অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धव्यवसायामुळे उत्पन्न

शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. दरवर्षी निसर्ग साथ देईलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतीला जोडधंद्याची जोड देणे आवश्यक आहे. त्यातच दुग्धव्यवसायासारखा व्यवसाय निवडल्यास उत्पन्नाचे एक शाश्वत साधन निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशाच जोडधंद्याची निवड केल्याने झरी जामणी तालुक्यातील एक शेतकरी सोनबा टेकाम हे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले असून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

शेतीपुरक जोडधंदा

तालुक्यातील बंदी वाढोणा या गावातील सोनबा दमडू टेकाम यांच्याकडे कोरडवाहू ३ हेक्टर इतकी जमीन आहे. या जमिनीत ते खरीप हंगामात कापूस, तूर, ज्वारी यासारखी पिके घ्यायचे. त्यातून त्यांना ६० ते ६५ हजारांचे उत्पन्न मिळायचे. या कमी उत्पन्नात त्यांना आपले कुटुंब चालविणे तारेवरची कसरत वाटायची. त्यामुळे त्यांनी शेतीस पुरक जोडधंदा सुरु करण्याचे ठरविले होते. त्यातुनच त्यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शाश्वत शेती प्रकल्पाची माहिती घेतली व दुग्धव्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.

दुग्धव्यवसायाची पुरेपुर माहिती नसल्याने राज्य कृषी विस्तार कार्यक्रम अर्थात आत्मा अंतर्गत अभ्यासदौरा व प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायास सुरुवात केली. प्रशिक्षणात पोषक आहार, कोरडा चारा जसे ज्वारी, मका, गतवर्षीय पिकांची कुटी, सोयाबिन व तूर पिकाचे कुटार यापासून जनावरांसाठी पोषक आहार तयार करणे तसेच गायींच्या गोठ्याचे व्यवस्थापन व गायींच्या पाणी व आहाराच्या बाबींची शास्त्रोक्त माहिती झाली. प्रशिक्षणानंतर योजनेतून अनुदानावर दोन संकरीत गायी त्यांनी खरेदी केल्या.

संकरीत गायीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम

या दोन गायींपासून त्यांना सकाळी १० व संध्याकाळी १० असे २० लिटर दुधाचे उत्पादन सुरु झाले. बाजारात प्रति लिटर २० रुपये याप्रमाणे दर मिळत असल्याने मासिक मिळकत १२ हजार व खर्च दोन हजार रूपये वजा जाता निव्वळ मासिक नफा १० हजार रुपये इतका शिल्लक राहत आहे. याबाबत समाधान व्यक्त करतानाच आत्माचे प्रशिक्षण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदानावर मिळालेल्या संकरीत गायीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकलो, असे शेतकरी सोनबा दमडू टेकाम यांनी आवर्जून सांगितले.

मंगेश वरकड

जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate