उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाड़ी या छोट्याच्या गावातील कमल कुंभार याना राष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठ महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर झाला असून आज 27 एप्रिल रोजी राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यासाठी देशभरातून 3 महिलांची निवड करण्यात आली असून श्रीमती कुंभार या महाराष्ट्रातील एकमेव महिला उद्योजक आहेत. दुष्काळ असतानाही त्यांनी कडकनाथ कोंबडी या कुक्कटपालन प्रकल्पाच्या माध्यमातून 3 हजार गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना देखील स्वतःची शेतजमीन नसताना कमल कुंभार यांनी 5 एकर जमीन भाड्याने घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरु केला. कमल यांच्याकडे स्वतःची एक गुंठाही शेतजमीन नाही मात्र काही तरी करून दाखवयाची जिद्द मनात ठेऊन त्यांनी सर्व परिस्थितीवर व संकटावर मात केली. कमल व त्यांचे पती विष्णू यांनी गावातील 5 एकर शेती वर्षाला 50 हजार रुपये प्रमाणे 10 वर्षासाठी भाड्याने घेतली व कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. कमल यांनी गावातील महिलांना एकत्र करून तनिष्क बचत गटाच्या नावाने कमल पोल्ट्री सुरु केली यात त्यांनी अंडी उबवणी केंद्र, मत्स्यबीज उत्पादन केंद्र, उस्मानाबादी शेळी पालन व प्रशिक्षण केंद्र सुरु केले.
कमल कुंभार यांनी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाच्या मदतीने बचत गटाच्या माध्यमातून सुरुवातीला छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये कोंबडी पालन सुरु केले. मध्यप्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळणारी नखशिकांत काळी असलेल्या कडकनाथ कोंबडीची वाढती मागणी व मार्केटींगचे महत्त्व ओळखून कुंभार यांनी कडकनाथ कोंबडी पालनात उडी घेतली.
कडकनाथ कोंबडीचा रंग, पंख, मांस व रक्तही काळे असल्याने हिला आयुर्वेदिक महत्त्व असल्याने मोठी मागणी आहे. या कोंबडीचे एक अंडे 50 रुपयाला तर मांस दीड हजार रुपये किलो दराने विकले जाते. कमल कुंभार यांच्याकडे सध्या एक हजार कडकनाथ कोंबड्या असून यातून अंडे व मांस यातुन त्यांना दर महिन्याला दीड लाख रुपयांच्यावर उत्पन्न मिळते. कमल यांनी हा कोंबडी व व्यवसाय उस्मानाबाद जिल्ह्यात रुजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यांनी अनेक महिला बचत गटांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी प्रेरित करून रोजगार देत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. घराशेजारील परसबागेत कुक्कुटपालन केल्याने महिलांना आता घरबसल्या पैसे मिळू लागले आहेत.
कुंभार यांनी कुक्कुटपालनाबरोबरच शेळीपालन, अश्व पालन, ससा पालन करून लाखो रुपये कमवून शेतीला नवीन पर्याय उपलब्ध करुन देऊन आदर्श घालून दिला आहे. शेती नसतानाही हे मिळवलेले यश मोठे असून ग्रामीण भागात भाड्याने शेती घेण्याची संकल्पना तशी नवीन असताना त्यांनी आव्हान स्वीकारत यश मिळवले. त्यांच्या या कामाची दखल दिल्ली येथील CII (Confederation Of Indian Industry) ने घेतली असून देशातील 3 महिलांची निवड श्रेष्ठ महिला उद्योजिका म्हणून केली आहे यात तेलंगानाच्या जयम्मा भंडारी, पश्चिम बंगालच्या मनिका मुजुमदार यांचा समावेश आहे. शेतीत पूरक व जोड धंद्यातून विकास साधता येतो हे आर्थिक गणित ओळखून कमल कुंभार यांनी शेळीपालन सोबत घोडा पालन सुरु केले. लग्न व इतर कार्यात याला चांगली मागणी असल्याने वर्षाकाठी 2 लाख रुपये घरबसल्या मिळतात.
कुंभार यांनी त्यांच्या शेतात शेततळ, ऍझोला चारा उत्पादनासह इतर उपक्रम राबविल्याने त्यांचा खर्च कमी होत असून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत आहे. सध्या त्यांनी ससा पालन सुरु केले असून त्याचा सांभाळ हे कुटुंब लहान लेकराप्रमाणे करीत आहेत.
पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा असताना विष्णू कुंभार यांनी हा सर्व व्यवसाय व त्याचे मार्केटिंग करण्याची जबाबदारी आपली पत्नी कमल यांच्यावर टाकून वेगळा पायंडा निर्माण करून दिला आहे. महिलांवर असलेला अपयशाचा ठपका पुसण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे विष्णू सांगतात.
तर विष्णू यांनी टाकलेला विश्वास कमल यांनी सार्थ करून दाखवला आहे. कमल या शेतातील कामासोबत घर गाड्यापासून घोडा व गाडी सुद्धा स्वतः चालवतात. घोडस्वारी करताना त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंच होतात. या दांपत्याने एकमेकांना दिलेली साथ हे यांच्या यशाचा गाभा असून समाजाला एक आदर्श आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हा पुरस्कार भूषणावह असून यातून इतर महिलांना प्रेरणा मिळेल. कुक्कुटपालन व्यवसाय वृद्धीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
लेखक - मोतीचंद बेदमुथा,
जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र टाइम्स
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/31/2023
श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी र...
नोकरीउत्सुक उमेदवारांना नाव नोंदणी, नोंदणीचे अद्य...
पारंपरिक शिक्षण घेऊन नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ज्या...
नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गो...