অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रसवंतीने केली ऊसशेती गोड

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरासह मनालाही थंडावा देणाऱ्या उसाचा ताजा रस पिण्यासाठी उड्या पडतात. ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील लक्ष्मण व दिनेश पाटील हे पिता-पुत्र आपल्या उसाला साखर कारखान्याचे "मार्केट' मिळत नाही म्हणून रडत बसले नाहीत, तर रसवंतिगृह सुरू करून कोणाच्या मध्यस्थीशिवाय आपल्याच उसाच्या ताज्या रसाला थेट ग्राहकांची बाजारपेठ मिळवली. 
जळगाव जिल्ह्यात केळीसह कपाशीसारखी प्रमुख पिके असल्याने, उसाचे लागवड क्षेत्र तसे कमीच असते. त्यातही मोजून दोनच साखर कारखाने सद्यःस्थितीत गाळप करीत आहेत. त्यामुळे लागवड केलेला ऊस वेळेवर तुटतो की नाही, याबद्दलची साशंकता दर वर्षी निर्माण होत असते. ऊसलागवडीचे क्षेत्र कमी झाल्याच्या स्थितीत ऊस न तुटण्याची वेळ शक्‍यतो येत नाही. तरीही कमी प्रमाणात ऊसलागवड करणाऱ्यांना साखर कारखान्यांकडून फारशी चांगली वागणूक मिळत नसल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. ममुराबाद (ता.) येथील लक्ष्मण बाबूराव पाटील यांच्यावर 2007 मध्ये तसा प्रसंग गुदरला.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील चालकाची नोकरी सांभाळून शेती करणाऱ्या पाटील यांनी दोन एकरांवर ऊसलागवड केली होती. साखर कारखान्याने मजूरटंचाईचे कारण पुढे करून उन्हाळ्याची चाहूल लागली तरी त्यांचा ऊस तोडला नाही. अशा पेचप्रसंगी नेमके काय करावे, असा विचार मनात घोळत असताना जळगाव- चोपडा रस्त्यालगत आपल्या शेताच्या बांधावर रसवंतिगृह सुरू करण्याची कल्पना पाटील यांना सुचली. त्यानुसार 25 हजार रुपयांचे रसकाढणी यंत्र खरेदी केले. वीज भारनियमनावर मात करणसाठी अजून 25 हजार रुपयांचे डिझेल इंजिन खरेदी केले. मुलगा दिनेश याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र घरची शेतीही सांभाळण्याची गरज होती. त्याप्रमाणे रसवंतिगृह चालविण्याची जबाबदारी सद्य परिस्थितीत दिनेश याच्यावर सोपविण्यात आली.

सुरू झाले राम-ऋषी रसवंतिगृह

रसवंतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत कडक उन्हाळा जाणवू लागला होता.

साहजिक जळगावहून चोपडा, शिरपूर, यावल मार्गाकडे जाणारे वाहनधारक उष्णतेमुळे होणारी काहिली कमी करण्यासाठी उसाचा ताजा रस पिण्यासाठी पाटील यांच्या "राम-ऋषी' रसवंतिगृहाजवळ आवर्जून थांबू लागले. कारखान्याने न तोडलेला ऊस उन्हाळा संपेपर्यंत रसवंतिगृहासाठी वापरला गेला. कारखान्यास ऊस दिल्यानंतर 50 हजार रुपयेसुद्धा मिळाले नसते; मात्र शेताच्या बांधावरच रसवंतिगृह सुरू केल्याने उसाचे अर्थकारण बदलवणे पाटील पिता-पुत्र यांना शक्‍य झाले.

मागे वळून पाहिलेच नाही

रसवंती व्यवसाय पहिल्या वर्षी आश्‍वासक वाटल्यानंतर पाटील यांचा आत्मविश्‍वास वाढला. पुढील वर्षी खास रसासाठी म्हणून को-419 जातीच्या उसाची लागवड केली आणि संपूर्ण ऊस रसवंतीसाठी वापरला. सर्व खर्च वजा जाता, प्रति टन साडेपाच ते सहा हजार रुपयांप्रमाणे भाव त्यांना पडला. तेव्हापासून आजतागायत एकदाही साखर कारखान्याला ऊस पाठविलेला नाही. मागणी लक्षात घेऊन एक एकरावर नुकतीच उसाची लागवड केली आहे.

बदलवले ऊसशेतीचे अर्थकारण

  • खास रसासाठी प्रसिद्ध को- 419 जातीच्या उसाची दोन एकरांवर सायकल पद्धतीने लागवड. त्यामुळे रसवंतिगृहासाठी बाहेरून ऊस खरेदी करण्याची गरज भासत नाही.
  • सुमारे 40 ते 50 टन उसाचा सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत वापर. रसवंतीसाठी दररोज लागतो तेवढाच ऊस मजुरांकरवी दररोज तोडून घेतला जातो. त्यामुळे ग्राहकांना ताजा व चवदार रस देणे शक्‍य होते.
  • जादा ऊस परिसरातील रसवंतिगृहांना 5,500 ते 6,000 रुपये प्रतिटनाप्रमाणे विक्री करण्याचे नियोजन असते; मात्र तशी वेळ शक्‍यतो येत नाही.
  • रसवंतिगृहासाठी गरजेनुसार ऊस तोडून झाल्यानंतर शिल्लक पाचटाचे शेतातच आच्छादन केले जाते. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढीस लागून उसाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.
  • रस काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या चिपाडापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करण्यात येते. त्याचा वापर उसासोबत कपाशीसाठीही केला जातो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादनात वाढ झाली आहे.

घरगुती कार्यक्रमांसाठी रसाची पोहोच सेवा.....

पाटील यांच्या रसवंतिगृहातील रसात आवश्‍यकतेनुसार लिंबू, आले मिसळले जाते, बर्फाचा वापर ग्राहकाच्या मागणीनुसारच करण्यात येतो. या रसवंतीवरील रसाच्या उत्तम चवीची लोकप्रियता जाणून असलेले वाहनधारक चोपडा, शिरपूर, यावलकडे जाताना व जळगावकडे येताना आवर्जून या "स्पॉट'वर थांबतात. रसवंतिगृहापासून हाकेच्या अंतरावर फार्मसी कॉलेज आहे. तेथील प्राध्यापक व विद्यार्थीही रसपानासाठी येथे नियमित येतात.

दमलेले वाटसरू रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडाखाली सावलीत टाकलेल्या खुर्च्यांवर बसून क्षणभर विश्रांती घेतात. थंडगार रस पिऊन तृप्त होतात.
ममुराबादसह परिसरात महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम, साखरपुडा तसेच अन्य घरगुती कार्यक्रमांसाठी पाटील यांना उसाच्या रसासाठी मोठ्या प्रमाणावर "ऑर्डर' मिळते. काही जण रविवारी सुटीच्या दिवशी "स्पेशल रस' पिण्यासाठी पाटील यांच्या रसवंतिगृहाला सहकुटुंब भेटदेखील देतात.

धावरील रसवंतिगृहाचे अर्थकारण.....


गणेश चतुर्थीला सुरू झालेले रसवंतिगृह पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच 15 जूनच्या कालावधीपर्यंत चालविले जाते. 31 डिसेंबरपर्यंत थंडीचे प्रमाण जास्त राहत असल्याने, रसवंतिगृहावर प्रतिदिन 25 ते 30 ग्लास रस खपतो. मकर संक्रांतीनंतर ऊन तापण्यास सुरवात झाल्यावर उसाच्या रसाला मागणी वाढू लागली की प्रतिदिन सुमारे 150 ते 200 ग्लास रस खपतो. 
उसाच्या लहान ग्लासासाठी 10 रुपये आणि मोठ्या ग्लासासाठी 15 रुपये दर आकारला जातो. 
  • वीज भारनियमनावर मात करण्यासाठी रसवंतीसाठी डिझेल मशिनचा वापर होतो. त्यासाठी लागणारे डिझेल तसेच रसासाठी लिंबू, आले आणि दोन मजुरांसाठीही दररोज किमान 400 रुपये खर्च होतात.
  • उन्हाळी हंगामातील विचार केला तर दैनंदिन सुमारे 800 रुपये खर्च वजा जाता सरासरी किमान सातशे रुपये ते त्याहून अधिक रुपये दिवसाकाठी मिळतात.
  • रसवंतिगृहापासून मिळालेल्या पैशांमधून शेतीसाठी लागणारा खर्च वरचेवर भागविला जातो. भांडवलउभारणीसाठी बॅंका किंवा विकास सोसायटीपुढे हात पसरण्याची गरज भासत नाही.

केवळ रसच कशाला? चहा, बिस्किटेही देऊ यात...

  • रसवंतीचा व्यवसाय संपल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात चहाच्या व्यवसायाला गती दिली जाते. उसाच्या रसाव्यतिरिक्त चहा, बिस्किटे, फरसाण देण्याची सोय केली आहे. चहासाठी प्रतिदिन 10 लिटर दुधाची गरज भासते. त्यासाठी 400 रुपये मोजावे लागतात.
  • कापसासह सोयाबीन, गहू, हरभरा यांच्यापासून मिळणारे उत्पन्न बाजूला ठेवले जाते. त्याचा उपयोग पुढे मोठ्या व्यवहारासाठी होतो.

शिक्षण घेत असताना पुढे जाऊन नोकरी करावी की एखादा व्यवसाय, असा प्रश्‍न मनात रुंजी घालत होता. तशात वडिलांनी शेताच्या बांधावर रसवंतिगृह सुरू केले. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझ्या मनातील कल्पनेला उभारी मिळाली. शेतीकडे 12 तासांपेक्षा जास्त काळ लक्ष देणे शक्‍य झाले. 
-दिनेश पाटील, ममुराबाद, ता. जि. जळगाव 
(संपर्क-9604923919)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate