অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबडीपालन कुटुंबाचा आधार

कोंबडीपालन कुटुंबाचा आधार

बुलडाणा जिल्ह्यातील जिद्दी बारोकर यांचा पूरक व्यवसाय

मजुरांअभावी दुग्ध व्यवसाय बंद करावा लागला, तरीही जिद्दीने सुरू ठेवलेल्या कुक्‍कुटपालन व्यवसायातून आर्थिक घडी स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. देऊळगाव राजा) येथील जगन बबनराव बारोकर यांनी यशस्वी केला आहे. ब्रॉयलर कोंबड्यांच्या सुमारे पन्नास हजार पक्ष्यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पिंपळनेर येथील जगन बारोकर यांची आठ एकर शेती आहे. मात्र शेतीपेक्षाही पोल्ट्री व्यवसाय हा त्यांच्यासाठी आर्थिक उत्पन्न देणारा स्रोत ठरला आहे. सन 1999-2000 च्या सुमारास ते पोल्ट्री व्यवसायाकडे वळले. तेव्हापासून आजगायत त्यांनी या व्यवसायात स्थैर्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
देऊळगाव राजा तालुका तसा संकरित भाजीपाला बीजोत्पादनासाठी ओळखला जातो. तालुका परिसरात अनेक शेतकरी त्यासाठी प्रसिद्ध आहेत. बारोकर यांनी मात्र पोल्ट्री व्यवसायाची निवड करून त्यातील आव्हाने पेलण्याचा प्रयत्न केला आहे.

मजूरटंचाईमुळे दुग्ध व्यवसाय बंद झाला

बारोकर यांचे व्यक्तिमत्त्व धडपडे किंवा प्रयत्नवादी असे म्हणावे लागेल. त्यांनी यापूर्वी दुग्ध व्यवसायातही उडी घेतली होती. नगर जिल्ह्यातील लोणी येथून होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या वीस गाईंची खरेदी केली होती. शेतशिवारातच 30 बाय 70 फूट आकारमानाचा गोठा बांधला होता. त्यासाठी एक लाख 40 हजार रुपयांचा खर्च झाला. दोन्ही वेळचे मिळून दररोज 350 लिटर दूध संकलित होत होते. देऊळगाव येथील उत्कर्ष दूध संकलन केंद्राला त्याचा पुरवठा होत होता. 19 रुपये प्रति लिटर दराने दुधाची विक्री होत होती. जनावरांकरिता लागणाऱ्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी यासाठी करार शेतीचा उपक्रमही राबविला होता. मात्र या व्यवसायाकामी मजुरांची सातत्याने गरज भासत असताना त्यांची पुरेशी उपलब्धता करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे ठरू लागले होते. त्यामुळेच या व्यवसायातून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2013 मध्ये या व्यवसायातून त्यांना पूर्णपणे माघार घ्यावी लागली.

कुक्‍कुटपालनात बसवला जम

सन 1999 च्या सुमारास ब्रॉयलर कोंबड्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला त्या वेळी त्यांच्याकडे जेमतेम 500 पक्षी होते. एका शेडमध्ये त्यांचे संगोपन केले जायचे. पक्ष्यांची विक्री स्थानिक विक्रेत्यांना ते करीत. या व्यवसायात जम बसू लागल्याचे वाटू लागल्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये त्यांच्याकडील पक्ष्यांची संख्या दहा हजारांवर पोचली. स्थानिक स्तरावर मागणी वाढल्याच्या परिणामी हा निर्णय घेतला होता. आज टप्प्याटप्याने पक्ष्यांची संख्या वाढत ती आजमितीला 50 हजारांपर्यंत पोचली आहे. त्यात 25 हजार नव्या पक्ष्यांची वेगळी बॅच यंदाच घेतली आहे. पक्ष्यांच्या संगोपनाकरिता आठ शेडची उभारणी केली आहे.

पक्ष्यांच्या व्यवस्थापनाकडे जातीने लक्ष

औरंगाबाद येथील एका हॅचरीजमधून एका दिवसाच्या पक्ष्याची खरेदी सरासरी 23 रुपये प्रति पक्षी याप्रमाणे होते. एका पक्ष्याचे वजन सरासरी दोन किलो झाल्यानंतर त्याची विक्री होते. त्याकरिता तीन किलो 800 ग्रॅम पशुखाद्याची गरज भासते. प्रति पक्षी प्रति किलो 24 रुपये 50 पैसे सरासरी खर्च होत असल्याचे बारोकर यांनी सांगितले. पक्ष्याचे आरोग्य जपण्यासाठी होणाऱ्या लसीकरणावर आठ रुपये, तर मजुरी व अन्य खर्च चार रुपयांचा होतो. पिलू वाढवण्यापासून ते विक्रीसाठी तयार होईपर्यंतचा कालावधी सुमारे दोन महिन्यांचा असतो. वर्षभरात सुमारे सहा ते सात बॅचेस घेतल्या जातात. बारोकर यांचे मित्र पशुवैद्यक असल्याने त्यांच्याकडून सर्व मार्गदर्शन घेतले आहे. लसीकरण वेळच्या वेळी होते. पक्ष्यांची मरतूक होण्याचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपर्यंत आहे. बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता उन्हाळ्यात पक्ष्यांचे वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्याकरिता त्यांच्यावर पाण्याचा शिडकावा केला जातो.

मक्‍यापासून पशुखाद्यनिर्मिती

पक्ष्यांचे खाद्य शक्‍यतो घरीच तयार केले जाते. त्यासाठीचा कच्चा माल तेवढा विकत आणला जातो. मक्‍यापासून पशुखाद्यनिर्मिती करताना मका बाजारातून 12 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला जातो. त्यासाठी लागणारे यंत्र सोनगढ (गुजरात) येथून 2003 मध्ये एक लाख 20 हजार रुपयांना खरेदी करण्यात आले.

मिळणारे दर व ताळेबंद

पक्ष्यांच्या दरात वर्षभर सतत चढउतार होत असतात. बारोकर आपल्या पोल्ट्रीतील कोंबड्यांची विक्री व्यापाऱ्यांनाच करतात. सुमारे 15 ते 20 व्यापारी त्यांच्या सतत संपर्कात असतात. वर्षभराचा पक्ष्यांचा सरासरी दर काढला तो 65 रुपये प्रति किलो मिळतो. सर्वांत अधिक दर हे उन्हाळ्याच्या दिवसांत, तर सर्वांत कमी दर श्रावण काळात मिळतात. कमाल दर 75 रुपयांपर्यंत, तर किमान दर 40 रुपयांपर्यंत मिळतो. वर्षभरात खर्च वजा जाता सुमारे सात ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून होत असल्याचे बारोकर यांनी सांगितले.
संगोपनासाठीचे पक्ष्यांची उचल औरंगाबाद येथील कंपनीकडून केली जाते. त्यांच्याकडूनच खरेदीदार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार अकोला, जाफराबाद, जालना, चिखली, खामगाव या परिसरात पक्ष्यांना मागणी राहते. खरेदीदार स्पॉट डीलिंग (जागेवरून खरेदी) करतात. त्यामुळे वाहतूक व अन्य खर्चाचा भुर्दंड बारोकर यांना सोसावा लागत नाही.

सामूहिक कुटुंबपद्धतीचा आदर्श

बारोकर यांची संयुक्त पद्धतीची आठ एकर शेती आहे. बंधू शशिकांत व आई साळूबाई यादेखील बारोकर यांना व्यवसायात मदत करतात. संयुक्‍त कुटुंब पद्धतीचा आदर्श या भावंडांनी घालून दिला आहे. कुटुंबात दहा जणांचा समावेश आहे. शेतीतही मजुरांची समस्या भेडसावते. त्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. मशागतीसाठी ट्रॅक्‍टरचा वापर केला जातो. फवारणीसाठी ट्रॅक्‍टरचलित यंत्र घेतले आहे. प्रति तासाला सुमारे चार एकरांवरील फवारणी केली जाते. सहाशे लिटर क्षमतेचा टॅंक यंत्राला जोडला आहे. नाशिक येथून 95 हजार रुपयांना हे यंत्र खरेदी केले आहे.

डाळिंब शेतीचा प्रयोग मात्र गारपिटीने नुकसा

आपल्या आठ एकरांत बारोकर यांनी अन्य कोणतेही पीक न घेता केवळ भगवा डाळिंबाची लागवड केली. अंबड (जि. जालना) येथील त्यांचे चुलत बंधू रामेश्‍वर डाळिंब उत्पादक आहेत. त्यांच्या सल्ल्यावरूनच हा प्रयोग केला. पहिल्या वर्षी चार एकरांतून सुमारे नऊ टन उत्पादन त्यांना मिळाले. उत्पन्नही पाच लाख रुपयांहून अधिक मिळाले. मात्र यंदाच्या वर्षी गारपिटीमुळे संपूर्ण बागेचे नुकसान झाले. आतापर्यंतची एकूण परिस्थिती पाहिली तर पोल्ट्री व्यवसायानेच कौटुंबिक आर्थिक भार सांभाळल्याचे बारोकर म्हणाले. 

जगन बारोकर - 9011010240

लेखक : विनोद इंगोले

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate