অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबडीपालन - महिला स्वावलंबी

शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. मात्र त्या लाभार्थींपर्यंत व्यवस्थित पोचल्या आणि लाभार्थींनीही योग्य नियोजनातून राबवल्या तर त्या यशस्वी होऊ शकतात. कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ब्राम्हणवाडी येथे देशी कोंबडीपालनाचा प्रकल्प महिला शेतकऱ्यांसाठी राबवला जात आहे. त्यातून त्या आर्थिक स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
सातारा जिल्ह्यात ब्राम्हणवाडी हे सुमारे 600 लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. गावात भाग्यश्री महिला बचत गट कार्यरत आहे. गटामध्ये 25 महिला आहेत. त्या पूर्णवेळ घरची शेतीच करतात. त्यांना शेतीला जोड म्हणून एखादा रोजगार देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करता येईल, या हेतूने कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाने कुक्कुटपालनाचा मार्ग दाखवला. कृषी सहायक रोहिणी जोशी यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. परसबागेतील देशी कोंबडीपालनावर या कार्यक्रमात भर होता. सप्टेंबर 2013 च्या सुमारास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली.

प्रशिक्षण व प्रात्याक्षिकावर भर

अपुऱ्या महितीमुळे अनेक योजना तोट्यात जाऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन बचत गटातील महिलांसाठी गोंदवले (जि. सातारा) येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडीपालन प्रकल्पाच्या ठिकाणी एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल राखणे, प्रथमोपचार आदींबाबत सविस्तर व उपयुक्‍त मार्गदर्शन करण्यात आले.

पिले व खाद्याचे वाटप

प्रशिक्षण दिल्यानंतर 25 महिलांना प्रात्यक्षिक स्वरूपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची प्रत्येकी 50 पिले मोफत देण्यात आली. जनावरांपासून पिलांना असलेला धोका विचारात घेऊन संरक्षणासाठी लोखंडी खुराड्यांची गरज असल्याचे लक्षात आले. गावातीलच एका कुशल कारागिराने तुलनेने कमी खर्चातील खुराडे तयार करण्याची तयारी दर्शवली. पाच बाय अडीच बाय साडेतीन फूट क्षेत्रफळाचे खुराडे प्रत्येकी 2800 रुपयांत तयार झाले.
आत्मा प्रकल्पात काही खर्च हा शेतकऱ्यांनी करावयाचा असतो. त्या दृष्टीने खुराड्यांचा खर्च गटातील महिलांनी केला. प्रत्येक लाभार्थी महिलेस 25 किलो पिलांचे खाद्यही देण्यात आले. खाद्य विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी ते तयार करता यावे यासाठी मका, गहू, ज्वारी, बाजरी आदी धान्याचा उपयोग करून घेण्याबाबत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी रूपाली अभंग यांनी मार्गदर्शन केले.
महिलांनी पिलांचे संगोपन काळजीपूर्वक केल्याने पिलांच्या मरतुकीचे प्रमाण कमी राहिले. सुरवातीचे पक्ष्यांचे लसीकरणही कार्यक्रमांतर्गत मोफतच करून देण्यात आले. प्रकल्पास कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी सातत्याने भेटी देऊन महिलांचा उत्साह वाढवला.

महिलांना मिळू लागला रोजगार

कार्यक्रम राबवण्यामागे केवळ अर्थार्जन हा उद्देश नव्हता. त्याचे तीन उद्देश होते. एक म्हणजे महिलांना अर्थप्राप्ती व्हावी, त्यांच्या घरच्या सदस्यांना अंड्यांच्या माध्यमातून पौष्टिक आहार मिळावा व तिसरा म्हणजे कोंबडी खत उपलब्ध व्हावे. प्रकल्पात काही महिलांनी बंदिस्त, तर काहींनी खुल्या पद्धतीने कोंबडी संगोपन केले आहे.
प्रकल्पात लाभार्थी प्रशिक्षण या बाबीवर 10 हजार रुपये व दोन आठवडे वयाची 50 पिले व 25 किलो खाद्य या बाबीवर 54 हजार 375 असा एकूण 64 हजार 375 रुपये खर्च झाला. प्रति महिलेकडील 50 पिलांपैकी अंडी देणाऱ्या कोंबड्यांची संख्या साधारणपणे 40 आहे. दिवसाकाठी सात ते आठ अंडी उत्पादन मिळते. प्रति अंड्यास साडेतीन ते साडेचार रुपये दर मिळत आहे. सरासरी साडेचार रुपये दर धरला तर दिवसाकाठी 45 ते 50 रुपये मिळत आहेत. 10 कोंबडे मिळाले असून, प्रति कोंबडा 350 ते 400 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

विक्री व्यवस्था

ब्राम्हणवाडी हे छोटेसे गाव असल्यामुळे अंड्यांच्या विक्रीचा प्रश्‍न होता. अंडी शिल्लक राहण्याची स्थिती निर्माण होऊ लागली. अंडी रोजच्या रोज विकली जावीत, तसेच चांगला दर मिळावा यासाठी गावातील उमेश लवळे या युवकास अंडी विक्री व्यवसायाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यामार्फत उपक्रमात उत्पादित सर्व अंडी संकलित होऊन ती सातारा व परिसरातील खेड्यांत विकली जातात. देशी कोंबड्यांची अंडी असल्यामुळे त्यांना मागणी चांगली आहे. आर्थिक बचत व्हावी या दृष्टीने गटातील प्रत्येक महिलेचे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत खाते उघडण्यात आले आहे.
कोंबडीपालन कार्यक्रम राबविला जात असल्याने एका स्थानिक संस्थेतर्फे भाग्यश्री महिला बचत गटास विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, तसेच अन्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन प्रकल्पाला मिळाले आहे.
आमच्या गटातील 25 महिला कुक्‍कुटपालन प्रकल्पात सहभागी झाल्या आहेत. घरातील, तसेच शेतातील कामे सांभाळूनही कोंबडीपालन करता येत आहे. कुटुंबास आर्थिक हातभार लावणे शक्‍य होत आहे. 
माया कदम, अध्यक्ष, भाग्यश्री महिला बचत गट, रा. ब्राम्हणवाडी.
देशी कोंबड्यांचे संगोपन आम्ही यापूर्वीही करीत होतो. मात्र ते अगदी थोड्या प्रमाणात केले जात होते. या प्रकल्पात प्रशिक्षण व मदत उपयोगाची ठरली आहे. पक्ष्यांचे आजार, लसीकरण याविषयी माहिती मिळाल्यामुळे पिलांची मरतूक कमी करता आली. 
आशा संजय सावंत, "भाग्यश्री' गट सदस्य
शेतीस पूरक व्यवसाय म्हणून देशी कोंबडीपालन आमच्यासाठी उपयोगी ठरत आहे. घरच्या घरी किंवा टाकाऊ पदार्थांपासून खाद्य तयार केले जात आहे. कोंबड्‌यांच्या विक्रीतूनही फायदा होत आहे. 
लक्ष्मी रामचंद्र घोरपडे, सदस्य.
प्रत्येक दिवसात आठ ते 10 अंडी या कुक्‍कुटपालनातून मिळू लागल्या आहेत. त्यातून घरातील किरकोळ खर्च भागवणे शक्‍य होत आहे. भविष्यात देशी कोंबडीपालन वाढवणार आहे. 
कविता बाळकृष्ण कदम, सदस्य.

माया कदम-7038814036. 
अध्यक्ष, भाग्यश्री महिला बचत गट 
- रोहिणी जोशी - 9423968615. 
कृषी सहायक

लेखक : विकास जाधव

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate