অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रक्रिया उद्योग विस्तारला

सुनील नायकलवाडी यांची कांदा-लसूण चटणी निर्मिती


सांगली जिल्ह्यातील नायकलवाडी (ता. वाळवा) येथील तरुण पदविकाधारक अभियंता सुनील धोंडिराम नायकल यांनी कांदा-लसूण चटणी निर्मितीच्या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे. विक्री व्यवस्थेतही कुशलता मिळवली आहे. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय सुनील यांनी मालाचा दर्जा, विश्‍वासार्हता, कामातील सचोटी या गुणांद्वारा पुढे यशस्वीपणे सुरू ठेवला आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्याच्या हद्दीत पेठगावच्या पश्‍चिमेला तीन किलोमीटरवर नायकलवाडी गाव लागते. गावातील सुनील नायकल यांचे वडील धोंडिराम यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी चटणीनिर्मितीचा व्यवसाय सुरू केला. आपली वडिलोपार्जित शेती सांभाळत ते व्यवसायाची जबाबदारी सांभाळायचे. सायकलवरून फिरून ते चटणी उत्पादनाची विक्री करायचे. त्या वेळी जेमतेम आर्थिक प्राप्ती व्हायची. पुढे त्यांची मुले त्यांना व्यवसायात मदत करू लागली. त्यांतील सुनील यांनी "इलेक्‍ट्रॉनिक्‍स' विषयातील डिप्लोमा पूर्ण केला. काही काळ मुंबई येथे नोकरी केली; परंतु आपल्या कुटुंबाचा पूर्वापार असलेला प्रक्रिया उद्योग वाढवायचा, या विचाराने त्यांनी महानगरातील नोकरी सोडली आणि गाव गाठले.

व्यवसायाला नव्याने सुरवात

 

नोकरी सोडून गावी परतलेल्या सुनील यांनी चटणीनिर्मितीच्या व्यवसायाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेताना वडलांना त्यांची या व्यवसायात मदत व्हायचीच. त्यामुळे व्यवसायातील बारकावे माहिती होते. त्यामुळे या व्यवसायात आता जम बसवण्यास त्यांनी सुरवात केली. विश्‍वासार्हता, मालाचा दर्जा व मार्केटमधील आपल्या नावाचा उपयोग करून पुन्हा मोठ्या आत्मविश्‍वासाने व्यवसायाचा विस्तार त्यांनी सुरू केला.

 

अशी होते कांदा-लसूण चटणीनिर्मिती

चटणी प्रत्येक घरी स्वयंपाकात गरजेची वस्तू. वेगवेगळी मिश्रणे एकत्र करून चटणीला वेगळी चव आणली जाते. सध्याच्या गतिमान जीवनात- विशेषतः शहरांमध्ये चटणी बनवण्यास गृहिणींना सवड मिळत नाही. नोकरदार, परगावी स्थायिक झालेल्यांना, तसेच ज्या ठिकाणी स्वयंपाक अधिक मोठ्या प्रमाणात असतो, तेथे तयार चटणी असेल तर काम वेळेवर व सुलभ होते. मालाचा दर्जा चांगला असला की अशा तयार चटणीला मोठी मागणी असते.
सुनील यांनी ग्राहकांची हीच गरज ओळखली आहे.

सुनील यांच्या कांदा-लसूण चटणीनिर्मिती उद्योगात सुरवातीला मिरच्यांचे देठ काढून त्या विलग केल्या जातात. पल्वलायझर मशिनमध्ये मिरची व धने यांचे मिश्रण करून त्याची पावडर तयार केली जाते. दुसऱ्या मोठ्या मिक्‍सरमध्ये कांदा, लसूण, खोबरे, गरम मसाला यांच्या मिश्रणामध्ये या पावडरीचे मिश्रण एकजीव केले जाते. कुठेही गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री केली जाते. त्यानंतर 50 ग्रॅम, 100 ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंत वजन करून मशिनद्वारा पॅकिंग केले जाते. या चटणीसाठी लागणारा कच्चा माल मिरची, कांदा, लसूण, खोबरे, गरम मसाला सांगली येथील बाजारातून होलसेल प्रमाणात आणला जातो. एकाच वेळी अधिक माल खरेदी केल्याने पैशाची बचत होते.

पूर्ण दिवस व्यवसायात

सुनील यांना चटणी व्यवसायासाठी वडील धोंडिराम, आई नंदिनी, पत्नी अपर्णा यांची मोठी मदत असते. घरातील सर्व कामे सांभाळून या व्यवसायात हे कुटुंब राबते. अशा कामांसाठी ग्रामीण भागात मजुरांची वानवा असते. मात्र त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करून या कुटुंबातील प्रत्येकाने या प्रक्रिया निर्मितीतील कौशल्य आत्मसात केले आहे. सकाळी विक्री व्यवसायाची कामे पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या वेळेनंतर सुनीलही प्रत्यक्ष निर्मितीत व्यस्त होतात. दररोज सुमारे शंभर किलो चटणीची निर्मिती नायकल कुटुंबीयांतर्फे केली जाते. जुलै, ऑगस्ट आदी पावसाळ्याच्या कालावधीत हा व्यवसाय थोडा मंदावतो.

विक्री व्यवस्था व ब्रॅंडची ओळख

मालाच्या उत्पादनापेक्षाही विक्री व्यवस्था अवघड असते. सुनील यांनी मालाचा दर्जा टिकवण्यावर अधिक भर दिला आहे. "अंबिका मसाले प्रॉडक्‍ट' या नावाने चटणी बाजारात विकली जाते. सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्‍यात चटणी पॅकिंग क्रेटमध्ये घालून विकली जाते. प्रामुख्याने रोखीचा व्यवहार केला जातो. कारण कच्च्या मालासाठी गुंतवणूक करावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यातही माल पाठवला जातो. पूर्वी दुचाकीवरून विक्री व्हायची. आता जुनी चारचाकी गाडी खरेदी केली आहे. किराणा मालाची विक्री केंद्रे, खानावळी, तसेच आचारी, व्यावसायिक हे त्यांचे प्रमुख ग्राहक. त्याचबरोबर घरगुती स्तरावरही त्यांच्या चटणीला मोठी मागणी आहे.

कौटुंबिक प्रगती

नायकल यांनी या व्यवसायात चांगली आर्थिक स्थिरता मिळवली आहे. व्यवसायाच्या बळावरच स्वतःच्या अडीच एकर क्षेत्रावर दोन विंधनविहिरी खोदल्या आहेत. त्याद्वारा संपूर्ण शेतीला ठिबक सिंचन करून क्षेत्र बागायती केले आहे. मालाची विक्री सुलभ व वेळेत व्हावी यासाठी चारचाकी घेणे शक्‍य झाले. व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने जागेसाठी सात लाख रुपये खर्च करून नवीन आरसीसी बांधकाम सुरू आहे. यामध्ये इमारतीच्या खालील मजल्यावर चटणीनिर्मितीचा उद्योग, तर वरील मजल्यावर राहण्यासाठी, अशा पद्धतीने बांधकाम सुरू आहे. आपण सर्व प्रगती चटणीनिर्मितीच्या उद्योगावरच केल्याचे सुनील आभिमानाने सांगतात. विविध यंत्रे आणून उद्योगाचा आणखी विस्तार, हे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्थिक ताळेबंद

प्रति 10 किलो चटणीनिर्मितीसाठी मिरची, कांदा, लसूण, खोबरे, मीठ, गरम मसाला, व्यवस्थापन आदी मिळून सुमारे 700 रुपये खर्च होतो. कच्च्या मालाच्या दरात चढ-उतार झाला, की खर्चाचे गणीत कमी-जास्त होते. एक किलो चटणीची किरकोळ विक्री किंमत 140 रुपये आहे. प्रति महिना अडीच ते तीनहजार किलो विकली जाते. वर्षाला उलाढाल 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे.

नायकल यांच्या उद्योगाची वैशिष्ट्ये

1) पुढील पिढीने जपला व्यवसायाचा वारसा
2) विश्‍वासार्हतेमुळे मार्केटिंगमध्ये वेगळे नाव
3) रोजच्या रोज ताजा माल देण्यावर भर
4) घरातील सदस्यांचा दैनंदिन कामात सहभाग; त्यामुळे मजूरखर्च कमी
5) चारचाकीद्वारा वाहतूक करून चटणीची विक्री
6) स्वतःच्या ब्रॅण्डची केली ओळख
संपर्क : सुनील नायकल- ८२७५०३०५१२

लेखक - श्‍यामराव गावडे

-----------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate