ओम साई महिला बचत गटाने विकसित केला ब्रॅण्ड महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी बचत गटांची मदत होत असून, बचत गटांच्या व्यवसायांनी चांगलेच बाळसे धरले आहे. केवळ उत्पादन करून न थांबता विक्रीसाठी योग्य ते प्रयत्न करण्यातही त्या मागे पडत नाहीत. त्याचे उदाहरण आहे, ओम साई महिला बचत गट.
महिला बचत गट म्हणजे केवळ बचत आणि गरजेसाठी वापर असे मानले जायचे. गेल्या काही वर्षांपासून त्यात बदल होत असून, महिलांमध्ये उद्योजकता विकसित होत आहे. या उद्योगांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत असून, महिला सबलीकरणाला मदत होत आहे.
ग्रामीण महिलांसोबत शहरी महिलाही बचत गटांतून व्यवसाय करत आहेत. त्यातील एक- पुण्यातील महिला बचत गट लोणच्याची केवळ विविध उत्पादने तयार करून न थांबता त्यांची ब्रॅंड नावासह विक्री करत आहे.
पुणे जिल्ह्यात आज सुमारे 25 हजार 800 महिला बचत गट आहेत, त्यांतील अनेक महिला बचत गट स्थापन करून नवीन उद्योग उभारून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. सन 2007 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या ग्रामीण महिला विकास विभागाच्या मुख्य अधिकारी सौ. एम. ए. बेल्हेकर व एन. जी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गटाची स्थापना करण्यात आली.
शोभा चक्रनारायण यांनी सुरवातीला ओळखीच्या व रास्ता पेठेत राहणाऱ्या पंधरा महिलांना बचत गटाची संकल्पना सांगितली. बचत गटाला "ओम साई महिला बचत गट' असे नाव दिले. सुरवातीला बचत गटातील बारा महिलांनी मासिक शंभर रुपयांची बचत म्हणजेच वार्षिक बचत सुरू केली. अंतर्गत बचतीतून साठलेल्या पहिल्या वर्षीच्या 18 हजार रुपयांमध्ये भाजणीच्या चकल्या तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे विविध पदार्थांची मागणी होत असल्याने व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या उद्योगाबाबत माहिती देताना सौ. चक्रनारायण म्हणाल्या, की बचत गटाची सुरवात जरी 2007 मध्ये झाली असली, तरी 2000 मध्ये 1200 रुपये भरून आगाखान पॅलेस येथे फळांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचा लाभ बचत गट स्थापन झाल्यानंतर झाला.
भाजणीच्या चकल्या तयार करत होतो. सुरवातीला ग्राहकांची संख्या कमी होती. काही वेळेस झालेल्या चुकांमुळे तयार केलेला माल फेकूनही द्यावा लागला. तरी, मागे न हटता व्यवसाय करायचाच, असा पक्का निर्धार होता. रोजच्या अनुभवातून शिकत पुढे जात राहिलो. हळूहळू मालाला मागणी वाढत गेली. चकल्यांनंतर कैरी व आवळ्यापासून लोणचे तयार करायला सुरवात केली.
गटातील एक महिला पहाटे बाजार समितीतून फळांची खरेदी करत असे, त्यापासून उत्पादन तयार करायचो. सुरवातीला लोणचे तयार करून 50, 100 ग्रॅम वजनांच्या पॅकेटमध्ये विक्री केली जायची. विक्री करण्यासाठी जागा नव्हती. मालाच्या विक्रीचा प्रश्न यायचा. त्यासाठी जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेत बॅंकेच्या आवारात छोटा स्टॉल मिळवला. आम्ही रोज स्टॉल मांडून भाजणीच्या चकल्या, मटकी व हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे, कैरीचे लोणचे अशा वस्तूंची विक्री करण्यास सुरवात केली. बॅंकेत येणाऱ्या नागरिकांकडून मालाला मागणी वाढत गेली. मग आम्ही उत्पादनाला "प्रिया ऍग्रो प्रॉडक्ट' असे नाव दिले. पुढे विक्री वाढल्यानंतर या नावाचा ट्रेड मार्क असलेला परवानाही मिळवला आहे.
विक्रीसाठी विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल मांडण्यात येतो. महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी होत असलेल्या प्रदर्शनांतून मालाची चांगली विक्री होते. गेल्या वर्षी ओम साई महिला बचत गटाची नाबार्डकडून हैदराबाद येथे महालक्ष्मी सरस येथे भरविलेल्या 12 दिवसांच्या प्रदर्शनाकरिता निवड करण्यात आली होती.
ओम साई महिला बचत गटामार्फत अनेक शेतकरी, महिला बचत गट यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामध्ये बारामती येथील सतीश जगदाळे, विम्सदी पॉल संस्था, श्री शांता सुखदा यांचा समावेश आहे. सध्या आम्ही हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला बचत गटांना एक महिन्याचे प्रशिक्षण अल्प शुल्क घेऊन देण्याचा विचार करत आहोत.
- शोभा चक्रनारायण,
अध्यक्ष,
ओम साई महिला बचत गट, पुणे
मो - 9370496799
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...