অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शहरी बाजारपेठेत उमटला वैभवी ब्रॅंड

गुणवत्तापूर्ण उत्पादनातून महिला गटाची प्रगती

काले (ता. कराड, जि. सातारा) येथील वैभवी स्वयंसहायता महिला बचत गटाने आवळा प्रक्रिया उद्योगातून आर्थिक प्रगतीची वाट धरली आहे. दर्जेदार आणि आरोग्यवर्धक उत्पादनांमुळे शहरी बाजारपेठेत वैभवी गटाच्या "ब्रॅंड'ने स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. 

कराडपासून उंडाळे मार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरकडे जाताना काले हे गाव लागते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ याच गावात रोवली. अशा ऐतिहासिक ओळखीबरोबर ऊस आणि भाजीपाला पिकाचे माहेरघर म्हणूनही हे गाव परिसरात ओळखले जाते. या गावात समविचारी महिलांनी एकत्रित येऊन सप्टेंबर, 2009 मध्ये वैभवी स्वयंसहायता महिला बचत गट सुरू केला. सौ. आशा मारुती पाटील (अध्यक्षा), शोभा शिरीषकुमार यादव (सचिव) आणि सदस्या हिरा अशोक यादव, सुनंदा चंद्रकांत साठे, माया सचिन मोहिते, शैला अशोक यादव, नंदा मानसिंग देसाई, सुनंदा गोविंद लांजेकर, शोभा दिनकर हिनुकले, मंगल दिलीप मांगले, नंदा बाळकृष्ण लोहार, भारती प्रदीप डाके, सुरेखा विष्णू गुरव, सुवर्णा पांडूरंग सुपनेकर, माधवी महादेव देसाई या गटात कार्यरत आहेत. या गटाने परिसरातील बाजारपेठेचा अंदाज घेत ऑक्‍टोबर 2012 पासून आवळा कॅंडी, सुपारी, सिरप त्याचबरोबर टोमॅटो, नाचणी, तांदूळ, पालक पापड निर्मितीला सुरवात केली.

प्रशिक्षणातून प्रक्रिया उद्योगाला सुरवात

बाजारपेठेत प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी लक्षात घेऊन गटाने पहिल्यांदा आवळा प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करण्याचे ठरविले. गटाने कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विषयतज्ज्ञ सौ. माधवी गायकवाड यांच्याकडे आवळा प्रक्रियेबाबत पाच दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामधून आवळा कॅंडी, सिरप, सुपारी, लाडू, मूखवास, लोणचे, मोरावळा इत्यादी पदार्थांच्या निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली. परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करून गटाने पहिल्या टप्प्यात आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली.

1) सुरवातीला भांडवली खर्च कमी करण्यासाठी गटातील 15 सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली. रकमेतून पातेली, वजन काटा, पॅकिंग मशीन, कापड, नेट, इत्यादी वस्तू खरेदी केल्या.

2) परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्रतवारी केलेला चांगल्या दर्जाचा आवळा सरासरी 25 रुपये किलो या दराने खरेदी करण्यास सुरवात केली.

3) प्रशिक्षणाचा पुरेपूर वापर करीत पहिल्यांदा 20 किलो आवळा कॅंडी, 30 लिटर सिरप आणि चार किलो सुपारी तयार केली. उत्पादित पदार्थांची विक्री कराड येथील यशवंत कृषी व औद्योगिक प्रदर्शनात करण्यात आली. प्रदर्शन कालावधीत सर्व पदार्थांची विक्री झाली. ग्राहकांची मागणी लक्षात आली. त्यानुसार पुढील नियोजन गटाने केले.

4) गटातील सदस्य सौ. शोभा यादव यांच्या घरचा हॉल पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरला जातो.

5) उद्योगाला खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी गटाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गावातील शाखेकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले आहे. या रकमेतून ब्रीक्‍स मीटर, फॅन, मोठी पातेली, गॅस, शेगडी, इत्यादी वस्तू खरेदी केल्या.

6) सुरवातीला जमिनीवर कापड अंथरून त्यावर आवळा कॅंडी वाळविली जायची, त्यामुळे कॅंडी वाळविण्यास उशीर होत होता. कॅंडीच्या गुणवत्तेवर परिणाम व्हायचा. या अडचणीवर मात करण्यासाठी गटाने घरगुती पद्धतीचा सोलर ड्रायर विकत घेतला, त्यामुळे आवळा कॅंडी वाळविणे सोपे जाऊ लागले. गुणवत्ता चांगली राहू लागली.

7) पावसाळ्यात कॅंडी सुकवण्याची समस्या असते. त्यासाठी पावसाळ्याआधी बाजारपेठेतील मागणीचा विचार करून कॅंडी निर्मिती पूर्ण केली जाते.

8) आवळा प्रक्रिया उत्पादनांची माहिती आसपासच्या भागात झाल्याने ग्राहक जागेवरून उत्पादनांची खरेदी करू लागले.

असा आहे गट

1) गटाची दरमहा दहा तारखेदरम्यान मासिक बैठक. 
2) प्रत्येक सदस्याकडून दरमहा शंभर रुपयांची बचत. 
3) एकत्रित बचतीचा वापर प्रक्रिया उद्योगासाठी. 
4) गटातर्फे आवळा कॅंडी, सुपारी, सिरप निर्मिती. त्याचबरोबर टोमॅटो, नाचणी, तांदूळ, पालकाचे पापड. हंगामी स्वरूपात मागणीनुसार रवा कुरडई निर्मिती.

पापडालाही मागणी

  • आवळा उत्पादनांच्या बरोबरीने गटाने पापड निर्मिती करायचे ठरविले. यासाठी कालवडे कृषी विज्ञान केंद्रातून पापड निर्मितीचे प्रशिक्षण घेतले.
  • बाजारपेठेचा अभ्यास करून टोमॅटो, पालक, नाचणी, तांदळाचे पापड तसेच रवा कुरडई तयार केली जाते.
  • गावातील शेतकऱ्यांकडून पालक, टोमॅटोची खरेदी केली जाते, त्यामुळे उत्पादन खर्चात बचत.
  • भेसळविरहित, रुचकर माल आणि नावीन्यपूर्ण पदार्थांमुळे ग्राहकांकडून वाढती मागणी.

दर्जेदार पॅकिंग

  • पापड, कॅंडी, सुपारी, पापडाची विक्री ही चांगल्या गुणवत्तेच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये पॅकिंगमधून होते.
  • "वैभवी ब्रॅंड'ने उत्पादनाची विक्री. जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करून शासनमान्य नोंदणी क्रमांकही गटाने मिळवला आहे.
  • प्रत्येक पॅकिंगवर लेबल. त्यावर नोंदणी क्रमांक, पॅकिंग दिनांक, वापरावयाचा कालावधी, वजन, किंमत, पत्ता व संपर्क दिलेला असतो.

थेट विक्रीवर भर...

  • प्रक्रिया उत्पादनांची व्यापाऱ्यामार्फत विक्री न करता ग्राहकांना थेट विक्रीचे तंत्र बचत गटाने अवलंबिले.
  • कालवडे कृषी विज्ञान केंद्रातील महिला व शेतकरी मेळावे, चर्चासत्रामध्ये उत्पादनांची विक्री.
  • कराड, उंडाळे आणि नागपूर येथील वसंत कृषी प्रर्दशनामध्ये बचत गटाचा सहभाग.
  • कराड, कासेगाव, वाटेगाव येथील ग्राहक बझारामध्ये थेट विक्रीचे नियोजन, त्यातून नफ्यात वाढ.

वार्षिक उलाढाल

  • दर वर्षी 500 किलो आवळा कॅंडी उत्पादन. त्याबरोबर 200 लिटर सिरप आणि शंभर किलो सुपारी निर्मिती.
  • विक्रीसाठी आवळा कॅंडीचे 50 ग्रॅमपासून 500 ग्रॅमपर्यंत पॅकिंग, सुपारीचे 25 ग्रॅम, 50 ग्रॅम पॅकिंग, सिरपची अर्धा ते एक लिटर कॅनमध्ये विक्री.
  • दर वर्षी 400 किलोपर्यंत पापड निर्मिती. शंभर ग्रॅम वजनाचे पापड पॅकिंग केले जात, तसेच ग्राहकाच्या मागणीनुसारही पापडाचे पॅकिंग करून दिले जाते. यंदा पहिल्यांदाच रवा कुरडई तयार केल्या आहेत.
  • एक किलो आवळा कॅंडी बनविण्यासाठी 180 रुपये खर्च. पॅकिंग, वाहतूक खर्च धरता प्रतिकिलो 240 रुपये किलो या दराने विक्री. सिरपची 70 रुपये प्रति लिटर दराने विक्री.
  • 25 ग्रॅमचा सुपारी पॅक 10 रुपये दराने विक्री.
  • एक किलो पापड निर्मितीसाठी 80 रुपये खर्च. पॅकिंग, वाहतूक खर्च धरता 150 रुपये प्रतिकिलो दराने विक्री.
  • उत्पादनांची वार्षिक उलाढाल एक लाखापर्यंत पोचली.

संपर्क - सौ. शोभा यादव ः 9561174884 
(सचिव, वैभवी स्वयंसहायता महिला बचत गट)

आर्थिक प्रगती झाली...

बाजारपेठेच्या मागणीनुसार प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप यांच्या कडून गटाला मार्गदर्शन मिळते. गटाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन प्रक्रिया उद्योगाला सुरवात झाली. या उद्योगातूनच आमची आर्थिक प्रगती झाली. 
- सौ. आशा पाटील (अध्यक्ष)

प्रशिक्षणातून प्रगती शक्‍य...

महिलांनी प्रशिक्षण घेऊन प्रक्रियाउद्योग सुरू केला तर नक्कीच यश मिळेल. आपल्याबरोबर कुटुंबाचीही प्रगती साधता येईल. कृषी विज्ञान केंद्रातर्फे फळे व भाजीपाला प्रक्रिया, सोयाबीन प्रक्रिया, कुक्कटपालन, शेळीपालन, महिलांसाठी सुधारित शेती अवजारांची ओळख, गांडूळखत निर्मिती अशी व्यावसायिक प्रशिक्षणे देतो. त्याचा परिसरातील शेतकरी महिलांना फायदा होतो. 
- सौ. माधवी गायकवाड, विषयतज्ज्ञ (गृहविज्ञान), 
संपर्क - 9423865495 

(छायाचित्रे - अमोल जाधव आणि कृषी विज्ञान केंद्र, कालवडे )

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate