অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बंदिस्त शेळीपालनातून व्यवसाय

माळवाडी येथील राजेंद्र वावरे यांचे वडील हरिभाऊ पूर्वी मेंढपाळ होते. वयोमानानुसार त्यांनी हा व्यवसाय बंद केला. आपली पाच एकर शेती ते सांभाळू लागले. पुढे त्यांचा मुलगा राजेंद्र यांनी शेतीची जबाबदारी घेतली. शेतीला जोडधंदा असावा म्हणून त्यांनी गायी-म्हशींचे पालन सुरू केले; परंतु काही कारणांमुळे त्यात फारसे यश मिळाले नाही. त्यांनी गोठा बंद केला. त्यानंतर म्हणजे 2006 मध्ये फलटण येथील एका संशोधन संस्थेतून (जि. सातारा) आफ्रिकन बोअर जातीच्या पाच शेळ्या व एक नर आणला. पूर्वी असलेल्या गोठ्याची दुरुस्ती केली. कळकी काठ्यांचे "कंपार्टमेंट' करून हा गोठा बंदिस्त शेळीपालनासाठी वापरात आणला.

असे होते शेळीपालन

1) वसगडे रस्त्यावर राजेंद्र यांचा शेळीफार्म आहे. लागूनच बाजूला शेती आहे. जनावरांच्या गोठ्याचा खुबीने वापर करण्यात आला आहे. बाहेरच्या बाजूला गव्हाणी आहेत. त्यामध्ये शेळ्यांना खाद्य दिले जाते. आतील बाजूला गव्हाण नाही. मात्र तेथे बॅरेलचे स्टॅंड करून त्यात खाद्य दिले जाते. पाणी पाजण्यासाठी सकाळ-संध्याकाळ बादल्या ठेवल्या जातात. वरचेवर पाणी बदलले जाते. सकाळी एकवेळ तुरीचा भुसा तर दुपारी ओल्या वैरणीची कुट्टी दिली जाते. सायंकाळी पाच वाजता प्रत्येक शेळीला 250 ग्रॅम प्रमाणे तर लहान करडांना प्रत्येकी दहांमध्ये एक किलो तर मोठ्या नरांना प्रत्येकी अर्धा किलो या पद्धतीने मका दिला जातो. 
2) शेळी व्याल्यानंतर पिलांना आईजवळ ठेवले जाते. त्यानंतर बाजूला दुसऱ्या कप्प्यात ठेवली जातात. संध्याकाळी दूध पाजण्यासाठी पुन्हा ती आईजवळ आणली जातात. सध्या लहान-मोठ्या मिळून नरांसह शेळींची संख्या साठपर्यंत आहे. गोठ्याच्या बाजूला तीन गुंठे रिकामी जागा आहे. या जागेला बाहेरून जाळीचे कंपाउंड आहे. सकाळी ऊन पडल्यावर किमान दोन तास शेळ्या या मोकळ्या जागेत हवेशीर वातावरणात सोडल्या जातात. त्या दरम्यान गोठा स्वच्छ करून घेतला जातो.

आरोग्याची काळजी

आफ्रिकन बोअर शेळ्या रोगाला सहजासहजी बळी पडत नाहीत. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, असा राजेंद्र यांचा अनुभव आहे, तरीही खाद्य व्यवस्थापनाबरोबरच त्यांच्या आरोग्यासाठी दक्ष राहावे लागते. विविध रोगांसाठी लसीकरण वेगवेगळ्या कालावधीत वर्षभरात होते. मक्‍याबरोबर खासगी कंपनीचे पूरक खाद्यही दिले जाते. व्यालेल्या शेळ्यांना दुधासाठी सरकी पेंड भिजवून दिले जाते. राजेंद्र यांच्या मते शेळी व्याल्यानंतर 15 दिवस चांगली काळजी घ्यावी लागते. 
विक्री व्यवस्थापन व ताळेबंद 
अशी होते विक्री- (सर्व आकडे वार्षिक) 
पैदासीसाठी 
शेळ्या- 10- 2000 रुपये प्रति किलो 
नर- 5- 1500 रु. प्रति किलो
बोकड- 10 - ईदच्या सणाला कुर्बानीसाठी त्यांना मागणी असते. 
राजेंद्र यांच्या फार्ममध्ये धष्टपुष्ट नर आहेत. त्यांची वर्षभर चांगली जोपासना होते. सुमारे 50 हजार रुपयांपर्यंत एकेक नर विकला जातो. 
राजेंद्र यांनी 50 ते 60 प्रमाणात शेळ्यांची संख्या कायम ठेवली आहे. शेती सांभाळत हा व्यवसाय करता आला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. फार्ममधील जनावरांची विक्री बहुतांशी पैदास या हेतूने होते. शेळीपालनाचा वार्षिक खर्च दीड ते दोन लाख रुपये होतो. वर्षाला सहा लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. जोडीला लेंडीखत मिळते. स्वतःच्या शेतीत त्याचा उपयोग होतो.

साधली आर्थिक प्रगती

वावरे कुटुंबाची जमीन पाच एकर. त्यात त्यांनी कष्टाने वाढ करीत ती 13 एकरवर नेली आहे. त्यामध्ये ऊस व चार एकर द्राक्षबाग आहे. तीन बंधूंचे एकत्र कुटुंब आहे. पैकी थोरले सर्जेराव साखर कारखान्यात शेती अधिकारी, दुसरे संजय खासगी पशुवैद्यक सेवेत, तर तिसरे राजेंद्र शेती व शेळीपालन सांभाळतात. 
बंदिस्त शेळीपालनाचे महत्त्व सांगताना सर्जेराव व राजेंद्र म्हणाले, की चार वर्षांपूर्वी वादळ व भरपूर पाऊस झाला. फुलोरा अवस्थेत डाऊनी रोगामुळे सहा एकर बाग हातची गेली. शेतीचे आर्थिक गणित पूर्ण कोलमडले. त्या वेळी बंदिस्त शेळीपालनातून होत असलेल्या नफ्यातून आम्ही तरलो. त्या वेळी खरोखरच पूरक व्यवसायाचे महत्त्व समजले. राजेंद्र म्हणाले, की नव्या सुविधांसह पाचशे शेळ्यांचा मोठा फार्म साकारणार आहे. तसे प्रयत्न सुरू आहेत.

राजेंद्र यांनी दिल्या शेळीपालनाच्या टीप्स

1) आफ्रिकन बोअर शेळ्यांना सोन्यासारखी मागणी. 
2) शेळ्यांनी खाऊन उरलेली ओल्या वैरणीची कुट्टी पुन्हा गायी-म्हशींना देता येते. 
3) बंदिस्त शेळीपालनातून लेंडीखत भरपूर व शुद्ध मिळते. घरच्या द्राक्ष व ऊस शेतीला ते फायदेशीर. 
4) वर्षातून चार वेळा लसीकरण. गोठ्याची जागा निर्जंतुक केली जाते. 
5) सहा एकरांत बांधावरच चाऱ्याची निर्मिती 
6) अन्य शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्यांना मोठी मागणी 

राजेंद्र वावरे - 9890528799

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate