অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फलोत्पादनाने माथाडी झाला प्रगत शेतकरी

फलोत्पादनाने माथाडी झाला प्रगत शेतकरी

आंबेगाव (जि. पुणे) तालुक्‍यातील कोरडवाहू सातगाव पठारावरील भावडी गावचे रामदास ढवळे यांनी जिद्द, मेहनत व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या योजनांच्या बळावर नैसर्गिक संकटांना मात देत आपली शेती समृद्ध आणि श्रीमंत केली आहे. सर्वसामान्य माथाडी कामगार ते पुणे जिल्ह्यातील प्रगत शेतकरी अशी त्यांची वाटचाल आहे. ढवळेंची शेती ही आंबेगाव तालुक्‍याची कृषी प्रयोगशाळा झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील सातगाव पठारावर 10-15 वर्षांपूर्वी शेतीची अतिशय बिकट अवस्था होती. नदी, कालवे अशी पाण्याची काहीही सोय उपलब्ध नसल्याने संपूर्ण शेती पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असे. याच भागातील श्री. रामदास ढवळे यांच्या कुटुंबाची 30 एकर शेती आहे, परंतु परिस्थितीमुळे त्यांनी नववीतून शिक्षण सोडल्यानंतर नोकरीसाठी मुंबईचा रस्ता धरला. काही दिवस मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम केले, मात्र प्रचंड कष्ट करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर नोकरीवर पाणी सोडून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. 1992मध्ये त्यांनी सातगाव पठारावर आपल्या शेती व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
शेती प्रगतीबाबत श्री. ढवळे म्हणाले, की पहिल्याच वर्षी आधुनिक तंत्राने लावलेल्या टोमॅटोपासून तीस गुंठ्यात सुमारे 70 हजार रुपये उत्पन्न मिळाले. या पहिल्याच यशाने शेतीची आवड निर्माण झाली. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्राने उत्पादन वाढते हे त्यांच्या पहिल्याच पिकाने लक्षात आले. त्यानंतर आधुनिक शेतीची कास धरली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज काढून पाच गुंठे क्षेत्रावर हरितगृह सुरू केले. त्यामध्ये जरबेराची लागवड केली. त्यातही चांगले उत्पादन मिळाले. या यशाने प्रेरित होऊन सेंट्रल बॅंकेच्या अर्थसाहाय्याने दहा गुंठे क्षेत्रावर नवीन हरितगृह उभारले. त्यात डच गुलाबाची लागवड केली. काटेकोर नियोजन, योग्य निगा, लागवड ते काढणीपर्यंत सर्वच पातळ्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे त्यांना त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले.
गावातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळे उभारले. यासाठी शासनाकडून मंजुरीची वाट न पाहता शरद सहकारी बॅंकेतून सहा लाख रुपये कर्ज घेऊन शेततळ्याचे काम केले. या सामूहिक शेततळ्यामुळे पाण्याची समस्या सुटली आहे. संपूर्ण शेती त्यांनी ठिबक सिंचनाखाली आणली आहे. शेततळ्यात मत्स्यशेतीचा प्रकल्प राबविला आहे, त्यातूनही त्यांना आर्थिक उत्पन्न सुरू आहे. शेतीला पुरेसा सेंद्रिय खतांचा पुरवठा होण्यासाठी गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. जिवामृत, दशपर्णी निर्मिती आणि पीक व्यवस्थापनात यांचा वापर सुरू केला आहे. त्याचेही फायदे दिसून आले आहेत. शेतीमालाची प्रतवारी व साठवणूक करण्यासाठी फलोत्पादन अभियानाच्या मदतीने संकलन व प्रतवारी केंद्र उभारले आहे.

शेतीचे नियोजन


श्री. ढवळे यांनी जनावरांसाठी सुधारित पद्धतीचा गोठा बांधलेला आहे. सध्या त्यांच्याकडे एक बैलजोडी व दोन गावठी गाई आहेत. गोठ्यात शेण व मूत्र यांचे संकलन करण्याची वेगळी रचना आहे. शेतीतील पालापाचोळा, शेण व स्वच्छतागृह यांच्यावर त्यांचा गोबरगॅस सुरू आहे. शाश्‍वत उत्पादनासाठी त्यांनी दोन एकर आंब्याची लागवड केली. केसर, हापूस व पायरी आंब्यांची झाडे आता भरात आली आहेत. याच दोन एकर क्षेत्रात त्यांनी झेंडू, वांगी, मिरची, काकडीचे आंतरपीक घेतले आहे.
बटाटा, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांमध्ये विक्रमी उत्पादन हे ढवळे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. भावडी, गावडेवाडी, पेठ, कुदळेवाडी यांसह तालुक्‍याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांना कंत्राटी शेती, बटाटा उत्पादन, गांडूळ खत, जिवामृत, काकडी, झेंडू, वांगी, मिरची यांच्या सुधारित तंत्रज्ञान उत्पादनाबाबत ते मोफत मार्गदर्शन करतात. भाजीपाला उत्पादनातील उल्लेखनीय कार्याबद्दल "ऍग्रोवन'मार्फत विशेष सत्कार (2007), पुणे जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (2007-08), राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप महाराष्ट्र गुणीजन गौरव पुरस्कार (2010) आदी पुरस्कारांनी श्री. ढवळे यांच्या कामाचा गौरव झाला आहे.
फलोद्यान आणि फुलशेतीने दिली आर्थिक साथ...
शेतीमधील प्रगतीबाबत श्री. ढवळे यांनी सांगितले, की कुटुंबातील सर्व 15 सदस्य शेतीत एकदिलाने काम करत असल्याने शेती यशस्वी झाली आहे. 2001 नंतर सलग चार वर्षे पावसाअभावी शेतीला फटका बसला. शेती सोडण्याच्या मनःस्थितीत होतो. शेवटचा मार्ग म्हणून 2005-06मध्ये फलोत्पादन अभियानातून शेततळे घेतले. पूर्वी एका पाण्याअभावी ज्वारी हातची जायची.
शेततळ्याने माझ्या शेतीचे स्वरूपच बदलून टाकले. फलोत्पादनावर जास्तीत जास्त भर दिल्याने कोरडवाहू शेती बागायती झाली. सध्या फळपिकांबरोबरच वांगी, ढोबळी मिरची आदी नगदी पिकांचे उत्पादन घेत आहे. हरितगृहात कारले, गुलाबाचे उत्पादन घेत होतो. उत्पादन चांगले मिळायचे, मात्र खर्च विचारात घेता मिळणारे दर परवडत नव्हते. वर्षातून फक्त दोन महिने चांगले दर असायचे. उर्वरित दहा महिने सर्व खर्च अंगावर सोसावा लागायचा. त्यात सातगाव पठारावर वाऱ्याचा वेग जास्त असल्याने प्लॅस्टिक लवकर फाटते. नुकसानीमुळे हरितगृहाचा विचार सोडावा लागला. आता शेडनेट करण्याच्या विचारात आहे. भाजीपाला उत्पादनासाठी ठिबक सिंचन व प्लॅस्टिक आच्छादनाचा मोठा फायदा झाला. शेततळ्यामुळे पिकांना संरक्षित पाणी देणे शक्‍य झाले. यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी बटाट्याचे एकरी सरासरी दहा टन उत्पादन झाले. यंदा उशिरापर्यंत पाऊस झाल्याने कमी गळीत झाले आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून दर वर्षी सहा एकर कलिंगड, तीन एकर ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहे. दर वर्षी खरिपात 20 एकर क्षेत्रावर प्रक्रियेसाठीच्या वाणांच्या बटाट्यांचे उत्पादन घेतो. रब्बीमध्ये गहू, हरभरा व भाजीपाला पिके घेतो. उन्हाळ्यात पुन्हा भाजीपाला पिके घेतो. शेतीमध्ये मजुरी कशी कमी करता येईल, याचा सतत प्रयत्न सुरू असतो. यासाठी 2009 मध्ये ट्रॅक्‍टर घेतला. बैलांचा व ट्रॅक्‍टरचा जास्तीत जास्त वापर करतो.
शासनाची बटाटा पिकाबाबतची क्षेत्र, उत्पादनाविषयीची आकडेवारी चुकीची आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. ज्वारी, बाजरी, गहू या पिकांना विमा दिला जातो. या सर्व पिकांचे नुकसान बटाट्याच्या तुलनेत फारच कमी आहे. हजाराच्या पटीत नुकसान असलेल्या पिकांना विमा संरक्षण मिळते, मात्र लाखोंच्या पटीत नुकसान असतानाही बटाटा पिकाला विमा संरक्षणापासून वंचित आहे. बटाट्याचे एकदा नुकसान झाले तर त्यातून शेतकरी पाच वर्षे सावरत नाही. त्यामुळे बटाट्याला विमा संरक्षण मिळायला हवे.
पुढच्या वर्षी 10 ते 15 हेक्‍टरवर आल्याची लागवड करण्याचा विचार आहे. सीताफळ व डाळिंब पिकांचे क्षेत्रही वाढविणार आहे. अधिकाधिक शेती सेंद्रिय करण्याचा प्रयत्न आहे. शेती यशस्वी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मिळालेले राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. शेततळे, गांडूळखत, पॅकहाऊस यासाठी अभियानाचा आणि ठिबकसाठी कृषी विभागाच्या योजनेचा मोठा फायदा झाला. गेल्या दोन वर्षांपासून आच्छादनासाठी अभियानाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे, पण मंजूर झालेले नाहीत. परिसरातील शेडनेटचे अनुदानही दोन वर्षांपासून रखडले आहे. येत्या वर्षात शेडनेट उभारण्याचा विचार आहे.
संपर्क -
रामदास भानुदास ढवळे
9822641497

बटाट्यातून फायदा

बटाटा लागवडीबाबत
श्री. ढवळे म्हणाले, की गुजरातमध्ये बटाट्याची लागवड व काढणी ट्रॅक्‍टरने करताना पाहून मी बटाटा लागवड पद्धत बदलली. यासाठी ट्रॅक्‍टरच्या रिझरला दोन फन लावून मापाचे गादीवाफे तयार केले. गादीवर हातोहात लागवड केल्याने लागण चांगली होते. त्याबरोबर बियाण्यात व मजुरीत मोठ्या प्रमाणात बचत होते. ओलावा टिकून राहतो. ठिबक सिंचन केल्याचा मोठा फायदा होतोय. या पद्धतीने रब्बी हंगामात बटाट्याचे सर्वोत्तम उत्पादन घेता येते.
बटाट्याच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी गरजेनुसार बटाटा पेरणी यंत्र विकसित केले, त्यासाठी 26 हजार रुपये खर्च केला. पहिल्याच वर्षी 16-17 एकरची लागवड यंत्राने केली. यामुळे मजुरीत मोठ्या प्रमाणात बचत झाली. आता परिसरातील शेतकऱ्यांचा बटाटा लागवड यंत्राला प्रतिसाद वाढला आहे.
बटाटा काढणीसाठी वेगळे तंत्र विकसित केले. ट्रॅक्‍टरच्या फणनीला फास लावून बटाटा काढण्यास सुरवात केली. फणनीने बटाटे व्यवस्थित निघतात आणि त्यापाठोपाठ फासेमुळे ते जमिनीवर येतात. मजुरांनी फक्त फणनीमागे जमिनीवर आलेले बटाटे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने गोळा करायचे. यासाठी बैलांची गरज नाही. बटाट्ट्याचे संपूर्ण काम ट्रॅक्‍टरने केल्याने खर्चात मोठी बचत होते. बटाट्याची लागवड केल्यानंतर 10 ते 12 दिवसांत शिफारशीत तणनाशक फवारतो, यामुळे नंतर खुरपणीची गरज राहत नाही. बटाट्याला ठिबक सिंचनाचा वापर करतो. गरजेनुसार अंदाजाने ठिबकमधून खते देतो. गेल्या वर्षी एकरी 12 टन माल निघाला.
बटाट्याचे अर्थकारण फार महत्त्वाचे आहे. 2300 ते 2500 रुपये क्विंटल दराने बियाणे विकत घ्यावे लागते, त्यामुळे पाच-सहा टन माल निघू शेती परवडत नाही. दहा किंवा त्याहून अधिक टन माल निघाला तर बटाटा शेती परवडते. एकरी आठ क्विंटल बियाणे लागते. एकरी पाच टन उत्पादन झाले व दहा रुपये किलो दर मिळाला तर 50 हजार रुपये होतात. बाजारभाव 15 रुपयांच्या पुढे असेल तरच फायदा होतो. कमी असेल तर हाती काही उरत नाही. त्यामुळे बटाटा उत्पादकांना उत्पादकता वाढीशिवाय पर्याय नाही.

---------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate