অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बंदिस्त शेळीपालन यशस्वी

बंदिस्त शेळीपालन यशस्वी

प्रस्तावना

शेळीपालनात शेळ्यांची संख्या किती त्यापेक्षाही आहार, संगोपनाद्वारा त्यांचे वजन किती वाढवले, हे महत्त्वाचे असते. किती देऊन, किती मिळवले याचे अर्थशास्त्र ज्याला जमले त्याला शेळीपालन व्यवसायातील इंगीत कळले. सातारा जिल्ह्यातील कवठे येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी हीच संकल्पना प्रमाण मानून सुयोग्य व शास्त्रीय व्यवस्थापनातून बंदिस्त शेळीपालन व्यवसाय केला. आज त्यांची या व्यवसायात चांगली ओळख तयार झाली आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यात कवठे गाव (ता. वाई) लागते. गावाची ओळख सांगायची तर तीन पिढ्यांपासून येथील उत्पादित पेढ्यांचे गोडवे महाराष्ट्र व त्याबाहेर पसरले आहेत. दुसरी ओळख म्हणजे देशभक्त किसन वीर यांचे हे जन्मगाव. आणि तिसरी ओळख म्हणजे 26-11 च्या मुंबईत अतिरेक्‍यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या अंबादास पवार यांचे गाव. ऊस, आले व हळद ही गावची प्रमुख पिके. याच गावच्या आधिपत्याखाली जवळच 50 उंबऱ्यांची विठ्ठलवाडी आहे. तेथील पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी पारंपरिक शेती पद्धतीला बगल देऊन शेळीपालन व्यवसाय सुरू केला. 

बी.एस्सी. ऍग्री, त्यानंतर कृषी व्यवस्थापनातील एमबीए पदवी त्यांनी बंगळूर येथील संस्थेतून मिळवली. संस्थेतील "कॅम्पस इंटरव्ह्यू'च्या माध्यमातून भारतातील एका कंपनीत सांगली येथे मार्केटिंग विभागात काही काळ नोकरी केली. खरे तर उच्च शिक्षणाची पदवी हाती असल्याने चांगल्या पगाराच्या नोकरीत रमणे पृथ्वीराज यांना शक्‍य होते. घरच्यांचाही मुलाने नोकरी करावी असाच आग्रह होता. परंतु पृथ्वीराज यांनी वर्षभरात नोकरी सोडली. घरची शेती व त्याची आवड असल्याने फेब्रुवारी 2012 मध्ये शेतीपूरक बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला. 
त्यांच्या जिद्दी स्वभावापुढे घरच्यांना पाठबळ देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. व्यवसायाच्या सुरवातीला बंदिस्त शेळीपालन अडचणीत येऊ शकते, याबाबत अनेकांनी त्यांच्यापुढे शंका निर्माण केल्या. परंतु पृथ्वीराज यांनी आपले काम निमूटपणे चालू ठेवले.

पृथ्वीराज यांच्या शेळीपावन व्यवसायातील टप्पे

1) ज्याप्रमाणे पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना ठराविक कालावधीत दिले जाणारे खाद्य, त्यानुसार वाढणारे त्यांचे वजन यांचे गणित केले जाते. तसा विचार पारंपरिक शेळीपालनात फारसा होत नसल्याचे पृथ्वीराज यांना जाणवले. आपण शेळ्यांचे संगोपन कसे करतो, त्या बदल्यात "आऊटपुट' काय घेतो, याचा विचार त्यांनी केला. त्या दृष्टीने करावयाच्या बाबी प्राधान्याने अंगीकारल्या. 

2)आफ्रिकन बोअर जातीचा छोटा नर व स्थानिक जातीच्या पाच शेळ्या विकत घेऊन व्यवसायाला सुरवात केली. 
सुरवातीला नोकरीच्या उत्पन्नातील काही वाटा गुंतवला. टप्प्याटप्प्याने स्थानिक पतपेढीतून अर्थसाह्य घेतले. आता विक्री व मिळणाऱ्या उत्पन्नानुसार नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे. सुरवातीला कळपांची संख्या मर्यादित ठेवली. अनुभव वाढत गेल्यानंतर शेळ्यांची संख्या वाढवली. 

3) मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून तीन दिवसांचे शेळीपालन प्रशिक्षण घेतले. राज्यातील, परराज्यांतील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यातून शेड व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे समजले. अन्य प्रकल्पांत जाणवणाऱ्या त्रुटी आपल्या प्रकल्पामध्ये कमी केल्या. उदाहरण सांगायचे तर बऱ्याचदा बंदिस्त पद्धतीत शेळ्यांना 24 तास एकाच जागेवर ठेवले जाते. परिणामी, सातत्याने गोठा ओला व दुर्गंधीयुक्त राहतो. असे वातावरण गोचीड, पिसवांसारख्या बाह्यपरोपजीवींसाठी पोषक असते. पृथ्वीराज यांच्या प्रकल्पात खाद्याची जागा व मुक्कामाची जागा वेगवेगळी असल्यामुळे शेड स्वच्छ व कोरडी राहते. यामुळे रोगराईचे प्रमाण अत्यल्प आहे.

पृथ्वीराज याचा शेळीपालन व्यवसाय दृष्टिक्षेपात

उद्दिष्ट- - जातिवंत नर-मादी यांची विक्री

 • बकरी ईदसाठी जातिवंत व धष्टपुष्ट नर तयार करणे.
 • आफ्रिकन बोअर, स्थानिक व सिरोही (राजस्थान) या जातींचे पालन.-विठ्ठलवाडी (कवठे) परिसर महाबळेश्‍वर व पाचगणीच्या पायथ्याशी असल्याने भौगोलिक दृष्टीने पर्जन्यछायेचा आहे. या टापूतील शेळ्यांमध्ये येथील हवामानाशी जुळवून घेण्याचे गुणधर्म विकसित झाले आहेत. परिणामी, तीनही ऋतूंत तग धरणाऱ्या स्थानिक जाती निवडून वाढवल्या.
 • वजनवाढीचा वेग स्थानिक जातींमध्ये अत्यल्प असतो. परिणामी, व्यवसायातील अर्थशास्त्र कोलमडू शकते. त्यामुळे आफ्रिकन बोअर जातीच्या नरासोबत "क्रॉस' (संकर) केल्यास त्या शेळ्यांपासून 40 ते 45 किलोचे नर मिळू शकतात. त्यामुळे अर्थशास्त्राची घडी बसू शकते, हे ओळखून बोअर जातीचे नर कळपात वापरले.
 • अन्य ठिकाणी जनावरांच्या वजनवाढीचा दर जिथे 50 ते 100 ग्रॅम प्रतिदिन असा असतो, त्या तुलनेत पृथ्वीराज यांच्याकडील जनावरांच्या वजनवाढीचा दर 200 ते 250 ग्रॅम प्रतिदिनी आहे. त्यामुळे वर्षात सुमारे 65 ते 70 किलोचे विक्रीयोग्य नर तयार होतात.
 • 18 बाय 35 फूट आकाराचे दोन निवासी, तर 12 बाय 70 फूट आकाराच्या खाद्यासाठी दोन शेड. पाण्यासाठी दोन हजार लिटरची टाकी.
 • वडिलोपार्जित विहीर. बागायत एक एकर 20 गुंठे शेती. यातील 20 गुंठ्यांत चारा लागवड.शेळ्यांना दिला जाणारा आहार (प्रति शेळी, प्रति दिन)


1) सकाळी 100 ग्रॅम गोळी पेंड. एका तासानंतर सुक्‍या वैरणीची एक किलो कुट्टी. दोन तासांनंतर सुका चारा दीड ते दोन किलो. (सकाळी सुका चारा दिल्याने भुकेल्या पोटी तो मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.) दुपारी बारानंतर दोन वेळा एकूण दोन ते अडीच किलो हिरवा चारा कुट्टीद्वारा. 
2) हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास, दशरथ घास, डीएचएन-6, सीओएसएस-27 आदी बहुवार्षिक पिकांचा चारा. 
3) सकाळी मुक्कामाच्या शेडमधून शेळ्यांना बाहेर सोडल्यानंतर मुक्कामाची जागा व सायंकाळी शेळ्या मुक्कामाच्या ठिकाणी आत घेतल्यानंतर दिवसभर वापराची व खाद्याची जागा स्वच्छ केली जाते.

आरोग्य -

नवजात करडांना 21 दिवसांनी आंत्रविषाद व पंधरा दिवसांनी बुस्टरचा डोस. दोन महिन्यांनंतर लाळ्या खुरकूत व घटसर्प, तर तिसऱ्या महिन्यात पीपीआरचे लसीकरण. दर सहा महिन्यांनी औषधांद्वारे जंतनिर्मूलन.

सेंद्रिय बोकड?

पृथ्वीराज यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात बकरी ईदच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धिप्पाड, धष्टपुष्ट बोकड पाहण्यास मिळतात. त्यांना वाढवण्यासाठी रासायनिक औषधे व उत्तेजक द्रव्यांचा वापर केला जातो. परंतु पृथ्वीराज यांच्याकडे बोकडांना पूर्णतः सेंद्रिय व पौष्टिक आहार देऊन वाढवले जाते. त्यांना तणावमुक्त वातावरणात ठेवले जाते. अशा पद्धतीचे सुमारे 25 सेंद्रिय बोकड विक्रीस उपलब्ध असतात.

 • वर्षभरात शेळ्यांमध्ये सुमारे 30 नर व 15 ते 20 माद्यांची विक्री केली जाते.
 • बकरी इदसाठी दीड वर्ष वाढवलेल्या सुमारे 70 ते 80 किलो वजनाच्या बोकडाची विक्री होते.
 • शुद्ध नर असल्यास प्रति किलो 1500 रुपये दराने विकला जातो. मादीची विक्री दोन हजार रुपये दराने होते.
 • जाती व जातीच्या शुद्धतेनुसार दरात फरक राहतो.
 • प्रकल्पात वार्षिक सुमारे दोन लाख रुपये खर्च होतो. उपलब्ध लेंडी खताचा वापर स्वतःच्या शेतातील पिकांसाठी केला जातो. हे खत या वर्षीपासून विक्रीसही उपलब्ध केले आहे.

फायदेशीर व्यवसायासाठी वापरलेल्या बाबी

 • वजनवाढीचा वेग कायम ठेवला.
 • सिरोहीसारख्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण 60 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवले. (योग्य प्रकारच्या पोषणातून)
 • जन्मलेल्या करडांमधील मृत्यूचे प्रमाणही शून्य टक्के ठेवले आहे.
 • संगोपनगृहामध्ये स्वकल्पनेतून गव्हाणीत नावीन्यपूर्ण बदल केले. त्यामुळे खाद्य जास्त प्रमाणात तेथे बसून नासाडी कमी होते. कमी जागेत जास्त शेळ्यांना मनसोक्त खाद्य खाता येते.
 • संगोपनगृहात मुरुमाच्या भुईऐवजी लादीचा वापर. त्यातही वेगवेगळे प्रयोग.
 • शेळ्यांच्या आई-वडिलांचा डाटा ठेवला - पृथ्वीराज यांनी आपल्या शेडमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक जनावराच्या आई-वडिलांचा शास्त्रीय "डाटा' ठेवला आहे. जातीची दूध देण्याची क्षमता, वेतक्षमता, आनुवंशिक गुणधर्म आदी सर्व नोंदी असल्याने जातीची शुद्धता तपासणे व तशा जाती विकसित करणे शक्‍य होते. नोंदीच्या दृष्टीने प्रत्येक शेळीच्या कानात क्रमांकाचे बिल्ले लावण्यात आले आहेत.
 • भविष्यात जनावरांचा वजनवाढीचा वेग 250 ते 300 ग्रॅम प्रतिदिनी ठेवणे, दोन वर्षांत चार वेत घेणे, असे नियोजन आहे. जातीची योग्य निवड, निवडीचे ठिकाण हे मुख्य बंदिस्त शेळीपालनात महत्त्वाचे आहेत. याकरिता बंदिस्त शेळीपालन प्रकल्पातील शेळ्या घेऊनच संगोपन करणे महत्त्वाचे ठरते, असे पृथ्वीराज म्हणतात.

पृथ्वीराज यांना फलटण येथील निंबकर कृषी संशोधन केंद्रातील चंदा निंबकर, शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अविनाश देव व डॉ. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन, तर आजोबा नथू चव्हाण, आजी सौ. गजराबाई यांची मोलाची साथ मिळते.

प्रत्येक भारतीयाला भारतीय वैद्यकीय संशोधन संशोधन संस्था, नवी दिल्ली या संस्थेच्या शिफारशीनुसार दरडोई प्रति वर्षी अकरा किलो मांस मिळायला हवे; परंतु उपलब्धता पाच किलोपेक्षाही कमी आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनुसार शेळीपालन ही काळाची गरज आहे. पृथ्वीराज यांचा व्यवसाय त्या दृष्टीने आदर्श आहे. अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मांसाची उपलब्धता वाढेल आणि तरुणांना व्यवसायातून रोजगार उपलब्ध होईल.

- डॉ. अविनाश देव, कार्यक्रम समन्वयक, बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, वारजे (पुणे).
पृथ्वीराज चव्हाण- 9960548005.

लेखक : अमोल जाधव

माहिती संदर्भ : अॅग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate