অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी पर्यटन केंद्र जालना

मराठवाड्यात रोजगाराचा पर्यायही झाला उपलब्ध

लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती जपण्याचा प्रयत्न जिरडगाव (जि. जालना) येथील डॉ. किशोर उढाण यांनी कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून केला आहे. दुष्काळग्रस्त भागातील कृषी पर्यटन केंद्र हे त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गावची ओढ निर्माण करणाऱ्या या केंद्रावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

मराठवाड्यात या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा मार्गच या प्रयत्नातून दिसला आहे.

जालना शहरापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात जिरडगाव (ता. घनसावंगी) येथे डॉ. किशोर उढाण यांची वीस एकर शेती. सन 2005 मध्ये त्यांनी गटशेती सुरू केली. शेती परिसर व निसर्गाचा लाभ उठवीत कृषी पर्यटन केंद्रही सुरू केले. हे काम 2005 मध्ये सुरू झाले, तरी केंद्राने 2009 मध्ये गती घेतली. केवळ लोकप्रसिद्धीतून केंद्र पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येऊ लागले. वडील रंगनाथराव उढाण, आई सुलोचना व पत्नी ज्योती यांची प्रत्येक कामात मदत, तसेच पोलिस अधीक्षक चिरंजीव प्रसाद व गटशेतीसाठी डॉ. भगवानराव कापसे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे डॉ. उढाण आवर्जून सांगतात.

कृषी पर्यटनातून उभं केलं जुनं गाव

आज लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती जपण्याचा संदेश देण्याचं काम उढाण यांच्या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून झालं आहे. इथल्या सोई-सुविधांतून गावचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. 
अशा आहेत या सुविधा -
  • राहण्याची व्यवस्था - तीन झोपड्यांत एकावेळी सहा कुटुंबांची व्यवस्था.
  • मातीच्या भिंती व ऊस पाचटाचे आच्छादन असलेली झोपडी पाहून पर्यटकांच्या तोंडून "सुंदर!' असे उद्‌गार आल्याशिवाय राहात नाहीत.
  • बांबूचे घर - केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच बांबूचे आकर्षक घर. दोन घरांत पुरुषांची राहण्याची व्यवस्था. एका बांबूच्या घरात दहा लोकांची प्रशस्त व्यवस्था.
  • आंब्याच्या झाडावर घरटं - उन्हाळ्यात थंडावा मिळावा या हेतूने आंब्याच्या झाडावर एकावेळी दहा माणसं बसतील एवढं घरटेवजा घर.
  • हौस पुरी करण्यासाठी तंबू - शहरी संस्कृतीतील बहुतांश पर्यटकांना मोकळं हवेशीर राहण्याची हौस असते. ही हौस या केंद्रावर पूर्ण होते. पाच तंबू या ठिकाणी उभे आहेत.
  • बैलगाडीने सफर -
  • रात्री मोकळ्या आकाशात चांदणं बघण्यासाठी टेलिस्कोप
  • पारंपरिक गोष्टींचं प्रात्यक्षिक पाहण्याच्या गोष्टी. उदा. सूत काढण्यासाठी चरखा, मडकं तयार करण्यासाठी फिरतं चाक
  • बैठकीसाठी झाडांच्या खोडांपासून नैसर्गिक बैठक व्यवस्था
  • झाडांना झोपाळे, झोके, झाडावर चढण्यासाठी रस्सी, पक्ष्यांसाठी खोपे व पाण्याची व्यवस्था
  • खेळाचा आनंद घेण्यासाठी विट्‌टी दांडू, गोट्या, चकारी, गोफण, गलोल या ग्रामीण खेळांचं साहित्य
  • शिकं (शिंकाळं), उखळ, वरवंटा, खलबत्ता, पाटा, चूल या कालबाह्य होत असलेल्या वस्तूंचं जतन
  • सकाळच्या वेळी योग ध्यान केंद्र

अद्ययावत प्रशिक्षणगृह

येथील वातावरण अत्यंत प्रशस्त आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे केंद्र शासनस्तरावरील विविध प्रशिक्षणाचं केंद्र बनलं आहे. सुमारे 100 प्रशिक्षणार्थींसह प्रोजेक्‍टर, एलसीडी, साउंड सिस्टिमची व्यवस्था आहे. निवासी प्रशिक्षणाचीही व्यवस्था आहे. युनिसेफ, "वॉटर' तसेच अन्य शासकीय प्रशिक्षणांचं वर्षभराचं नियोजन येथे ठरलं आहे.

रुचकर भोजनाला पर्यटकांची पसंती

भोजनात वांग्याचं भरीत, पिठलं, भाकरी, कांदा, मुळा, गावरान भाजी. मागणीप्रमाणे आवडीची भाजी, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाज्याही तत्काळ बनवून देण्याची सोय, मडक्‍यात पारंपरिक पद्धतीने बनवलेलं ताक यामुळे भोजनव्यवस्था पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे.

सेंद्रिय मळा

केंद्रावर सुमारे 20 गुंठे क्षेत्रात वांगी, गवार, राजमा, टोमॅटो, पालक, भेंडी यासह कांदा, मुळा अशा विविध वीस भाज्यांची लागवड असून, सेंद्रिय पद्धतीवर भर दिला आहे. 

केसर ठरला आकर्षक

पर्यटनस्थळी तीन एकर केसर आंबा असून, येथूनच आंब्याची विक्री होते. केसरची चव पर्यटकांना आकर्षित करते. यातून दरवर्षी खर्च वजा जाता एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. एक एकर मोसंबी व दीड एकर केळीची बाग आहे. 

दुष्काळात नेटके व्यवस्थापन

दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असलेल्या जालना जिल्ह्यात यंदा बहुतांश फळबागांचं क्षेत्र जळालं; मात्र डॉ. उढाण यांनी वर्षानुवर्षं जपलेली शेती दुष्काळातही तगवली आहे. दुष्काळस्थितीत टॅंकरने पाणी दिलं. पाणी असलेली विहीर दहा हजार रुपये प्रति महिना दराने विकत घेऊन पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला. फळबागांना मल्चिंग केलं असून, सलाइनद्वारेही पाणी पुरविण्यात आलं आहे. ठिबकनेच प्रत्येक झाडाला पाणी पुरविण्यात येतं.

भविष्यातील योजना

एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात मत्स्यपालन व बोटिंगची सुविधा निर्माण करायची आहे. वनौषधींचं गार्डन तयार करून निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचं नियोजन आहे.

अर्थकारण

हे केंद्र सुरू होऊन पाच वर्षं झाली असून दहा एकर जागेच्या विकासासाठी आतापर्यंत पाच लाखांहून अधिक खर्च झाला आहे. यंदा दुष्काळी वर्षात उत्पन्नाला सुरवात झाली. खासगीसह शासनस्तरावरील सात लाख रुपयांचा प्रशिक्षण करार झाला आहे. हुरडा पार्टीच्या आयोजनातून सुमारे एक लाखाचा नफा मिळाला. फळविक्रीतूनही उत्पन्न सुरू झालं आहे. यंदा प्रशिक्षण, हुरडा पार्टी आणि केसर आंब्याच्या विक्रीतून सात लाख रुपयांपर्यंत नफा मिळाल्याचं डॉ. उढाण सांगतात. 

संपर्क : डॉ. किशोर उढाण : 9421421440, 9511121255

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate