आंतरपिकातून मिळवला काटी (जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते यांनी फायदा -
डाळिंब शेतीमध्ये योग्य नियोजन व पपईसारख्या आंतरपिकांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग काटी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते करत आहेत. नव्या प्रयोगासाठी योग्य त्या नियोजनातून त्यांनी खर्चामध्ये बचत साधली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका हा उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्याचा दक्षिण भागामध्ये आता उसाबरोबर डाळिंबाखालील क्षेत्र वाढत आहे. हा भाग कमी पाण्याचा, माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्यातील अनेक शेतकरी डाळिंब पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे डाळिंब हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत काटी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती होती. सन 2000 पासून शेतीत उतरलेल्या साहेबरावांनी सन 2005 पर्यंत ज्वारी, बाजरी, मका यांसारखी पारंपरिक पिके घेतली. सन 2005 मध्ये त्यांनी दीड एकर क्षेत्रावर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्याला सन 2006 मध्ये दीड एकर क्षेत्रातून 15 टन उत्पादन मिळाले. त्याला 41 रुपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे डाळिंब पीक आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली. त्यामुळे हळूहळू सर्व 15 एकर क्षेत्र डाळिंबाखाली आणले.
- 2010 मध्ये चार एकर शेती विकत घेतली. मात्र आता शेतीसाठी पाणी कमी पडू लागल्याने 2011 मध्ये सिंचनासाठी पाच किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनने पाणी आणले. 2012 मध्ये आणखी चार एकर शेती विकत घेतली.
नऊ एकर क्षेत्रावर डाळिंबासोबत पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. नेहमीच्या पद्धतीने आंतरपीक न घेता, त्यांनी वेगळी पद्धत अवलंबली आहे. दोन ओळींतील अंतर 12 फूट ठेवून दोन डाळिंब रोपांतील अंतर आठ फूट ठेवले. या आठ फुटांमध्ये चार फुटांवर पपईच्या रोपांची एकरी 415 रोपांची लागवड केली आहे.
आपल्या 23 एकर क्षेत्रासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवड, खत, पाणी, फवारणी, कोणत्या कालावधीमध्ये कोणता रोग, किडीचा प्रादुर्भाव झाला या विषयी नियोजन व माहिती नोंदणीचा आराखडा त्यांनी संगणकावर तयार करून ठेवला आहे. त्यानुसार प्रत्येक बाबींचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे साहेबराव यांनी सांगितले.
पाण्याच्या काटेकोर वापराकडे साहेबराव यांचे लक्ष असते. त्यासाठी डाळिंबामध्ये सिंचनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला आहे.
पपईची लागवड केल्यानंतर साधारणपणे सात महिन्यांनी पपईच्या काढणीस सुरवात केली. फळांची प्रतवारी करून पॅकिंगसाठी कागदी रद्दीचा वापर केला जातो. त्यामुळे वाहतुकीमध्ये साल काळी पडत नाही.
पपईच्या फळांच्या एकूण 15 काढण्या झाल्या असून एकरी सुमारे 50 टन मिळाले आहे. पपईच्या काढलेल्या फळाची विक्री जागेवरच केल्याने वाहतुकीचा खर्च वाचला.
डाळिंबाची रोपवाटिका -
सुरवातीला स्वतःसाठी डाळिंबाची चांगली रोपे उपलब्ध करण्याच्या हेतूने रोपवाटिका सुरू केली आहे. डाळिंबाच्या भगवा वाणाचे सुमारे एक लाख ते सव्वा लाख रोपे तयार केली आहेत.
संपर्क - साहेबराव मोहिते, 9850540003
आंतरपिकाची निवड करताना त्याचा मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असते. पपईसारख्या वेगाने वाढणाऱ्या पिकाची लागवड डाळिंबामध्ये करणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. तसेच पपईमधील किडींचे डाळिंबामध्ये स्थलांतर होण्याची शक्यताही अधिक राहणार आहे.
- डॉ. विनय सुपे,
उद्यान विद्यावेत्ता, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
लेखक- संदीप नवले
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...