অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज

इस्त्रायल दौऱ्यावरुन परतलेल्या वलनी (ता.जि. नागपूर) येथील अशोक मानकर यांनी गाठीशी असलेल्या अनुभवातून परिसरात समृद्धी कशी नांदेल या दृष्टीने प्रकल्प उभारणीचा विचार सुरु केला. विदर्भातील अनेक गावांमध्ये दुधाचा मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर दुग्ध व्यवसायातच काही तरी वेगळे करण्याचा उद्देशाने त्यांनी डेअरी प्रकल्पाची पायाभरणी केली. विधानपरिषदेचे माजी सदस्य असलेल्या अशोक मानकर यांची वलनी शिवारात शेती आहे. एप्रिल 2015 साली इस्त्रायल दौऱ्यात सहभागी होत त्यांनी तेथील शेती व शेतीपूरक व्यवसायाचा अभ्यास केला. त्यामध्ये डेअरी या विषयावर त्यांनी अधिक लक्ष्य केंद्रीत केले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसायातच राबण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील बहुतांश भागात दुधाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला या भागात स्कोप असल्याचे त्यांनी ओळखले. यातूनच व्यवसायाच्या उभारणीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ.सुनील सहातपूरे यांच्याशी त्यांनी या विषयावर सल्ला मसलत केली व त्यानंतर त्यांनी मुऱ्हा जातीच्या 5 म्हशी तसेच सह एच.एफ. गायींची खरेदी केली यानुसार सुमारे 11 जनावरे त्यांच्याकडे आहेत.

दुग्धोत्पादनाला दिली चालना

अशोक मानकर यांच्याकडील दुधाळ जनावरांपासून त्यांना दोन्ही वेळचे मिळून 150 लिटर दुधाचे संकलन होते. त्यासोबतच नजीकच्या गावातील शेतकऱ्यांकडून देखील दुधाची खरेदी करुन त्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 450 लिटर दुधाचे संकलन ते इतर शेतकऱ्यांकडून करतात, याप्रमाणे सुमारे 600 लिटर दुधाची विक्री ते नागपूरला करतात.

दुग्धोत्पादकांना दिला जादा दर

गाईचे दूध 30 रुपये प्रती लिटर तर म्हशीच्या दुधाची खरेदी 40 रुपये प्रती लिटर प्रमाणे होते. फॅट नुसार खरेदी दरात चढउतार होतात, असे त्यांनी सांगितले. या भागातील दूध उत्पादकांना शेतीपूरक व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. खंडाळा, बोरगाव या भागात शेतीपूरक दूग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्या मोठी आहे.

जनावरांचा चारा

जयवंत, मल्टी कटींग ज्वारी, तसेच मका लागवड प्रक्षेत्रावर केली आहे. बारा महिने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी यासाठी प्रयत्न होतात. जनावरांकरीता लागणारी ढेप खरेदी केली जाते. म्हशीला चार किलो ढेप व चार किलो इतर घटक असलेला कोरडा चारा दिवसभर देण्यावर भर राहतो. एका दुधाळ जनावरावर दरदिवशी चाऱ्यावर होणारा खर्च 170 ते 180 रुपये आहे, असे त्यांनी सांगीतले.

प्रक्रियाजन्य पदार्थ

वलनी ते नागपूर हे अंतर अवघे 25 किलोमीटर आहे. दुधाच्या वाहतुकीकरीता एक वाहन खरेदी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी वलनी येथील फार्मवर दूध पोहोचवायचे आणि त्यानंतर फॅट तपासून दुधाचे मोजमाप करुन शेतकऱ्याने किती लिटरचा रतीब घातला याची नोंद वहित घ्यायची, अशी पद्धती आहे. या पद्धतीप्रमाणे संकलीत झालेले दूध नागपूर येथील तीन काऊंटरवरुन विकण्याची सोय आहे. दुधाची विक्री न झाल्यास त्यापासून दही, पनीर व खवा असे पदार्थ तयार केले जातात. श्रीखंड, बासुंदी हे दुग्धजन्य पदार्थ मागणी असल्यास तयार करुन दिले जातात. गाईचे दूध 40 रुपये तर म्हशीचे 50 रुपये लिटर प्रमाणे विक्री होते. प्रक्रियाजन्य पदार्थांमध्ये दही 80 रुपये किलो, श्रीखंड 200 रुपये, तूप 550 रुपये किलो विकले जाते.

गोठ्याची उभारणी

40 बाय 60 फुट आकाराचा गोठा वलनी येथे उभारणी आला आहे. गोठ्याच्या उभारणीवर सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च झाला. अर्धमुक्‍त पद्धतीचा येथे अवलंब केल्याचे त्यांनी सांगितले. जनावरांना काही काळ मोकळे सोडले जाते तर काही काळ त्यांचा मुक्‍त संचार राहतो. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर होतो. जनावरांच्या लसीकरणासाठी माफसूच्या पशुवैद्यकांची सेवा घेतली जाते. माफसूचे सुनिल सहातपूरे तसेच सारीपूत लांडगे यांचे तांत्रिक मार्गदर्शन त्यांना मिळते. तोंडखुरी, पायखुरी व इतर लसीकरण तसेच आधुनिक व विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करीत कृत्रीम रेतनाचे काम ते करतात. यापुढील काळात स्वतःसह इतर शेतकऱ्यांचे मिळून पाच हजार लिटर दूध संकलनाचा पल्ला गाठायचा असल्याचे अशोक मानकर सांगतात. त्याकरीता शासन अनुदानावरील दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना खरेदी करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॅंक प्रकरण मंजूर करणे यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाची खरेदी करुन त्या पैशातून बॅंक हप्त्याचा भरणा होईल. उर्वरित रक्‍कम शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचेही श्री.मानकर यांनी सांगितले. नागपूरात विवेकानंद नगर, मनिष नगर, मेडीकल कॉलेज चौक, रेशीम बाग, रामनगर येथे दुधाची विक्री होते.

दुग्धव्यवसायातील वैशिष्ट्ये

  1. स्वतःच्या दूध संकलनासोबतच इतर शेतकऱ्यांकडूनही दूध खरेदी
  2. शेतकऱ्यांना जादा दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
  3. जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी माफसूच्या तज्ज्ञांची सेवा.
  4. दूधाची विक्री 25 किलोमीटर अंतरावरील नागपूर शहरात.
  5. दुधाच्या वाहतुकीसाठी इतरांवर विसंबून न राहता स्वतःचे वाहन.
  6. शेतकऱ्यांना जादा दर देण्यावर भर.
  7. शिल्लक दुधावर प्रक्रिया करीत प्रक्रियाजन्य पदार्थाची विक्री.
  8. 30 एकर शेतीत सोयाबीन, कापूस, ऊस, संत्रा यासारखी पिके घेण्यावर भर.
  9. 150 लिटर स्वतःकडील तर इतर शेतकऱ्यांकडून 450 लिटर दूध खरेदी.
  10. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा उद्देश

 

लेखक - चैताली बाळू नानोटे,

जि.अकोला 7773987427

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate