অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बंदिस्त शेळीपालन व्यवसाय

खोंडामळीत सिरोही, काठियावाडी शेळ्यांचे संगोपन


दुष्काळी भागात शेतीपूरक व्यवसाय तारणहार ठरू शकतो हा विचार डोळ्यांसमोर ठेवून खोंडामळी (जि. नंदुरबार) येथील अजय ईश्‍वरदास पाटील या तरुणाने बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. आपली 24 एकर शेती सांभाळताना सिरोही, काठियावाडी शेळ्यांचे संगोपन करून आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे.


नंदुरबार जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्‍यक वातावरण, भौगोलिक स्थिती व नजिकच्या गुजरात राज्याची बाजार व्यवस्था सहज उपलब्ध आहे. मात्र पूरक व्यवसायात उतरण्यासाठी आवश्‍यक मानसिकता व प्रोत्साहनाअभावी सर्वदूर उदासीनता व नैराश्‍य पसरलेले दिसते. शेतीपूरक व्यवसायांना पाठबळ देऊ शकणाऱ्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही एरवी अनास्थाच दिसते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील खोंडामळी येथील अजय पाटील यांचा शेळीपालन प्रयोग संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य व उत्साह वाढवणारा ठरला आहे.

नोकरी सोडून शेतीत पाय....


अजय बीएसस्सी ऍग्री आहेत. त्यांनी एका नामांकित बॅंकेत कृषी अधिकारी म्हणून काही काळ नोकरी केली. मात्र तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांनी सरळ खोंडामळी गावाचा रस्ता धरला. घरी आल्यानंतर कुटुंबीयांकडे घरच्या शेतीत लक्ष घालण्याचा विचार बोलून दाखविला. कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. त्यानंतर खासगी ठिबक सिंचन उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची "डिलरशीप' मिळवली. तेवढ्यावरच न थांबता बंदिस्त शेळीपालन व कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पाऊले उचलली. पैकी कृषी केंद्राची जबाबदारी एमए बीएड्‌ झालेला भाऊ अविनाश यांच्या खांद्यावर टाकली. शेळीपालनाची जबाबदारी अजय यांनी स्वतः पेलली.

शेळीपालन प्रयोग


सुरवातीला 60 बाय 80 फुटांचे शेड बांधले. राजस्थानातील सिरोही जातीच्या 23 शेळ्या व एक बोकड साडेआठ हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे मध्यस्थांमार्फत खरेदी केले. दुसऱ्या टप्प्यात खानेदशातील काठियावाडी जातीच्या सहा महिने वयाच्या आठ शेळ्या चार हजार रुपये प्रतिनग व एक बोकड 15 हजार रुपये याप्रमाणे खरेदी झाली. सिरोही शेळी उंच शरीर बांध्यामुळे मांस उत्पादनासाठी तर गुजरातमधील काठियावाडी शेळी अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. येत्या काळात शेळीच्या शुद्ध जातींचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांची पैदास वाढवण्याचे अजय यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेळीपालनातील या प्रयत्नांची दखल घेऊन नंदुरबार पंचायत समितीने अजय यांना उस्मानाबादी शेळ्यांचे युनिट (40+2 (मादी अधिक नर)) मंजूर केले आहे. त्यासाठी 50 टक्के अनुदान दिले आहे.

करडांच्या वाढीवर लक्ष....

अजय यांनी सिरोही जातीची 27 करडे वाढवली आहेत. काठेवाडी जातीच्या आठ शेळ्या व एक बोकड आहे. त्यांच्या जोमदार वाढीकडे सुरवातीपासूनच त्यांचे बारीक लक्ष आहे. वेळोवेळी जंत निर्मूलन व लसीकरण करून घेण्यावर त्यांचा भर असतो. करडांना वय व वजन वाढीनुसार भरडलेला मका, कोवळा हिरवा चारा खाण्यास दिला जातो. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळते. शेळीपालन व्यवसायातील बारकावे जाणून घेण्यासाठी अजय यांचे बंधू अविनाश यांनी कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित शेळीपालनाचे प्रशिक्षणही घेतले आहे. नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एच. टी. रावटे यांनीही अजय यांच्या बंदिस्त शेळीपालन फार्मला भेट देऊन त्यांच्या प्रयोगाचे कौतुक केले आहे.

चारा नियोजन

बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करताना बाराही महिने हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून पाटील यांनी एक एकर शेतीत फुले जयवंत गवताची लागवड केली आहे. याशिवाय पावसाळा संपल्यानंतरची सोय म्हणून सुमारे 30 गुंठ्यांत बरसीमची लागवड केली जाते. शेळ्या व करडांना हिरवा चारा कुट्टी करूनच दिला जातो. कोरड्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी कपाशीचे पीक काढून झाल्यानंतर उन्हाळी हंगामात भुईमूग घेतला जातो. अन्य शेतकऱ्यांकडून ज्वारी व मक्‍याचा कडबा विकत घेऊन त्याचीही कुट्टी शेडमध्ये भरून ठेवली जाते. सकाळी गोठ्याची स्वच्छता आटोपल्यानंतर शेळ्यांना प्रत्येकी 200 ग्रॅमच्या हिशेबाने मका भरडा खाण्यास दिला जातो. याशिवाय दिवसभरातून दोन वेळा हिरवा व कोरडा चारा देण्याचे नियोजन असते. शेळ्यांना चारा खाणे सोयीचे होण्यासाठी पत्र्यापासून वैशिष्ट्यपूर्ण गव्हाणी तयार करून घेतल्या आहेत, त्यामुळे चाऱ्याची नासाडी शक्‍यतो होत नाही. पाण्याची भांडी शेडमध्येच ठेवली जातात.

लेंडीखताचा वापर

शेळ्यांनी गव्हाणीत चारा शिल्लक ठेवल्यास तो शेडमध्येच पसरविला जातो. जेणेकरून शेळ्यांच्या पायाखाली त्याचे आच्छादन तयार होते. त्यात मल-मूत्र उत्तम प्रकारे मिसळले जाते. शेळ्यांना बसण्यासाठी आरामदायी वातावरण तयार होते. वर्षभरात आतापर्यंत सुमारे 18 ते 20 ट्रॉली लेंडीखत तयार झाले आहे. ते शेताच्या बांधावर साठवून ठेवले आहे. त्याचा वापर घरच्या 24 एकर शेतीत होणार आहे. लेंडीखतामुळे जमिनीची सुपीकता वाढल्यावर फळबाग लागवड वाढविण्याचा अजय यांचा विचार आहे.
संपर्क - अजय पाटील- 9423725603

तज्ज्ञ म्हणतात, शुद्ध जातींचे संवर्धन हवे

शेळीच्या शुद्ध जातींचे संवर्धन व त्यांची पैदास करण्यावर शेतकऱ्यांनी भर देण्याची गरज आहे. शक्‍यतो दोन जातींच्या संकरीकरणाचा प्रयोग करू नये. तसे केल्यास शुद्ध जातींतील गुणधर्म कमी होण्याची भीती आहे. संकरीकरणाकडे वळण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

डॉ. संजय मंडकमाले
वरिष्ठ शास्त्रज्ञ, शेळी सुधार प्रकल्प
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

-----------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate