অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधमाशीपालनातून पाटील यांनी राजस्थानापर्यंत मारली मजल

लातूर येथील दिनकर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून मधमाशीपालन व्यवसाय टिकवून ठेवला. अभ्यास, शास्त्रोक्त शिक्षण घेत व्यवसायात वृद्धी केली. जिद्द, सातत्य, अपार कष्टांतून मधमाशीपालन क्षेत्रात रोजगार निर्माण केला. चिकाटीच्या बळावर राजस्थानापर्यंत मजल मारून त्यांनी व्यवसायाची उंची अधिक वाढवली आहे. आदर्श मधमाशीपालक म्हणून राज्याबरोबर देशात त्यांनी आपली ओळख तयार केली आहे.

लातूर येथील वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले दिनकर पाटील यांचे एकत्रित मोठे कुटुंब आहे. त्यातून त्यांच्या हिश्‍शाला आलेल्या शेतजमिनीतील उत्पादनातून उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. एके दिवशी खादी ग्रामोद्योग मंडळाचे विकास अधिकारी एम. एन. दराडे यांच्याकडून मधमाशीपालन व्यवसायाची तांत्रिक माहिती मिळाली. त्यातून सुमारे 2006 च्या सुमारास पाटील यांनी मधमाशीपालनास सुरवात केली. एपिस मेलिफेरा या युरोपातील मधमाशीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने बंगळूरच्या व्ही. संतोष यांच्याकडून पाच पेट्या 15 हजार रुपयांत खरेदी केल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवसायवृद्धी करीत आज 250 पेट्यांपर्यंत ते पोचले आहेत. शिवाय महाराष्ट्राची सीमा ओलांडून राजस्थानापर्यंत मजल मारली आहे.

पाटील यांचा मधमाशीपालन व्यवसाय दृष्टिक्षेपात

  1. सध्या मधमाश्‍यांची पैदास वाढवणे व त्यांची विक्री करणे हा मुख्य व्यवसाय
  2. मधाचेही दुय्यम उत्पादन
  3. अनेक शेतकरी आपल्या पिकांतील परागीभवनासाठी बोलावतात. उदा. कांदा, डाळिंब (पूर्वी प्रतिपेटी एक हजार रु. भाडे त्यासाठी पाटील घेत. मात्र कीडनाशकांच्या असंयमित वापराने मधमाश्‍यांवर परिणाम होऊ लागल्याने भाडेतत्त्वावर पेट्या देणे थांबवले आहे.)
  4. पाटील मे ते मध्य नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात व्यवसाय करतात. तीळ, ज्वारी, उडीद, मूग, सूर्यफूल, सोयाबीन, कारळा, तसेच अन्य वनस्पतींचा फुलोरा उपयोगात आणला जातो.
  5. नोव्हेंबरला पाटील महाराष्ट्राची सीमा ओलांडून राजस्थानात कोटा, गारा, झालावाड आदी जिल्ह्यांत जातात. तेथे फेब्रुवारीपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. तेथे मोहरी हे मुख्य पीक त्यांना मिळते.
  6. त्यानंतर पुढील महिना ते जम्मू, अंबाला आदी भागांत जातात. तेथे कोथिंबिरीचे पीक मिळते.
  7. या काळात त्या ठिकाणीच तंबू टाकून राहण्याची व्यवस्था केली जाते. जेवणही तेथेच बनवून खाल्ले जाते.
  8. त्यानंतर पुन्हा जूनसाठी पाटील महाराष्ट्रात परत येतात.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत "बी ब्रीडर' (मधमाशी पैदासकार) म्हणून अधिकृत मान्यता
खादी ग्रामोद्योग, पुणे, महाबळेश्‍वर आदी ठिकाणांतील विविध संस्थांतर्फे त्यांनी दीर्घ काळ मुदतीचे प्रशिक्षणही घेतले आहे. राष्ट्रीय मधमाशी मंडळाकडे मधमाशीपालक म्हणून त्यांची नोंदणी आहे.
दर वर्षी 300 ते 400 मधमाश्‍या वसाहतींची विक्री

  • एक वसाहत म्हणजे एक पेटी
  • एक पेटी 4000 रुपयांना विकली जाते.
  • यंदाच्या वर्षी तीनशेपर्यंतच पेट्या विकल्या.
  • प्रतिपेटी 20 ते 30 किलोपर्यंत मध मिळतो.
  • दर वर्षी सुमारे मधाची विक्री- पाच टन
  • खादी ग्रामोद्योगाकडे किलोला 120 रुपये दराने होते विक्री

पाटलांचे काम अत्यंत आव्हानाचे

राजस्थानात गेली पाच वर्षे सातत्याने जात असल्याने तेथील सात ते आठ शेतकऱ्यांशी नियमित संपर्क व त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते तयार झाले आहे. हे शेतकरी दर हंगामात पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतात. मधमाश्‍यांनी भरलेल्या पेट्या, त्याचे स्टॅंड, कंटेनर, आदी सर्व जामानिमा घेऊन पाटील महाराष्ट्रातून निघतात व पुन्हा तीन ते चार महिन्यांनी परततात ते हे सर्व साहित्य घेऊनच. ही मोठी कसरत करीतच पाटील यांनी हा व्यवसाय वाढवला आहे. तेथील शेतातील मुक्कामाच्या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस आदी हवामानाशी संबंधित सर्व घटकांशी मुकाबला देतच त्यांना हे काम यशस्वी करावे लागते. पेट्यांचीही काळजी घ्यावी लागते.

असे असते मधमाशीचे घर

पेट्या सर्वसाधारणपणे उत्तर भारतातील आंबा, तून, कैल यांसारख्या मऊ झाडाच्या लाकडाच्या बनविलेल्या असतात. पंजाबमध्ये 18 बाय 15 बाय 7 इंच आकाराच्या पेट्या प्रति नग बाराशे रुपये दराने मिळतात. मेणाच्या षट्‌कोनी आकाराच्या घराचे साचे बसविलेले असतात. मधमाश्‍या त्यावर पोळे बनवितात. एका पेटीत 10 ते 15 हजार कामकरी माश्‍या व एक राणीमाशी असते. राणीमाशीचे वय, खाद्य आदी बारीकसारीक नोंदी पाटील ठेवतात. विविध रोगकिडींपासून माश्‍यांचा बचाव करण्यासाठी औषधी पट्ट्या प्रत्येक पेटीत ठेवल्या जातात. राघू व चिमण्यांपासूनही रक्षण केले जाते.
-जखमजोडी, रानइचका, निलगिरी, बाभूळ, कडुनिंब, मोह यांसारख्या वनस्पतींच्या क्षेत्रातही पेट्या ठेवल्यास परागीभवन व मधाचा फायदा मिळतो. पेट्या ठेवलेल्या ठिकाणापासून सुमारे चार किलोमीटर त्रिज्येच्या परिघात माश्‍या फिरून मध गोळा करतात.
स्थलांतर करताना पेट्यांना बाहेरून आवरण व वरच्या भागातून हवेसाठी जागा ठेवलेली असते. रात्रीच्या वेळी स्थलांतर तर दिवस उजाडला की पेट्या उघडून माशांना बाहेर सोडले जाते. दिवसभर फिरून माश्‍या संध्याकाळी परतल्या, की पुन्हा प्रवास सुरू होतो.

मधमाशीपालन व्यवसायातील समस्या

वाढत्या वृक्षतोडीमुळे मधमाश्‍यांची वस्तिस्थाने नष्ट होत आहेत. यामुळे त्यांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे. कीडनाशकांचा अयोग्य व अनियंत्रित वापरही मधमाश्‍यांसाठी हानीकारक ठरत आहे. या व्यवसायात स्थलांतराला महत्त्व असल्याने कुटुंबापासून काही काळ लांब राहण्याची तयारी ठेवावी लागते. मजुरांची समस्या आहे. विविध वनस्पती, फुलांचा हंगाम राज्यात अथवा देशातील कोणत्या ठिकाणी आहे, याचा परिपूर्ण अभ्यास असणे गरजेचे आहे. मेंढीपालन, शेळीपालनासारख्या व्यवसायाप्रमाणे स्थलांतर करण्याची मानसिक तयारी असणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणतात.

संपर्क- दिनकर पाटिल-9637135284
रा. लातूर रोड, पो. मोहनाळ, ता. चाकूर, जि. लातूर

स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate