অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीने दिले आर्थिक स्थैर्य

उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पाचे यश

फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प सातारा, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साकत (ता. जामखेड, जि. नगर) गावातील अशोक मुरूमकर यांच्याकडे आता जातिवंत उस्मानाबादी शेळ्यांचा कळप तयार झाला आहे. करडांच्या विक्रीतून त्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ लागली आहे.
नगर, बीड जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील गावांच्या परिसरातील शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून. मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे येथील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाचे साधन हाताशी असावे म्हणून येथील शेतकरी किमान चार ते पाच उस्मानाबादी शेळ्या सांभाळत आहेत. अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत साकत (ता. जामखेड, जि. नगर) येथील शेतकरी अशोक मुरूमकर. साकत गावामध्ये फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या (नारी), पशुसंवर्धन विभागामार्फत भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प ऑगस्ट 2011 पासून राबविला जात आहे. उस्मानाबादी शेळ्यांच्या गुणवत्तेमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन अशोक मुरूमकर या प्रकल्पात सामील झाले.
शेळीपालनाबाबत मुरूमकर म्हणाले, की माझी दोन कोरडवाहू शेती. पावसावर केवळ ज्वारी पिकते. परंतु अपुऱ्या पावसामुळे शेतीतून किफायतशीर उत्पन्न मिळेनासे झाले. त्यामुळे मी कमी व्यवस्थापन खर्च असणारा शेळीपालन हा व्यवसाय गेल्या पाच वर्षांपासून करीत आहे. शेळीपालनाला सुरवात करताना गावातूनच दोन उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. हळूहळू शेळ्या आणि करडांची संख्या वाढत होती. गावातच उपलब्ध असलेल्या बोकडाकडून शेळ्यांचे रेतन करीत होतो. मात्र त्यामुळे कमी वजनाची करडे जन्माला यायची होती. तांबडी, काळी व लालसर रंगाची पिल्ले जन्माला यायची. त्यांची वजने कमी असायची. अशी पिल्ले आजारपणात लगेच मरायची. त्यामुळे काहीवेळा उपचाराचा खर्चही वाढायचा. करडांची विक्री करताना त्यांचे नेमके वजन माहीत नसल्यामुळे खरेदी करणारे व्यापारी अगदी कमी भावाने करडे खरेदी करायचे. त्यामुळे म्हणावा तसा नफा मला शेळीपालनामधून मिळत नव्हता. याचदरम्यान 2011 मध्ये "नारी' संस्थेतर्फे आमच्या गावात शेळी सुधार प्रकल्पाला सुरवात झाली. नारी संस्थेचे विस्तार अधिकारी के. एन. चव्हाण आणि प्रकल्प कार्यकर्त्या सुरेखा मुरूमकर यांनी शेतकऱ्यांना शेळीपालनात होणाऱ्या चुका सांगितल्या. याचबरोबरीने चांगल्या वंशावळीच्या शेळ्या आणि बोकड पालनातून या व्यवसायातला नफा वाढविता येणे शक्‍य आहे हे समजावून सांगितले.

सुरू झाले सुधारित पद्धतीने शेळीपालन

"नारी'च्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून श्री. मुरूमकर उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पात सहभागी झाले. तज्ज्ञांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर मुरूमकर यांनी कळपातील बारकाळ, दुधाला कमी असणाऱ्या, लवकर गाभ न जाणाऱ्या शेळ्या विकल्या. नेहमी जुळी पिल्ले देणाऱ्या, दुधाला चांगल्या, लवकर गाभ जाणाऱ्या आणि शरीरयष्टीने चांगल्या शेळ्या कळपात ठेवल्या. याच दरम्यान या प्रकल्पांतर्गत उच्च गुणवत्तेचे म्हणजेच ज्या नरांचा वाढीचा दर लहान वयात चांगला होता आणि ज्याच्या आईने दिवसाला दीड ते दोन लिटरपेक्षा जास्त दूध दिले असे पैदाशीचे तीन उस्मानाबादी नर गावातील शेळी कळपांसाठी देण्यात आले. मुरूमकर यांनादेखील पैदाशीचा नर (टॅग क्रमांक - 15895) देण्यात आला. जातिवंत नर कळपात आल्याने शेळ्यांच्या रेतनातून चांगल्या वजनाची करडे जन्मू लागली. मुरूमकर शेळ्यांना दिवसभर गावपरिसरात चरायला नेतात. हिरवे गवत उपलब्ध झाले तर संध्याकाळी शेळ्यांना दिले जाते. आवश्‍यकतेप्रमाणे करडे व शेळ्यांना खुराक (शेंगदाणा पेंड/मका पेंड/ गहू) सुरू केला. शेळ्यांना विण्यापूर्वी एक महिना आणि व्यायल्यानंतर 20 दिवस खुराक दिला जातो. याचबरोबरीने करडे खायला लागल्यापासून अडीच ते तीन महिन्यांपर्यंत खुराक दिला जातो. सरासरी व्यायलेल्या शेळ्यांना दररोज 200 ग्रॅम आणि पिल्लांना 100 ग्रॅम खुराक दिला जातो. शेतकरी स्वतः खुराकाचा खर्च करतात. शेळ्यांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि थंडीच्यापूर्वी लसीकरण केले जाते. लेंडी तपासूनच जंत निर्मूलन केले जाते. कळपातील जातिवंत नर, शेळ्यांचे योग्य पोषण आणि व्यवस्थापनामुळे जन्मणारी करडे पूर्ण काळी आणि चांगल्या वजनाची जन्मू लागली आहेत. वेळेत लसीकरण केल्यामुळे ही करडे आता आजारी पडत नाहीत. मरतुकीचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. सध्या मुरूमकर यांच्याकडे सात शेळ्या, एक नर आणि नऊ करडे आहेत. त्यातील काही शेळ्या प्रति दिन दीड लिटर दूध देतात.
प्रकल्प सुरू होण्याअगोदर सहा महिने वय आणि 20 ते 22 किलो वजनाचे करडू सरासरी 2000 रुपयांना विकले जायचे. परंतु प्रकल्पाच्या माध्यमातून वजनानुसार करडांची विक्री केल्यावर काय फायदे होतात हे मुरूमकरांना समजले. त्यामुळे आता करडांची विक्री ही वजनावर केली जाते. त्यामुळे 20 ते 22 किलो वजनाचे करडू आता सरासरी चार हजार रुपयांना विकले जाते. जामखेड आणि पाटोदा येथील व्यापारी गावात येऊन करडांची खरेदी करू लागले आहेत.

...असा झाला आर्थिक नफा

प्रकल्पात सहभागी होण्यापूर्वी मुरूमकर यांच्याकडे एकूण नऊ शेळ्या होत्या. या शेळ्यांपासून वर्षाला 13 करडे मिळायची. साधारणपणे 1500 रुपये प्रति करडू याप्रमाणे 19,500 रुपये मिळायचे. यातून उपचार आणि व्यवस्थापनाचा खर्च वजा करता 16,000 रुपये शिल्लक राहायचे. परंतु प्रकल्पात सामील झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत (20/7/2011 ते 23/7/2012) मुरूमकर यांच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून आली.
1) कळपातील एकूण प्रौढ शेळ्या - आठ (यातील दोन शेळ्या एका वर्षात दोनदा (जानेवारी, जुलै) व्यायल्या.) 
2) एकूण करडे - 18 
3) विक्री झालेली करडे (सात नर आणि 11 माद्या) - सर्व करडे विकली. 
4) करडे विक्रीतून उत्पन्न - 57,500 (एक करडू 3,194 रुपये) 
5) व्यवस्थापन आणि खाद्य खर्च - 4400 रुपये 
6) निव्वळ नफा - 53,100 (एका शेळीमागे वर्षाला 6,638 रुपये नफा)
ही आकडेवारी पाहता वर्षभराचा विचार केल्यास मुरूमकर यांना दिवसाची 146 रुपये अशी मजुरी शेळीपालनातून मिळाली. सध्या साकत परिसरात पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांकडेही नियमित शेतीकाम मिळत नाही. अशा परिस्थितीत शेळीपालनातून मिळणारे उत्पन्न आणि काही अंशी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुरूमकर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे. सध्या मटणाच्या दरात झालेल्या वाढीमुळे नफ्यातही वाढ होत आहे.

उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पाचे फायदे

  • साकत गावात सध्या 44 शेतकऱ्यांकडे 275 उस्मानाबादी शेळ्या, तीन नर आणि 450 कोकरे.
  • दर महिन्याला गावात प्रशिक्षण कार्यक्रमातून शेळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन.
  • शिफारशीनुसार लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाचे नियोजन.
  • गावातील सर्व गोठ्यांत एकाच दिवशी गोचीड निर्मूलन मोहीम.
  • शेळ्यांच्या दूध नोंदी घेऊन चांगले दूध देणाऱ्या माद्या आणि त्यांना होणाऱ्या करडांचे पैदाशीसाठी संवर्धन.
  • शेतकऱ्यांकडे दोन वर्षांमध्ये तीन वेत देणाऱ्या आणि जुळी करडे देणाऱ्या शेळ्यांची चांगली पैदास.
  • वजनावर करडांची विक्री. त्यामुळे नफा वाढला.

शेळ्यांतील आनुवंशिक सुधारणा महत्त्वाची

"अखिल भारतीय समन्वित उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पा'त सहभागी शेळीपालकांच्या करडांचा जन्म, वजने, मृत्यू, वयोगटानुसार वजने, शेळ्यांनी दिलेले दूध, करडांची विक्री इ. महत्त्वाच्या नोंदी घेतल्या जातात. आनुवंशिक गुणवत्तेची नर करडे निवडण्यासाठी या नोंदीचा उपयोग होतो. चांगली पैदास तयार व्हावी या हेतूने आनुवंशिकदृष्ट्या उच्च प्रतीचे उस्मानाबादी नर शेतकऱ्यांना पुरविले आहेत. शेळ्या व करडांच्या कानात बिल्ले मारून वैयक्तिक नोंदी घेतल्या जातात. कळपातील आजारी शेळ्यांवर तातडीने उपचार केले जातात. आता चांगल्या आनुवंशिक गुणवत्तेच्या शेळ्या, करडे जन्माला येत आहेत. शेतकऱ्यांचा या प्रकल्पात चांगला सहभाग आहे. 
- डॉ. चंदा निंबकर, 
संचालिका, 
पशुसंवर्धन विभाग, निंबकर कृषी संशोधन संस्था 

संपर्क - 
1) के. एन. चव्हाण - 9970330297 
2) सुरेखा मुरूमकर - 9764208862

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate