অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुधाबरोबर पेढ्यांचीही निर्मिती

सांगली जिल्ह्यातील "कामधेनू' दुग्ध संस्थेने वाढवला नफा

सांगली जिल्ह्यातील बुर्ली (ता. पलूस) येथील कामधेनू सहकारी दूध संस्था केवळ दूध संकलन करून थांबलेली नाही. तर पंधरा वर्षांपासून पेढेनिर्मिती व्यवसायातून ग्राहकांना उत्तम, शुद्ध पेढे दिलेच, शिवाय संस्थेच्या नफ्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. 

ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रे वा संस्था म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच असतो. त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहाराशी या संस्था संलग्न असल्याने त्यांचा शेतकऱ्यांशी रोजचा संबंध असतो. बऱ्याच दूध संस्था केवळ दुधाचीच खरेदी- विक्री करून नफा मिळवितात. दुधाचे संकलन करून त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याची मानसिकता अद्यापही वाव असून म्हणावी तेवढी आढळत नाही. 

सांगली जिल्ह्यातील बुर्ली (ता. पलूस) येथील कामधेनू सहकारी दूध संस्था मात्र याला अपवाद ठरली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या संस्थेने पेढे तयार करून विकण्याची संकल्पना सुरू केली. आजतागायत हा प्रक्रिया उद्योग संस्थेने यशस्वीरीत्या सुरू ठेवला आहे. सहकारी संस्थांचे भवितव्य खाबूगिरीमुळे दिवसेंदिवस अनिश्‍चित बनत असताना "कामधेनू'ने आपल्या पेढ्यांचा नावलौकिक परिसरात केला आहेच.शिवाय त्याचा स्वाद मुंबईपर्यंत पोचवला आहे.
सांगली जिल्ह्यातील बुर्ली हे समृद्ध गाव. कृष्णा नदीकाठचा समृद्ध परिसर गावाला लाभला आहे. शेतीबरोबर दुधाच्या दृष्टीनेही हे गाव पुढारलेले आहे. गावात सहा खासगी व दोन सहकारी दूध संस्था आहेत. यापैकी कामधेनू ही गावातील जुनी सहकारी दूध संस्था. सन 1980 मध्ये संस्थेची स्थापना झाली. सुरवातीला एक हजार लिटर दुधाचे संकलन या डेअरीला व्हायचे. त्यानंतर स्पर्धा वाढली. दुग्ध व्यवसायातील समस्या वाढल्या. तसे दुधाचे संकलन काही अंशी कमी झाले. मात्र संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे दुधाच्या संकलनात गेल्या काही वर्षांत फारशी घट झाली नाही. संस्थेचे कार्य अन्य दूध संस्थांप्रमाणेच चालत असले तरी "दृष्टिकोनात' मात्र बराच फरक आहे.

पंधरा वर्षांपूर्वीपासूनचे प्रयत्न

केवळ दूध संकलन व विक्री ही गोष्ट फायद्याची नव्हती.

संस्थेच्या नफ्यात वाढ होणेही गरजेचे होते. त्यादृष्टीने 
पंधरा वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर संस्थेने पेढे तयार करण्यास सुरवात केली. सुरवातीला प्रतिसाद फारसा लाभला नाही. मात्र दुग्धोत्पादकांकडून दूध खरेदी केल्यानंतर तातडीने त्यावर प्रकिया करून दुसऱ्या दिवशी सायंकाळी पेढे मिळू लागले. त्यांचा ताजेपणा व लज्जत गावकऱ्यांत लोकप्रिय होऊ लागली. यामुळे एक दिवसाआड दहा ते बारा किलो पेढे सहजपणे खपू लागले. पुढे पुढे तर पेढे नेण्याची ग्राहकांना सवयच झाली. बाहेर गावी जायचे असेल तर या संस्थेचे पेढेच न्यायचे असा अघोषित नियमच सुरू राहिला. यामुळे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या नृसिंहवाडीचे पेढे जसे प्रसिद्ध आहेत, तशीच प्रसिद्धी बुर्लीच्या या पेढ्यांची झाली. आजही अनेक पाहुण्यांकडून हे पेढे पाठविण्याची मागणी ग्रामस्थांना केली जाते.

..अशी होते पेढानिर्मिती

दुग्ध संस्थेत दररोज सहाशे ते सातशे लिटर दुधाचे संकलन 
  • संकलित केलेले काही दूध दोन मोठ्या दूध संघांना घातले जाते.
  • पेढ्यांसाठी सुमारे चाळीस लिटर दूध दर दिवसाआड बाजूला ठेवले जाते.
  • म्हशीचे सहा फॅट असलेले दूध वापरले जाते.
  • दुग्ध संस्थेचे सकाळचे कामकाज झाल्यानंतर दुपारी चार कर्मचारी पेढे तयार करण्याच्या कामाला लागतात.
  • गॅसच्या माध्यमातून दूध तापविले जाते. पूर्वी जळण लावून कढई तापविली जायची. आता आधुनिक कढई आहे.
  • दूध कढईत ओतून, वेलदोड्याचे मिश्रण करीत पुढील प्रक्रिया होते.

चाळीस लिटर दुधापासून बनतात सुमारे तेरा किलो पेढे

पॅकिंग - पाव किलोचे पॅकिंग करून पेढे विक्रीसाठी तयार ठेवले जातात. 
अनेक ग्राहक दूध खरेदी-विक्री करण्याच्या वेळेस पेढे घेऊन जातात. 
दुग्ध संस्थेच्या ठिकाणीच पेढ्यांची विक्री 
एक दिवसा आड मागणी पाहून पेढे बनविले जातात. 
दिवाळीच्या दरम्यान दररोज पेढे तयार केले जातात. त्या वेळी खव्याचीही विक्री होते. 
वर्षाला बाराशे किलो पेढ्यांची विक्री 
वर्षाला सुमारे बाराशे किलो पेढ्यांची होते विक्री. 
यातून निव्वळ नफा साठ ते सत्तर हजार रुपयांपर्यंत 
पेढ्यांचा दर - किलोला दोनशे चाळीस रुपये 
उत्पादन खर्च वजा जाता एक किलो पेढ्यापासून पन्नास रुपयांपर्यंत नफा मिळतो. 
दूध विक्री व पेढ्यांच्या विक्रीतून आलेल्या नफ्यातून सभासदांना वर्षाला डिव्हिडंड दिला जातो. लिटरला 60 पैसे तर गाईला 15 पैसे लाभांश असतो. संस्थेच्या तीनशे सभासदांना हा फायदा मिळतो.

पेढे आणलेत का बरोबर?

या पेढ्यांबाबत अनेक रंजक किस्से संस्थाचालकांशी चर्चा करताना समजले. येथील ग्रामस्थ पाहुण्यांकडे जाताना हमखास हे पेढे सोबत नेतात. या भागातील कार्यकर्तेही आपल्या राजकीय नेत्यांना मुंबईत भेटायला जाताना आवर्जून याच पेढ्यांची भेट देतात. राजकीय व्यक्तींनाही या पेढ्यांची सवय झाली आहे. बुर्लीचे कार्यकर्ते दिसले की पेढे आणले नाहीत का, अशी हमखास विचारणा या नेत्यांकडून होतेच!
गेल्या पंधरा वर्षांपासून पेढे तयार करण्याचे काम आमची संस्था करीत आहे. हे काम निश्‍चितपणे खडतर आहे याची जाणीव आम्हाला आहे. संस्थेचे कर्मचारीच या कामात व्यस्त असतात. यामुळे पेढ्यांना मागणी असली तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्याची व्याप्ती वाढविता येत नाही. कर्मचाऱ्यांना मानधन कमी असते. दूधसंकलनाचे कामच जास्त असल्याने कर्मचाऱ्यांवर ही अतिरिक्त जबाबदारी असते. पेढानिर्मितीचे काम सांभाळताना दूध संकलनात विस्कळितपणा येणार नाही, त्याचा प्रतिकूल परिणाम दूध खरेदी- विक्रीवर होणार नाही याची सातत्याने काळजी घेऊन दैनंदिन नियोजन करावे लागते. ज्या दुग्ध संस्था मोठ्या आहेत त्यांना हा प्रयोग शक्‍य आहे. दुग्ध संस्थांनाही याचा फायदा आहे.

दुधापासून पेढे तयार करून विकल्यास संस्थेच्या नफ्यात चांगली वाढ होऊ शकते. मात्र काटेकोरपणे नियोजन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ग्राहकांची मागणी, कर्मचाऱ्यांची तत्परता, कितीही गडबडीत पेढ्यांची चव बदलू न देणे या बाबी आम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात. आज अनेक मोठे संघ उपपदार्थांची निर्मिती करतात. त्या तुलनेत आमचे काम कमी असले तरी गावच्या ग्राहकांची पसंती याचेच समाधान आम्हाला खूप मोठे आहे. गावच्याच दुधाचे पेढे करून ते गावातच विकून त्याच्या स्वादाचा आनंद त्यांना देणे हीच आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. दुग्ध संस्थाचालकांचीही मानसिकता अशा प्रक्रिया उद्योगात महत्त्वाची आहे. 

सुरेश चौगुले, अध्यक्ष, कामधेनू दुग्ध उत्पादक संस्था, बुर्ली 
संपर्क - 9421220258

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate