जिद्द, कष्टाला अभ्यासाची जोड दिल्यास यश हमखास मिळते, याचा प्रत्यय ढोक्रवली (जि. रत्नागिरी) येथील यतीन गुप्ते या रसायनशास्त्र विषयाची पदवी घेणाऱ्या तरुणाला आला. कोकणात साहिवाल गोवंशाचे संवर्धन करण्याबरोबरच तूपनिर्मिती करून त्यास किलोला दोन हजार रुपये दर मिळविणाऱ्या या तरुणाची यशकथा आदर्श आहे.
सध्याच्या काळात दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्याबरोबरच देशी जनावरांच्या वंशांचे संवर्धन करण्यालाही महत्त्व आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ढोक्रवली (ता. चिपळूण) येथील यतीन गुप्ते या युवकाने दुग्ध व्यवसायाला प्रक्रियेची जोड देत गोवंश पैदास व संवर्धनाचा आदर्शही घालून दिला आहे.
रसायनशास्त्र विषयातून पदवी घेतल्यानंतर यतीन यांनी अंधेरीत एक वर्ष नोकरी केली. मात्र वडिलांची जपलेली शेतीची आवड यतीनच्या रक्तातही आली होती. कोकणातील लाल मातीशी त्याची घट्ट मैत्री जुळली. आंबा, काजू, नारळ, चिकू, सोनकेळी, वसईची केळी, (स्थानिक स्तरावर विक्रीही) अननस यांची शेती करताना तो देशी गोपालनाकडे वळला.
पनवेल (जि. रायगड) हे यतीन यांचे मूळ गाव. त्यांचे वडील प्रकाश गुप्ते "एअर इंडिया'तून सेवानिवृत्त झाले. डोबिंवलीचे रहिवासी असलेल्या गुप्ते यांनी ढोक्रवली (जि. रत्नागिरी) येथे जमीन खरेदी केली. आज याच ठिकाणी यतीन पूर्णवेळ शेतकरी होऊन सुमारे साडेसहा वर्षांपासून देशी गोपालन करतो आहे.
शेतीला गोपालनाची जोड हवीच असे मानणाऱ्या यतीन यांना बाजारात शुद्ध जातीची गाय मिळेल यावर विश्वास नव्हता. यतीन यांनी गोपालकांच्या काही प्रक्षेत्रांना भेटी देऊन माहिती मिळवली. इंटरनेट, मार्गदर्शकांचा सल्ला आणि दौऱ्यानंतर साहिवाल जातीच्या गाई पाळण्याचे निश्चित केले. साहिवाल ही सर्वोत्कृष्ट देशी गाय आहे.
मध्यम बांधा, रंग तांबडा, शिंग बारीक, स्वभाव शांत, दोन वेतांतील अंतर कमी, 12 ते 15 महिन्यांच्या फरकांनी वेत मिळते. दूध न देण्याचा भाकडकाळ फक्त 60 ते 70 दिवस असतो, अशी तिची वैशिष्ट्ये आहेत. या जातीचा शोध घेताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून (अकोला) यतीन यांना छत्तीसगड राज्यातून एका शासकीय फार्मचा संदर्भ मिळाला. तेथे भेट दिली. त्यानंतर चार साहिवाल गाई व दोन खोंड (बैल) आणले.
1) यतीन यांची सुमारे 1.29 हेक्टर शेती आहे. घराजवळच 30 बाय 40 फुटांचा गोठा बांधण्यात आला आहे. गाईंच्या संगोपनासाठी मुक्त गोठा आणि दावण पद्धतीचा अवलंब केला आहे. मुक्त गोठा पद्धतीत जनावरांचे आरोग्य सुधारते. गाईंच्या धारा कास निर्जंतुक करून हातांद्वारे, तसेच यंत्राद्वारेही काढल्या जातात.
2) बागेत रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर नसल्याने सेंद्रिय चारा जनावरांना दिला जातो. रसायनांचा वापर कमीत कमी केला जातो. होमिओपॅथिक औषधांवर भर असतो.
3) कोकणातील चाऱ्यात पौष्टिक गुणधर्म तसे कमी प्रमाणात असतात. चाऱ्यातून गाईच्या दुधाचे फॅट कमी लागते. त्याचा विचार करून सांगली व अन्य भागांतून कडबा कुट्टी विकत आणून दिली जाते. साधारणतः प्रति दुभत्या गाईला दररोज 10 ते 12 किलो कुट्टी आणि पाच किलो आंबोण दिले जाते. क्षारमिश्रणाचा आणि कॅल्शिअमचा वापर होतो. एक वर्षाचे होईपर्यंत वासरांना शरीरपोषणासाठी दूध पाजले जाते.
दूध तापवून त्यात विरजण घालून दही लावले जाते. दही घुसळून लोणी काढले जाते. त्यापासून मिळणारे ताक स्थानिक बाजारात विकले जाते. लोणी कढवून तूप बनविले जाते. तुपाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे प्रति किलो दोन हजार रुपयाने तुपाची विक्री होते. महिन्याला सुमारे 18 ते 22 किलोपर्यंत तुपाची विक्री झाली आहे. स्थानिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणी या तुपाचे ग्राहक तयार झाले आहेत. अर्थात, मार्केट तयार करायला यतीन यांना कष्ट व काही काळ द्यावा लागला आहे. "माऊथ पब्लिसिटी'बरोबर फेसबुक, व्हॉट्स ऍपचाही आधार घेऊन ग्राहक वाढवावे लागले.
गाईंचे शेण आणि मूत्र बागेतील झाडांपर्यंत सोडण्याची सोय केली आहे. शेणापासून गोबरगॅसही मोठ्या प्रमाणात मिळतो. शेणापासून गोवऱ्या (शेण्या) तयार करून त्यांची विक्री एका शेणीमागे तीन रुपये दराने केली जाते. हवनासाठीही देशी गोमूत्राला मागणी असते. भारतीय गोवंश अभ्यासक मिलिंद देवल, कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर, पशू विभागाचे निवृत सहायक आयुक्त डॉ. अजित अभ्यंकर यांचे मार्गदर्शन यतीन यांना लाभले आहे.
6 यतीन गुप्ते यांना आई सौ. नीता, वडील प्रकाश यांची मोठी मदत दुग्ध व्यवसायात होते.
4 व 7 गाईंसाठी कडबा कुट्टी विकत आणली जाते. पोत्यात ती भरून ठेवली जाते.
10 ताक घुसळण्यासाठी वापरले जाणारे यंत्र.
१२ दुधावर पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर बनविलेले शुद्ध देशी तूप.
(छायाचित्रे - प्रकाश पाटील, सावर्डे)
संपर्क - यतीन गुप्ते, 8275392108
प्रकाश पाटील, सावर्डे, 9011086384
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...