অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कणेरीची सिद्धगिरी गोशाळा

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठ कृषी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ग्रामीण संस्कृतीची सर्वांगीण प्रचिती देणारे येथील सिद्धगिरी म्युझियम पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. धार्मिक क्षेत्रात सक्रिय राहण्याबरोबरच या मठाने सेंद्रिय शेतीही केली आहे. त्या अनुषंगाने विविध जातींच्या देशी गाईंचे जतन करण्याच्या उद्देशाने मठाने पंधरा वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली. आज तेथे सुमारे तीनशे ते साडेतीनशे देशी गाईंचे संगोपन केले जात आहे. मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर यांच्या प्रयत्नातून गोशाळा उभी राहिली. केवळ मठाधिपती म्हणवून न घेता आदर्श व्यवस्थापक म्हणून त्यांचे कार्य सुरू आहे. विज्ञानाची कास धरलेले आधुनिक संत अशीच त्यांची या भागात प्रतिमा आहे. तीनशे देशी गाईंनी सज्ज गोठा -गोशाळेत सुमारे तीनशे ते साडेतीनशे गाई
या जातींचे संवर्धन 
-गुजरातची गीर, म्हैसूर खिलार, पाकिस्तान सीमेवरील साहिवाल, कोकणातील कॉंक्रिज, बंगळूरची थारपारकर, दक्षिण महाराष्ट्रातील खडकी खिलार, कर्नाटकातील हळ्ळीकार व अमृतमहल, काजळी खिलार, देवणी, कोशी खिल्लार 
-प्रत्येक जातीसाठी वेगळा गोठा 
-कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मिळ देशी गाईंचे संवर्धन व्हावे या दृष्टीनेच गोशाळेची उभारणी 
-ज्या शेतकऱ्यांना आपल्या गाईंचे व्यवस्थापन करणे अशक्‍य होते, ते शेतकरी या गोशाळेत गाई आणून सोडतात. दुष्काळी भागातूनही, तसेच कसायांकडे जाणाऱ्या गाईही इथे आणल्या गेल्या आहेत.

जनावरे आणताना मोठे कष्ट

गेल्या काही वर्षांपासून संकरित गाईंचे पालन किंवा त्यांची संख्या वाढत आहे. यामुळे देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे विविध जातीच्या देशी गाई मिळविण्यासाठी मठाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. दुष्काळी भागात जायचे, तेथे जनावरे पाहायची व तेथील देशी जनावरे घेऊन यायची असा उपक्रम त्यांनी राबविला. केवळ त्यांचे पालनपोषण व संवर्धन हाच हेतू ठेवून त्या नेल्या जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गाई मठाला तशाच दिल्या. गाईची जात व इतर वैशिष्ट्ये पाहूनच ती गोठ्यात आणण्याचा उपक्रम आजतागायत सुरू आहे. येथे आणलेली गाय विकली जात नाही.

गोठ्याची रचना

गोशाळेच्या सुमारे चार एकर क्षेत्रात जनावरांचा गोठा आहे. यामध्ये मध्यभागी शेड आहे. पाणी, चाऱ्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. एके ठिकाणी जनावरांना पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी बंदिस्त गोठा आहे. तर इतर ठिकाणी मुक्त पद्धतीने जनावरे सोडली जातात.

जनावरांचे व्यवस्थापन

जनावरांच्या खाद्यासाठी ऍझोला खाद्याचा वापर केला जातो. गोठ्याच्या शेजारीच ऍझोला निर्मितीसाठी ऐंशी वाफे तयार करण्यात आले आहेत. प्रति जनावराला अर्धा ते एक किलो ऍझोला घातला जातो. या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. त्याचा जनावरांच्या वाढीसाठी फायदा होतो. यामुळे दुधात अर्धा ते एक लिटर वाढ होते. जनावरांच्या प्रतिकारशक्तीतही चांगली वाढ होते. याशिवाय मका, बाजरी आदी धान्य भरडूनही दिले जाते. पेंडीचा वापरही केला जातो. जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण व अन्य सेवेसाठी कायमस्वरूपी तज्ज्ञाची नियुक्ती केली आहे. प्रति जनावराला दिवसाला वीस किलो ओला व सुका चारा दिला जातो. दिवसा वीस लिटर पाणी दिले जाते.

सेंद्रिय दूध, तूप, ताक

गोशाळेत दररोज शंभर लिटर दुधाचे संकलन होते. यात खिलार गाय सरासरी चार लिटर, गीर दहा लिटर, साहिवाल दहा लिटर, कॉंक्रिज पाच लिटर, तर खडकी खिलार तीन ते पाच लिटर दूध देते. दूध काढणे व इतर व्यवस्थापनासाठी पंधरा मजूर काम करतात. पन्नास रुपये प्रति लिटर हा दुधाचा दर आहे. मात्र सध्या दूध फारसे विकले जात नाही. त्याचा तूपनिर्मितीसाठी उपयोग होतो. 
येणाऱ्या पर्यटकांना दहा रुपये ग्लास या दराने ताक विकले जाते.
पंधराशे रुपये प्रति किलो रुपये दराने तूप विकले जाते. ते सेंद्रिय असल्याने त्याला चांगली मागणी आहे. यातून मिळणारे उत्पन्न गोठ्याच्या देखभालीसाठीच वापरले जाते. मठाचा लोकसंपर्क जास्त असल्याने तूप, दुधाची विक्री सहजतेने होते. याशिवाय पंचगव्यापासून (गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप) विविध उपपदार्थ तयार करण्यात येतात. तेल, साबण, धूप, गोमूत्र अर्क आदी उपपदार्थ निर्मितीही नुकतीच सुरू केली आहे. त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे.
मठाची सुमारे शंभर एकर सेंद्रिय शेती आहे. यात ऊस, चारा पीक, आंबा, भात, भुईमूग आदी पिके आहेत. आता मकाही घेतला आहे. गोठ्यात तयार होणारे शेण, मलमूत्र मठाच्या सेंद्रिय शेतीत वापरले जाते. यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होते. गोठ्याची स्वच्छता केलेले पाणीही थेट शेतीलाच दिले जाते. 
देशी गाईंची पैदास वाढविण्यासाठी वळू आणण्यात आले आहेत. सुमारे नऊ जातींसाठी नऊ वळू येथे पाहण्यास मिळतात.

गोबरगॅस प्रकल्पातून इंधननिर्मिती

गोठ्याच्या ठिकाणीच गोबरगॅसचा प्रकल्प आहे. दररोज तीस अश्‍वशक्ती ऊर्जा तयार होते. दिवसाला पाच ते सहा तास त्याचा वापर केला जातो. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ, गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो.

कणेरी मठाकडून शिकण्यासारखे...

  • गाईंची जोपासना केल्यास जमिनीचे व मानवी आरोग्य सुधारते. यामुळे त्यांचे जतन करून जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न
  • कोणत्याही देशी गाईचा संगोपनासाठी स्वीकार
  • गोठ्यातून देशी गाय विकली जात नाही
  • देशभरातील दुर्मिळ जातीच्या देशी गाईंचा गोठ्यात संग्रह
  • ऍझोलासारख्या खाद्याचा मोठ्या प्रमाणात वापर
  • गोठ्यातून तयार झालेल्या सर्व शेणखताचा मठाच्या शेतीसाठी उपयोग
देशी गाईंचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना व ग्राहकांना रासायनिक अवशेषरहित अन्न या घटकांसाठी आम्ही गोशाळेचा उपक्रम सुरू केला आहे. आम्ही ज्या शंभर गावांना भेटी देणार आहोत, तेथील गरजू शेतकऱ्यांना आमच्याकडील देशी गाय देणार आहोत. तसेच जे शेतकरी आपली गाय आम्हाला देतील तिचे संवर्धनही आम्ही करणार आहोत. 
श्री काडसिद्धेश्‍वर मठाचे मठाधिपती
मठाच्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवला जातो. त्याचा सेंद्रिय रसही पर्यटकांना उपलब्ध करून दिला जातो. रसासाठी अत्याधुनिक यंत्र आणले आहे. त्याचबरोबर आधुनिक गुऱ्हाळघर बांधून सेंद्रिय गूळ तयार केला जातो. तो 70 रुपये किलोने विकला जातो. 

संपर्क - दत्तात्रय पाटील 
व्यवस्थापक, सिद्धगिरी गोशाळा 
9421108912

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate