অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार

लावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार

जापानीज लावा पालन

जापानीज लावा हा कुक्कुट या संवर्गातील पक्षी. 2013 पर्यंत हा पक्षी पाळण्यावर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने बंदी घातली होती. 6 डिसेंबर 2013 रोजी या जापनीज क्वेल्स म्हणजेच जापानी लावावरील बंदी उठवून त्याला पोल्ट्री फार्मिंगसाठी मान्यता देण्यात आली. भंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले आणि केवळ सव्वा वर्षात आज ते नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात लावा पुरवठा करणारे एकमेव पुरवठादार झाले आहेत.

भंडारा शहरापापासून वरठी रोडवर 10 किलोमीटर अंतरावर असणारे खुर्शीपार गाव. याच गावात अभिषेक आणि सचिन हे दोघे मित्र पदवी आणि कृषि पदविका धारक तरुण, वडिलोपार्जित शेती करतात. मात्र काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास दोघांचाही मनात घोळत होता. अभिषेकच्या पशु वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या मावस भावाने त्याला लावा पक्षी पालनाबाबत मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेत अभिषेक पवार याने त्याच्या शेतात 1500 चौरस फुट जागेवर जाळी लावून शेड तयार केले. छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक दिवसाचे 1000 लावा पिल्ले त्यांनी विकत आणले. त्यासाठी 12 हजार रुपये खर्च आला. मात्र प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यातील अनुभव आणि खाचखळगे समजून घेणे महत्वाचे असते याची जाणीव त्यांना लगेच झाली. आणलेल्या 1000 पिल्लांपैकी 500 पिल्ले 15 दिवसातच दगावली. यातून सावरत एकेक अनुभव घेत त्यांनी 500 पक्षांना वाचवले. एक महिन्यात हे पक्षी 150 ग्रॅम वजनाचे झाले. विक्रीसाठी तयार झालेले पक्षी विकण्यासाठी त्यांनी बाजरपेठेच्या शोधात नागपुर गाठले.

सुरूवातीला या मित्रांना लावा पक्षाच्या विक्रीसाठी सुद्धा बराच त्रास सहन करावा लागला. कारण ठोक विक्रेत्यांना यावरील बंदी उठल्याचे माहीत नव्हते. त्यासाठी प्रत्येकवेळी प्रसिद्ध झालेले राजपत्र दाखवून लोकांना पटवून द्यावे लागे. काही वेळा वनविभाग आणि पोलिस यांचाही ससेमिरा त्यांच्या मागे लागला. मात्र सर्वाना शासन निर्णय आणि पोल्ट्री फार्म दाखवून त्यांनी सत्यता पटवून दिली. इतकी खटपट करूनही या मित्रांना पहिल्यांदा तोटाच सहन करावा लागला, कारण 500 पिल्ले आधीच दगावली होते.

हॅचरी सुरु करण्याचा मानस

दुसऱ्या वेळी मात्र त्यांनी अनुभवातून शिकत 15 हजार रुपये नफा कमावला. आतापर्यंत यांनी 30 हजार पक्षी विकलेत आणि त्यातून 15 लाख रुपयांचा नफा झाला आहे. केवळ सव्वा वर्षात त्यांनी लावा पालनातून येथपर्यंत मजल मारली आहे. आज गोंदिया, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली आणि भंडारा या पाचही जिल्ह्यात त्यांचे लावा पक्षी विक्रीसाठी जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याप्रमाणात पुरवठा करण्यासाठी आम्ही कमी पडतो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी याकडे वळावे, असे आवाहन पवार यानी केले आहे.

या पक्षाची पिल्ले दुर्ग, पुणे आणि हैद्राबाद येथे मिळत असल्यामुळे पक्षी आणायला त्रास होतो. एक दिवसाचे पक्षी आणले तर त्यांचे रस्त्यातच दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॅचरी सुरु करण्याचा मानस अभिषेक पवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारचा कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून अभिषेक आणि सचिन यांनी आर्थिक उन्नतीची कास धरली आहे.

मुख्य म्हणजे लावा पालन अत्यंत सोपे आहे. 500 स्क्वेयर फुट जागेत 2000 पक्षी राहु शकतात. कमी कालावधीत, कमी खर्चात हा पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी करू शकतात. शिवाय या पक्षाला कुठल्याही रोगप्रतिकारक लसीची गरज नाही. त्यामुळे लसीकरणाचा खर्च शुन्य आहे. शिवाय पशु वैद्यकीय डॉक्टरची पण गरज पडत नाही. कोंबडीला लागणारे खाद्यच या पक्षाला लागते. एक महिन्यात 150 ग्रॅम वजनाचे पक्षी विक्रीसाठी तयार होतात. पक्षाची एक जोड़ी 130 रुपयाला तर ठोक मध्ये 50 रुपये प्रति पक्षी याप्रमाणे दर मिळतात. लावा पक्षाचे मास खाण्यास पौष्टिक असून त्यामध्ये प्रथिने, खनिजे, लोह आणि जीवनसत्व भरपूर असतात. तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लहान शेतकरी लावा फार्मिंग करतात.

लेखक - मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate