অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वजनदार पेरूची गोड यशकथा

मॉलने दिला किलोला 125 रूपये दर

ऊस, केळी या सारख्या अधिक कालावधीच्या व तुलनेने अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी जिरायती भागातील शेतकरी पेरूसारख्या पिकाचा पर्याय अजमवताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जैनवाडी येथील किरण दानोळे यांनी ऍग्रोवन कृषी प्रदर्शनात स्टॉलवर वजनदार पेरूचे रोप पाहिले. त्याचा प्रयोग आपल्या शेतात केला. स्थानिक मॉलला त्यास किलोला 125 रूपये दरही मिळाला.

जिरायती शेतीत आता नवे प्रयोग घडू लागले आहेत. शेतकरी विविध कृषी प्रदर्शने, महोत्सवात जातात. तेथील तंत्रज्ञान पाहून त्याचा आपल्या शेतात प्रयोग करतात. पंढरपूर तालुक्‍यातील जैनवाडी येथील किरण दानोळे यांच्याबाबत हेच सांगता येईल. त्यांनी अशाच प्रयत्नांतून पेरूचा केलेला प्रयोग आश्‍वासक ठरला आहे. जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्येचं जैनवाडी गाव पंढरपूर- सातारा रोडपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर वसले आहे. संपूर्ण गावची शेती माळरान स्वरूपाची आहे. गावातील शेतकऱ्यांच्या विहीर व बोअरवेल्सना सुध्दा पाणी जेमतेम. परंतु नैसर्गिक खडकाळ जमीन आणि उपलब्ध पाण्याचा योग्य उपयोग करत येथील शेतकरी विविध पिके घेतात. त्यामुळेच आता मका, बाजरी या सारख्या पिकांची जागा डाळींब, द्राक्ष, केळी या सारख्या नगदी पिकांनी घेतली आहे.

ऍग्रोवनच्या प्रदर्शनातून मिळाली माहिती

विविध पिकांचा ध्यास घेतलेल्या किरण यांना शेतीत प्रयोग करण्याची पूर्वीपासूनच आवड आहे. पुणे येथे 2012 मध्ये भरलेल्या ऍग्रोवन कृषी प्रदर्शनात त्यांना एका स्टॉलवर रायपूर-छत्तीसगड येथील वैशिष्टयपूर्ण पेरु वाणाची माहिती मिळाली. असा पेरू आपण लावावा असा निर्णय घेतला. त्यानुसार ते रायपूर येथे गेले. तेथील रोपवाटिकेतून 150 रूपयाला एक रोप (वाहतुकीसह) याप्रमाणे 500 हून अधिक रोपे आणली. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने दोन वेळा उभी-आडवी नांगरट केली. त्यानंतर आपल्या एक एकरातील माळरानात मागील वर्षी 27 जूलै च्या दरम्यान लागवड केली.

व्यवस्थापनातील महत्वाचे मुद्दे

दानोळे यांनी शेताजवळच दहा गुंठे क्षेत्रात शेततळे तयार करुन त्यामध्ये पाणी साठवले आहे. सध्या या संरक्षीत पाण्यावरच पेरुची बाग जतन केली आहे. रोपांची जोमदारपणे वाढ व्हावी यासाठी लागवडीबरोबरच प्रती झाड 20 किलो शेणखत, 500 ग्रॅम निंबोळी पेड, सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि फोरेट अशी मात्रा दिली. त्याचसोबत बागेसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली. झाडांची वाढ सरळ व्हावी यासाठी रोपांना लोखंडी अँगल आणि तारांचा आधार दिला आहे. लागवडीपासून एक वर्षानंतर पुन्हा प्रती झाड 15 किलो शेणखत देऊन झाडांच्या बाजूंनी चाळणी करुन घेतली.

पेरूचे वजन एक किलोपर्यंत

जुलै 2014 मध्ये पेरुचा पहिला बहार धरला. दीड महिन्यांनी फुले कळ्या लागल्या. झाडांची वाढ आणि त्यांची क्षमता पाहून प्रती झाड चार ते पाच कळ्या ठेवण्यात आल्या. झाडांना 18ः46-0, मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम, बोरॉन आदींच्या मात्रा गरजेनुसार दिल्या. यामुळे फळांची वाढ चांगली होण्यास मदत झाली. झाडांवर साधारण मिलीबग आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर महिन्याला किटकनाशक व बुरशी नाशकांच्या सुमारे चार फवारण्या केल्या. फळधारणेपासून पाच महिन्यांत पेरुची पूर्ण वाढ झाली आहे. किमान 400 ग्रॅम पासून ते कमाल 1 किलो 500 ग्रॅम वजनाचे पेरु बागेत तयार झाले.

पेरूला किलोला 125 रूपये दर

फळांचा दोन नोव्हेंबर रोजी पहिला तोडा करण्यात आला. त्यावेळी 60 किलो पेरु निघाले.फळांचा मोठा आकार व दर्जा लक्षात घेता दानोळे यांनी सोलापूर येथील एका मॉलशी संपर्क साधला. त्यांना पेरू पसंद पडले. प्रति किलो 125 रूपये असा दर निश्‍चित झाला. आठ दिवसांनी 200 किलोचा दुसरा तोडा केला. तिसऱ्या तोड्याला 400 किलो पेरुची तोडणी केली. आत्तापर्यंत सुमारे सव्वा ते दीड टन पेरु उत्पादन मिळाले आहे. आता प्लॉट जवळपास संपला आहे. सुमारे एक टन पेरूची विक्री मॉलमध्ये तर उर्वरित पेरू पुणे मार्केटला किलोला 60 ते 70 रूपये दराने विकला.

आंतर पिकातून निघाला लागवडीचा खर्च

दानोळे यांना पेरु उत्पादनासाठी सुमारे सव्वा दोन लाख रूपये खर्च आला आहे. नव्या पेरु लागवडी बरोबर त्यांनी भुईमुगाचे आंतरपीक घेतले. 40 क्विंटल ओल्या शेंगांच्या उत्पादनातून सुमारे 50 हजार रुपये मिळाले. त्यानंतर कलिंगडाचे आंतरपीक घेतले. रमजान इद सणाच्या वेळी विकलेल्या या फळापासून सुमारे दीड लाख रुपयांचे तर त्यानंतर वांगी उत्पादनातून 60 हजार रूपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. याप्रमाणे विविध आंतरपिकांमधून पेरू उत्पादन खर्च जवळपास भरून काढला.

शेततळ्याचा उन्हाळ्यात आधार

उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी साधारण 10 लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले आहे. या संरक्षित पाण्याचा उपयोग पाणी टंचाईच्या काळात केला जातो.त्यामुळे पिकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी देता येत असल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची जोखीम कमी असते.

विविध पिके घेण्याकडे कल

दानोळे यांनी ऊस, डाळिंब ,कलिंगड, पेरू या सारख्या विविध पिकांचा अनुभव घेतला आहे. डाळिंबाचे दोन एकरांत सात ते दहा टनांपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे. त्याला किलोला 70 ते 75 रूपये दर मिळाला आहे.

आदर्श गोपालक पुरस्कार

दानोळे यांना शेतीबरोबरच पशुपालनाचीही आवड आहे. दूध उत्पादन आणि आदर्श पशुपालनासाठी त्यांचा जिल्हा परिषदेने आदर्श गोपालक पुरस्कार देवून सन्मान केला आहे. सध्या मात्र तांत्रिक कारणांमुळे जनावरांची संख्या मर्यादित ठेवावी लागली आहे.

 

संपर्क- किरण दानोळ- 9960124226

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate