवसांनंतर फुले काढणीस आली.

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी साधली...

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पहिली तोड झाली. दुसऱ्या तोडीत सप्टेंबरमध्ये एकरी अडीच टन फुले निघाली. त्या वेळी गणेशोत्सव आणि दसऱ्यामुळे फुलांना चांगली मागणी होती. आतापर्यंत सहा तोडे झाले असून, 8 टन 940 किलो उत्पादन निघाले आहे. फुलांची विक्री सोलापूर येथील बाजार समितीत सरासरी 50 रुपये किलोप्रमाणे झाली असून, 4 लाख 47 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 
उत्पादन खर्च - झेंडूची रोपे - 5,625 रुपये, खते - 4,000 रुपये, कीडनाशके - 3,000 रुपये, मजुरी - 20,000 रुपये असा एकूण 32,625 रुपये खर्च झाला.

झेंडूमुळे डाळिंबाला फायदा

डाळिंबाचा सध्या बहर धरण्यात आला आहे. झेंडू लागवडीचा डाळिंबाला फायदा होतो. झेंडूमुळे डाळिंबाच्या बागेत सूत्रकृमींना प्रतिबंध होतो. तसेच, झेंडूकडे मधमाश्‍या आकर्षित होतात, त्याचा फायदा डाळिंबाच्या फळधारणेसाठी होतो. शिवाय, झेंडूसाठी केलेली मशागत डाळिंबालाही फायेदशीर ठरली, त्यामुळे तण नियंत्रणाच्या खर्चातही बचत झाली.

दुग्ध व्यवसायाचीही मिळते साथ

  • श्रीकांत यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडेही लक्ष दिले आहे. आज त्यांच्याकडे 8 होलस्टिन गाई असून, त्यापैकी 4 गाई दुधाळ आहेत. एक गाय प्रतिदिन 20 लिटर दूध देते, याप्रमाणे 80 लिटर दूध डेअरीला जाते. प्रतिलिटर 26 रुपयांप्रमाणे दर मिळतो. पशुपालनासाठी महिन्याकाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च होतात.
  • पशुपालनातून दुधाबरोबर शेणखताची उपलब्धता हा मोठा फायदा आहे. शेणखताचा वापर शेतीसाठी केला जातो.


संपर्क - श्रीकांत गौरीशंकर राजमाने, 9604553223

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate